You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अजित पवारांचा नितेश राणेंना टोला : कोंबड्याला मांजर बनवून कोकणचे प्रश्न सुटणार का?, #5मोठ्याबातम्या
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी #पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. कोंबड्याला मांजर बनवून कोकणचे प्रश्न सुटणार का? - अजित पवार
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे विधानसभेत प्रवेश करताना नितेश राणे यांनी काढलेल्या आवाजानंतर नवाब मलिक आणि नितेश राणे यांच्यात प्राण्यांची चित्र पोस्ट करत ट्विटरवर युद्ध रंगलं.
या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणेंना फटकारलं आहे. "कोंबड्यांना मांजर केलं जात असल्याचं मी टीव्हीवर पाहत आहे, पण अशाने कोकणाचे प्रश्न सुटणार आहेत का? कोकणाचा विकास होईल का?" असं अजित पवार म्हणाले. टीव्ही 9 नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
यावेळी त्यांनी नारायण राणेंवरही हल्लाबोल केला. "संस्था उभ्या करायला अक्कल लागते, मात्र, संस्था अडचणीत आणायला अक्कल लागत नाही," असं अजित पवार रत्नागिरीमध्ये म्हणाले.
तर कणकवलीतील मारहाण प्रकरणी पोलिस अधिकाराचा गैरवापर करत नितेश राणे आणि संदेश सावंत यांच्या अटकेसाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
यावेळी नारायण राणेंनी पवारांनाही प्रत्युत्तर दिलं. "पवार अक्कल लागते असं त्यांच्या कार्यकर्त्यांनाच म्हणाले. पण सत्तेमध्ये असलेल्यांनी अकलेचे काय तारे तोडले, हे सर्वांना कळालं आहे" अशी टीका त्यांनी केली.
2. टीईटी घोटाळा : अश्विन कुमार यांच्याकूडून एक कोटींपेक्षा अधिकचा ऐवज जप्त
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी जी.ए. सॉफ्टवेअरचे अश्विन कुमार यांच्या घरात घेतलेल्या झडतीमध्ये एक कोटांपेक्षा अधिकचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. एपीबी माझानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
यामध्ये 1480.680 ग्रॅम सोनं, हिरेजडीत दागिणे आणि 27 किलो चांदी यांचा समावेश आहे. त्याची एकूण किंमत 1 कोटींपेक्षाही जास्त असल्याची माहिती मिळाली आहे.
दुसरीकडे तुकाराम सुपे यांच्या घरी दोन वेळा टाकलेल्या धाडीत सोने आणि रोख असा जवळपास 3 कोटींचा ऐवज जप्त केला आहे. सुपे यांचे नातेवाईक आणि नीकटवर्तीय आता पोलिसांच्या रडारवर आहेत. सुपेंच्या जवळच्या दोघांनी गेल्या दोन दिवसांत 58 लाख पोलिसांकडे आणून दिले आहेत.
राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष, उच्च आणि माध्यमिक औरंगाबाद विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरेसह, बेंगळुरूतून जी.ए. सॉफ्टवेअरचे संचालक अश्विन कुमार यांना अटक करण्यात आली आहे. तसंच जी ए सॉफ्टवेअरचे माजी संचालक सौरभ त्रिपाठीलादेखील अटक झाली आहे.
3. तिसरी लाट आली तर ती ती ओमिक्रॉनचीच असेल - राजेश टोपे
महाराष्ट्रात सध्या ओमिक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं हा धोका गंभीर असून तिसरी लाट आलीच तर ती ओमिक्रॉनचीच असेल, अशा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. लोकमतनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
राज्यातील कोरानाची सद्यस्थिती आणि नव्या निर्बंधांबाबत राजेश टोपे यांनी सविस्तर माहिती दिली, त्यावेळी त्यांनी ओमिक्रॉनच्या धोक्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला. त्यासाठी निर्बंधांसह कोरोनाच्या नियमाचं पालन करण्याचा सल्लाही दिला.
राज्यातील निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये, असं आवाहन टोपे यांनी केलं. राज्यात सध्या लग्नसराई सुरू आहे. तसंच नाताळ नवर्षामुळं हे निर्बंध गरजेचे असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत जाऊन ज्या दिवशी राज्याला 800 मॅट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता लागेल, त्यादिवशी राज्यात लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा लागेल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
4. दिल्लीमध्ये आजपासून लागणार नाईट कर्फ्यू
दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीमुळं दिल्ली सरकारनं सोमवारपासून नाईट कर्फ्यू लावण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत सध्या 1103 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. एनडीटीव्हीनं हे वृत्त दिलं आहे.
त्यानुसार दिल्लीमध्ये रात्री 11 वाजेपासून पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे. दिल्लीत यलो अलर्ट लागू झाल्यानंतर ही वेळ रात्री 10 ते पहाटे 5 अशी बदलली जाईल.
दिल्लीमध्ये सध्या कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर 0.5 टक्क्याच्या पुढं गेला आहे. 10 जून नंतर प्रथमच कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या समोर आली आहे. 10 जून रोजी दिल्लीत कोरोनाचे 305 रुग्ण होते.
वीकेंड कर्फ्यू लावला जाणार नसून ऑड इव्हन नियमानुसार सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत दुकानं उघडी असतील. कमी गरजेच्या सेवा वस्तुंची दुकानं आणि मॉलवर बंदी लागू शकते.
5. महाराष्ट्रात मंगळवारपासून पावसाची शक्यता
महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्यामुळं मंगळवारपासून अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
प्रामुख्यानं मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारपीट आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाची तर उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकणात मात्र हवामान कोरडं राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उत्तर भारतात सध्या वाऱ्यांची चक्रीय स्थिती आहे. त्यामुळं या भागात कमी दाबाचा पट्टा तयार होईल. तसंच दक्षिण-पश्चिम राजस्थानापासून विदर्भापर्यंतही कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे.
याचा परिणाम म्हणजे राज्यात काही भागांत पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, चंदिगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यांतही पावसाची शक्यता आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)