पुणे शहरात रिक्षांची संख्या कशामुळे वाढली?

    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

पुणे सायकलींचं शहर म्हणून पूर्वी ओळखलं जायचं. सायकलींची जागा आता टू-व्हीलर्सनी घेतली आहे.

पुण्यातील अरुंद रस्ते आणि गजबजलेल्या पेठांमुळे पुण्यात रिक्षाचा प्रवास करण्यावर नागरिकांचा भर असतो. 2017 पासून पुण्यातील रस्त्यांवर रिक्षांची संख्या वाढू लागली. केवळ पुण्यातच नाही तर इतर शहरांमध्ये सुद्धा रिक्षा झपाट्याने वाढल्या.

ही वाढ होण्यामागचं मुख्य कारण होतं, 'मागेल त्याला परवाना' हे धोरण.

2017 मध्ये भाजप-शिवसेनेचं सरकार असताना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी 'मागेल त्याला परवाना' हे धोरण अंमलात आणलं. या धोरणामुळे 1997 सालापासून रिक्षा - टॅक्सी परवान्यांच्या वाटपावर जे निर्बंध घालण्यात आले होते, ते संपुष्टात आले.

2017 पूर्वी ज्या व्यक्तीकडे रिक्षा किंवा टॅक्सी चालवण्याचा परवाना असेल त्यालाच व्यवसाय करता येऊ शकत होता. यामुळे परवान्यांचा काळा बाजार होत असल्याचा आरोपही करण्यात येत होता.

एखाद्या शहरात किती रिक्षा असाव्यात याचं धोरण सरकारकडून ठरवलं जात असतं. परंतु 'मागेल त्याला परवाना' हे धोरण अंमलात आणल्यानंतर पुण्यात रिक्षांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली.

अनेक नवीन लोक या व्यवसायात आले. या धोरणामुळे परमिटराज जरी संपुष्टात आलं असलं, तरी रिक्षाचालकांमध्ये स्पर्धा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. सोबतच गेल्या काही काळात गुन्हेगारीसाठी रिक्षाचा वापर झाल्याचे अनेक प्रकरणांमध्ये दिसून आलं.

पुण्यात किती रिक्षा आहेत?

पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, पुणे आरटीओकडे 2017 पूर्वी 45 हजार रिक्षांची नोंदणी होती.

मागेल त्याला परवाना हे धोरण आल्यानंतर यात झपाट्याने वाढ होऊन 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत 42 हजार 325 नवीन रिक्षांची वाढ झाली.

याचा अर्थ आजमितीला पुण्यात 87 हजार 325 इतक्या रिक्षा आहेत. केवळ 4 वर्षांमध्ये जवळजवळ दुप्पट रिक्षा पुणे शहरात वाढल्याचं या आकडेवारीवरुन समोर येतं.

या आरटीओकडे नोंदणी असलेल्या रिक्षा आहेत. नोंदणी नसलेल्या रिक्षांची गणना यात केल्यावर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुण्यातील अनेक गुन्ह्यांमध्ये रिक्षाचा वापर केल्याचं समोर आलं आहे. पुणे स्टेशन येथील सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये काही रिक्षाचालकांचा समावेश असल्याचं नुकतंच समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करत अनेक परवाना आणि इतर कागदपत्रे नसलेल्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली होती.

खुला परवाना बंद करायला हवा?

खुल्या परवान्याच्या निर्णयावर राज्याच्या रिक्षा संघटना कृती समीतीचे सरचिटणीस नितीन पवार यांना काय वाटतं हे बीबीसी मराठीने जाणून घेतलं.

खुला परवाना बंद करायला हवा, असं स्पष्ट मत पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

पवार म्हणाले, ''जेव्हा परमिट दिलं जातं तेव्हा स्थानिक परिस्थिती लक्षात घेतली जाते. त्यात तेथील रस्ते, आधी उपलब्ध असलेली परिवहन सेवा, वाहनांची संख्या या सगळ्याचा विचार केला जातो. CIRT या वाहनांविषयी संशोधन करणाऱ्या संस्थेने मागे एक अभ्यास केला होता. त्यांच्या अभ्यासानुसार पुण्यात एक लाख लोकसंख्येमागे 800 रिक्षा पुरेशा होत्या. 1997 नंतर 2017 पर्यंत रिक्षा परवाने देणं बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे दुसऱ्याचं परमिट घेऊन रिक्षा चालवल्या जात होत्या. हे कुठेही कायदेशीर नव्हतं.

"त्यामुळे जेव्हा परमिट खुलं झालं त्यावेळी अनेकांनी परमिट घेतलं. यात बेरोजगारीचा मोठा भाग आहे. आर्थिक सहाय्य मिळण्याच्या अनेक सुविधा देखील उपलब्ध झाल्या, त्यामुळे अनेकांनी रिक्षा घेतल्या. आता अशी परिस्थिती झाली आहे की रिक्षा आहे परंतु प्रवासी नाही. खुला परवाना हा अशास्त्रीय आहे. हा निर्णय काही कंपन्यांच्या आर्थिक फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

"अनेक लोक परवाना घेऊन दुसऱ्याला रिक्षा चालवायला दिली जात आहे. त्यामुळे रिक्षामध्ये देखील गुन्हेगारी आल्याचं दिसून आलं. व्हेईकल पॉप्युलेशन रेशोचा नियम यात गुंडाळण्यात आला आहे,'' असं देखील पवार पुढे म्हणाले.

रिक्षा वाढल्या, मिळकत घटली

रिक्षाचा परवाना खुला झाल्यानंतर अनेक सुशिक्षित तरुण देखील रिक्षा व्यवसायाकडे वळले. यांच्यातलाच एक सूरज शिरोळे. सूरजचं बी. कॉमपर्यंत शिक्षण झालंय. तो 2019 पासून रिक्षा चालवतोय. त्याला सुद्धा रिक्षाचा परवाना मिळालाय. असं असलं तरी मागेल त्याला परवाना धोरण बंद करावं असं सुरजला वाटतं.

सूरज म्हणतो, ''मागेल त्याला परवाना धोरणामुळे मोठ्या प्रमाणात परवाना लोकांना मिळाले. ज्यांना गरज आहे त्यांना द्यायला हवे होते. परंतु पडताळणी न करता हे परवाने देण्यात आले.

''मीटरने व्यवसाय न करता शेअर सीटने व्यवसाय केला जातो. त्यामुळे ज्यांना खरी गरज आहे त्यांना याचा व्यवसायात फटका बसतो. या वाढत्या रिक्षामुळे व्यवसाय बराच कमी झालाय.''

सूरजच्या घरी त्याचे रिटायर झालेले वडील, आई, बायको आणि एक मुलगी आहे. सध्या सूरजला रिक्षाच्या व्यवसायातून दिवसाला साधारण पाचशे रुपये मिळतात.

खुल्या परवान्यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे, असं अक्षय कोठावडे याला वाटतं. अक्षय 2017 च्या आधीपासून रिक्षा चालवतोय.

अक्षय म्हणतो, ''शहर वाढतंय त्यामुळे रिक्षांची गरज वाढली आहे. अर्थात रिक्षा वाढल्यामुळे स्पर्धा देखील वाढली आहे. अनेक उच्चशिक्षित तरुण सुद्धा या व्यवसायात येत आहेत. पूर्वी परमिट मिळण्यामध्ये भ्रष्टाचार व्हायचा. खुला परवाना झाल्याने अनेक गरजवंतांना रोजगाराचं माध्यम यातून मिळालं. उच्चशिक्षित मुलं सुद्धा यात आल्याने नागरिकांना चांगली सुविधा देखील मिळाली आहे.''

खुल्या परवान्यामुळे अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असली, तरी दुसरीकडे जे पूर्वीपासून रिक्षाचा व्यवसाय करतात त्यांना मात्र फटका बसलाय.

अनिल कांबळे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षाचा व्यवसाय करतात. रिक्षांच्या वाढलेल्या संख्येमुळे व्यवसाय 50 टक्क्यांनी कमी झाला असल्याचं ते सांगतात. त्याचबरोबर गुन्हेगारी प्रवृत्तीची लोकं सुद्धा यात आली असल्याचं ते म्हणतात.

रिक्षा वाढल्यामुळे पॅसेंजरच्या मागे रिक्षावाल्यांना लागावं लागत आहे, अशी व्यथा सुद्धा त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केली.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)