कोरोना : आंध्र प्रदेशमध्ये ऑक्सिजनअभावी 11 रुग्णांचा मृत्यू

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

आंध्र प्रदेशात तिरुपती येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजअभावी किमान 11 कोव्हिड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व रुग्ण रुईया हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल होते.

ऑक्सिजन पुरवठ्याचा दाब कमी झाल्यामुळे ही घटना घडली असून व्हेंटिलेटरवर असलेल्या 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. भारती यांनी सांगितलं.

घटनास्थळी पोहोचलेले चित्तूरचे जिल्हाधिकारी एम. हरी नारायणन यांनी सांगितलं, "ऑक्सिजन सिलिंडर्स पुन्हा लोड होण्यास पाच मिनिटं उशीर झाल्याने हा अपघात झाला. यामुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. सोमवारी (10 मे) रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली."

हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता नसल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे. घटनेनंतर तात्काळ 30 डॉक्टर आयसीयूमध्ये पोहोचल्याचंही त्यांनी सांगितलं.

ते म्हणाले, "ऑक्सिजनचा दबाव जेमतेम पाच मिनिटं कमी होता. त्या दरम्यान एक टँकर पोहोचला सुद्धा, पण ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत होईपर्यंत काही क्षणातच 11 रुग्णांचा मृत्यू झाला."

पाच मिनिटांत ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत करण्यात आला होता त्यामुळे सर्वकाही सुरळीत झालं आणि इतर अनेक रुग्णांचा जीव वाचला असंही ते म्हणाले.

घटनेच्या वेळी हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये आणि ऑक्सिजन बेडवर सुमारे 700 कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरू होते. सर्वसाधारण वॉर्डात इतर 300 रुग्ण होते.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील सर्व हॉस्पिटल्समध्ये सतत देखरेख ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)