गोवा हॉस्पिटल मृत्यू : ऑक्सिजनपुरवठ्यावरून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांची विधानं परस्परविरोधी का?

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

गोव्याच्या सरकारी रुग्णालयात मंगळवारी (11 मे) सकाळी 26 कोव्हिड रुग्णांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेवरून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यात मतभेद पहायला मिळत आहेत.

गोवा मेडिकल कॉलेजमधील दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रमोद सावंत यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, ऑक्सिजन पुरवठ्यात झालेल्या विलंबामुळे हॉस्पिटलच्या सेंट्रल सप्लायमधील प्रेशर कमी झालेलं असू शकतं. मात्र रुग्णालयातील मृत्यू हे ऑक्सिजन पुरवठ्याअभावी झाले असल्याचं म्हणता येणार नाही.

ते म्हणाले, "मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता आणि कोव्हिड-19 वॉर्डला असणारा सप्लाय यात त्रुटी राहिल्याने काही रूग्णांना त्रास झाला असू शकतो." पण राज्यात ऑक्सिजनची कमरता नाही याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मात्र यासंबंधी वेगळी भूमिका मांडली.

गोव्याच्या सरकारी रुग्णालयात मंगळवारी (11 मे) सकाळी 26 कोव्हिड रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला आहे की नाही याची पडताळणी व्हावी यासाठी हायकोर्टाने चौकशी करावी अशी मागणी राणे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेत हे मृत्यू ऑक्सिजनपुरवठ्या अभावी झाल्याची शक्यता त्यांनी मांडली आणि मुख्यमंत्र्यांची दिशाभूल झालेली असू शकते अशी टिप्पणीही केली.

"ज्या ठिकाणी ऑक्सिजनच्या 1200 सिलेंडरची गरज आहे तिथे फक्त 400 सिलेंडर आहेत. माझ्या असं निदर्शनास आलं आहे की, अविरत ऑक्सिजन पुरवठा होण्यात काही त्रुटी आहेत. पहाटे दोन ते सहा याच काळात हे मृत्यू का झाले याची चौकशी व्हायला हवी. हायकोर्टाने स्वतंत्ररित्या चौकशी केली तरी आपल्याला याचे कारण सापडू शकते," असं राणे म्हणाले.

प्रमोद सावंत यांनी काय म्हटलं?

दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रुग्णालयाला भेट दिली आणि पीपीई किट घालून कोव्हिड रुग्ण असलेल्या वॉर्डमध्ये जाऊन सगळ्या परिस्थितीची पाहणी केली.

"सरकार रोज 600 ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करणार आहे. येत्या 8-10 दिवसात गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजन प्लँट लावला जाणार आहे. त्यामुळे 20,000 लीटर ऑक्सिजनची व्यवस्था होईल. त्या व्यतिरिक्त या 600 सिलेंडर्सचा रोज पुरवठा होईल जेणेकरुन ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही."

"ऑक्सिजनच्या पुरवठा व्यवस्थित न होण्यास ऑक्सिजन सप्लाय करणारे चालक जबाबदार आहेत," असं सावंत यांनी म्हटलं.

या कामासाठी निष्णात चालकांची आणि स्टाफची भरती करण्यात येईल असे सावंत यांनी म्हटलं. पुढे ते म्हणाले,

"जीएमसी रुग्णालयातील 200 रुग्णांना सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये हलवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जेणेकरून जीएमसी रुग्णालयावरील भार हलका होईल."

गोव्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत गोव्यात कोव्हिडमुळे 1804 इतके रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)