पुणे : खडकवासला धरणातून मिळणाऱ्या पाण्यावरुन का झाला वाद?

    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

पुण्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता पुन्हा चर्चेत आला आहे.

जलसंपदा व पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला पत्र लिहून पालिकेनं खडकवासला धरणातील पाण्याचा वापर कमी न केल्यानं शुक्रवारी (3 डिसेंबर) पाणी नियंत्रित करण्यात येणार असल्याचं कळवलं होतं. मात्र 4 डिसेंबर रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय रद्द केला.

पुण्यात सिंचन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. "देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना पाणी कपातीबाबतची 11 पत्रे पुणे महानगरपालिकेला देण्यात आली होती. तसंच त्यांच्या काळात पाणीकपात देखील करण्यात आली होती असं देखील पाटील यावेळी म्हणाले."

ही कारवाई करत असताना कायदा आणि सुव्यववस्था बिघडू नये यासाठी पोलिसांची मदत जलसंपदा व पाटबंधारे विभाग घेणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं

या कारवाईवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आक्षेप घेतला असून पोलीस बंदोबस्तात पाणी कमी करण्याचा पाटबंधारे विभागाच्या निर्णयाचा त्यांनी निषेध केला होता.

'पुणेकरांचे पाणी कमी करण्याचा पाटबंधारे विभागाचा डाव असल्याचे' देखील ते यावेळी म्हणाले होते.

नेमका वाद काय आहे?

खडकवासला प्रकल्पाच्या 2020-21 च्या रब्बी हंगामासाठीची कालवा सल्लागार समितीची बैठक 22 जानेवारीला झाली होती. त्यावेळी पुणे महानगरपालिकेने भामा आसखेड धरणातून पाणी वापर सुरू केल्यानं खडकवासला धरणातून दैनंदिन पाणी वापर कमी करण्याबाबत मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुद्दा उपस्थित केला होता.

त्यावर पुणे महानगरपालिकेला तातडीनं खडकवासला धरणातील पाणी वापर कमी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांनी दिले होते.

त्यानंतर 26 मार्चला झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये पुणे महानगरपालिकेनं पाणीवापर नियंत्रित केला नसल्याचं निदर्शनास आलं. तेव्हा पुन्हा अजित पवारांनी पालिकेनं पाणीवापर नियंत्रित करण्याबाबत निर्देश दिले होते.

1 डिसेंबरला पाटबंधारे विभागाने पुणे महानगरपालिकेला पत्र लिहून या सगळ्याची पुन्हा एकदा आठवण करुन दिली.

पाटबंधारे विभागाच्या पत्रात काय म्हटलं?

पाटबंधारे विभागाकडून पुणे महानगरपालिकेला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की,

"पुणे महानगरपालिका खडकवासला धरणातून सध्या दैनंदिन सरासरी 1460 एमएलडी पाणी वापर करत असून भामा आसखेड धरणातून 160 एमएलडी इतका दैनंदिन पाणीवापर करत आहे. पुणे महानगरपालिके दैनंदिन पाणी वापर नियंत्रित करण्याबाबत पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना कळवण्यात आलं होतं. तसंच कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या नियोजनानुसार शेतीला उन्हाळ्यात सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

"त्यामुळे धरणातील मर्यादीत पाणीसाठी उन्हाळा अखेरीस पिण्यासाठी उपलब्ध राहणार आहे व त्यामुळे पुणे शहरास जून-जूलै 2021 मध्ये पाणी टंचाई भासण्याची शक्यता असल्याचेही पुणे महानगरपालिकेस अवगत करण्यात आले होते तरीही पालिकेने पाणीवापर नियंत्रित केले नाही.

"त्यामुळे 2021-22 च्या उन्हाळा हंगामामध्ये शेतीसाठी पाणीटंचाई होऊ नये असे पालिकेला वारंवार कळवले आहे. पुणे महानगरपालिकेचा दैनिक पाणीवापर नियंत्रणात न आणल्यामुळे जलसंपदा विभागामार्फत शुक्रवारी ( 3 डिसेंबर) पाणीवापर नियंत्रणात आणण्यात येणार आहे."

हा निर्णय चिड आणणारा - महापौर

पुणे शहराचे पाणी कमी करण्याच्या निर्णयाचा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोध केला आहे.

त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, ''पुणेकरांना गरजेचं पाणी कमी करण्याचा डाव पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे. पुणे शहरात नव्यानं समाविष्ट झालेली 23 गावं आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता दैनंदिन 1 हजार 460 एमएलडी पाणी खडकवासलातून आणि 380 एमएलडी पाणी भामा आसखेडमधून पुरवठा होतोय.''

''पालकमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना माझी विनंती आहे की, पुण्याचं पाणी कमी करू नका. पाणीगळती थांबवणं, पाणी बचत करणं, यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत. समान पाणी पुरवठा योजनेचे काम अत्यंत वेगानं सुरू असून ते काम लवकरत पूर्ण करणार आहोत. आमचे अनेक प्रयत्न सुरू असतानाही पोलीस बंदोबस्तात पाणी कमी करण्याचा निर्णय चिड आणणार आहे.''

ते पुढे म्हणाले, ''शेतीला पाणी देण्याचा आम्हा पुणेकरांचा अजिबात विरोध नाही, मात्र प्राधान्य नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला असायला हवं, याचं थोडंही भान जलसंपदा विभागाला असू नये ? जलसंपदा विभागाचा हा सुलतानी कारभार आणि दादागिरी पुणेकर कदापीही सहन करणार नाहीत.''

पुणेकरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न - विवेक वेलकर

सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी सुद्धा जलसंपदा व पाटबंधारे विभागाच्या निर्णयाचा विरोध केला आहे.

''खडकवासला धरणसाखळीमध्ये 26.26 टीएमसी पाणी शिल्लक आहे. पुढील आठ महिने पुणे शहराला त्यातून प्रतिमहिना दीड टीएमसी पाणी दिले, तरी फक्त 12 टीएमसी पाणी संपेल. 1.26 टीएमसी पाण्याचे पुढील आठ महिन्यात बाष्पीभवन झाले तरी शेतीसाठी 13 टीएमसी पाणी शिल्लक राहील.

"याशिवाय 100 कोटी रुपये खर्च करुन उभारलेल्या मुंढवा जॅकवेल सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणेतून पुढील आठ महिन्यांत शेतीसाठी आणखी चार टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. असे असताना जलसंपदा विभाग नाहक शहरी विरुद्ध शेती असा विवाद निर्माण करुन पुण्याचे पाणी कमी करण्याचा खोडसाळपणा करत आहे."

याबाबत मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण अद्याप संपर्क होऊ शकला नाही. त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर बातमी अपडेट करण्यात येईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)