शेतकरी आंदोलनातील तरुणीवरील बलात्काराचं प्रकरण काय आहे?

    • Author, सत सिंह
    • Role, बीबीसी हिंदीसाठी रोहतकहून
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या पश्चिम बंगालच्या तरुणीवर तथाकथित बलात्कार प्रकरणी हरियाणा पोलिसांनी सहा लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. आणि या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आलं आहे.

ही तरुणी पश्चिम बंगालहून दिल्लीतल्या टिकरी बॉर्डरला ट्रेनने येत असताना बलात्काराचं हे तथाकथित प्रकरण एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात घडलं. या तरुणीला नंतर कोव्हिड झाला आणि बहादुरगडच्या एका हॉस्पिटलमध्ये तिचं निधन झालं.

बहादुरगडचे डीसीपी पवन कुमार यांच्या देखरेखीखालच्या विशेष तपास पथकाने आतापर्यंत दोन जणांची चौकशी केल्याचं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

ज्या लोकांवर हा आरोप लावण्यात आलाय त्यापैकी काहींनी टिकरी बॉर्डरवर तंबू ठोकलेले होते आणि त्यांना आता तिथून हटवण्यात आलं असल्याचं भारतीय किसान युनियन (उगराहा) चे नेते जोगिंदर सिंह उगराहा यांनी म्हटलंय.

अंतर्गत चौकशी केल्यानंतर किसान मोर्चाने तंबू हटवण्याचा हा निर्णय घेतला. पण पोलिसांकडे जवळपास आठवडाभरानंतर याविषयीची तक्रार दाखल करण्यात आली.

दिल्लीहून पश्चिम बंगालला गेलेल्या शेतकऱ्यांच्या एका गटाशी या तरुणीची गाठ पडली आणि त्यानंतर या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी टिकरी बॉर्डरला जायला ती 11 एप्रिलला निघाल्याचं, मरण पावलेल्या या 25 वर्षांच्या तरुणींच्या वडिलांनी FIR मध्ये म्हटलंय. ट्रेनमध्ये या तरुणीचं लैंगिक शोषण करण्यात आलं.

याविषयी या तरुणीने एक व्हीडिओ स्टेटमेंटही रेकॉर्ड केलं होतं.

या मुलीचे वडील सामाजिक कार्यकर्ते आहेत. आपण ज्यांच्यासोबत या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत आलो, ते लोक चांगले नसल्याचं मुलीने आपल्याला फोनवर सांगितल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या तरुणीने मरणापूर्वी दोन जणांचं नावही घेतलं होतं, असं त्यांचं म्हणणं आहे.

या मुलीच्या वडिलांनी काही शेतकरी नेत्यांशी संपर्क करत मदत मागितली आणि ते दिल्लीला गेले. पण तोपर्यंत या तरुणीला कोरोनाचा संसर्ग झाला आणि तिला एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

ज्या लोकांकडून या मुलीच्या वडिलांनी मदत मागितली त्यात स्वराज इंडियाच्या योगेंद्र यादव यांचाही समावेश आहे. पोलिसांनी मंगळवारी त्यांची चौकशी केली.

पोलिसांनी आपल्याला नोटीस पाठवल्यानंतर आपण आपल्याला माहिती असलेल्या सगळ्या गोष्टी पोलिसांना सांगितल्याचं योगेंद्र यादव यांना सांगितलं आहे.

आपण आपल्या तक्रारीत फक्त 2 लोकांवर आरोप केले होते, पण पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल केला असल्याचं पीडितेच्या वडिलांनी योगेंद्र यादव यांच्यासोबत घेतलेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत सांगितलं.

या मुलीला मदत करणाऱ्या दोन मुलींची नावही पोलिसांनी FIR मध्ये नोंदवल्याचं त्यांनी म्हटलंय. या पीडित मुलीने रेकॉर्ड केलेलं व्हीडिओ स्टेटमेंट पोलिसांकडे देण्यात आलंय.

'पीडितेने त्या घटनेच्या आठवडाभरानंतर ट्रेनमधल्या प्रसंगाबद्दल आपल्याला सांगितलं. यानंतर दोन मोठ्या शेतकरी नेत्यांना याविषयी कळवण्यात आलं आणि या मुलीच्या रहाण्याची सोय दुसऱ्या तंबूत करण्यात आल्याचं,' ज्या दोन तरुणींची नावं पोलिसांनी केसमध्ये दाखल केली आहेत, त्यापैकी एकीने बीबीसीला सांगितलं.

पण ज्या नेत्यांकडे या प्रकरणाची सर्वांत आधी तक्रार करण्यात आली, त्यांनी ते दाबण्याचा प्रयत्न केल्याचंही या तरुणीने म्हटलंय. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत आपण या मुलीचा व्हीडिओ रेकॉर्ड करून तिच्या वडिलांना पाठवल्याचं या तरुणीने सांगितलं.

या घटनेविषयी समजलं तोपर्यंत या पीडितेची तब्येत ढासळली होती आणि तिच्यावर उपचार होणं जास्त जरूरी होतं, असं जनवागी महिला समितीच्या नेत्या जगमती सांगवान यांनी म्हटलंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)