कॉक्रोच जनता पार्टीचे पुण्यात आंदोलन, 'शिक्षणाचा जाहीरनामा' प्रसिद्ध; या आहेत घोषणा

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू झाले आहे. आंदोलनस्थळी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हेही सहभागी झाले. यावेळी त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.

या आंदोलनात शिक्षणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. देशात परीक्षांबाबत सुरू असलेल्या गोंधळावर, पेपर फुटीवर काय काय केलं जाऊ शकतं यावर हा जाहीरनामा असेल असं दिपके यांनी सांगितलं.

जाहीरनाम्यात काय आहे?

  • पेपर लीक झाल्यावर विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई म्हणून दर विद्यार्थ्यांना10,000 रुपये सरकारने द्यावेत. जर परीक्षेचा निकाल उशिरा लागला तर निकाल लागेपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला 10,000 प्रति महिना द्यावे.
  • 72 तासांच्या आत बॅकचा पर्याय उपलब्ध असला पाहिजे
  • हाताने लिहिलेले पेपर हातानेच चेक करावेत. पेपर ऑनलाईन चेक करू नयेत.
  • परीक्षेच्या सहा दिवस आधी कम्प्युटर ॲाडिट झालं पाहिजे
  • एनसीईआरटी ने जो नकाशा काढलाय पुस्तकात तो वापस घेतला पाहिजे

आंदोलनस्थळावर काय आहे चित्र?

आंदोलनस्थळी आंदोलक 'इन्कलाब जिंदाबाद', 'कॉक्रोच मांगे रेज्गिनेशन'च्या घोषणा देत होते. अनेकांनी झुरळाचे चित्र असलेले मास्क घातले होते. विद्यार्थ्यांच्या हातात संविधानाची प्रत होती.

पत्रकार परिषदेत काय म्हणाले अभिजीत दिपके?

आंदोलनाच्या आधी अभिजीत दिपके यांनी 11 जूनला पत्रकार परिषद घेतली आणि पुढील रूपरेषा सांगितली होती.

"आम्ही कोणाशीच भांडत नाही. आम्हाला सरकारसोबत भांडायचं नाही ना विरोधी पक्षासोबत भांडायचं आहे. एक कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. त्यांच्यासाठी आम्ही लढत आहोत," असं वक्तव्य कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख (सीजेपी) अभिजित दिपके यांनी केलं आहे.

पुणे येथे आंदोलनापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, अ‍ॅड. असीम सरोदे हे देखील उपस्थित होते.

नीट, सीबीएसईसह विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांमुळे देशातील एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून त्यांच्या भविष्याशी खेळ करण्यात आला आहे.

त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या मागणीसाठी हे आंदोलन केले जात असल्याचे दिपके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.

'धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत आंदोलन'

अभिजित दिपके पुढे म्हणाले, सरकारला आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागेल. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देईपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत. हा देश आंदोलनातूनच घडला आहे.

"मागील 10 ते 12 वर्षांत आंदोलनं बदनाम करण्याचं काम झालं आहे. भारताला स्वातंत्र्य आंदोलनामुळेच मिळालं आहे. आणीबाणीच्या विरोधातही आंदोलन झालं होतं. आंदोलनातूनच देश घडला आहे."

आमचे कोणी मुद्दे मांडत नाही, आमच्यासाठी कोणी लढत नाही, अशी विद्यार्थ्यांची भावना झाली आहे, असंही ते म्हणाले.

पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असल्याने आमच्या आंदोलनाची सुरुवात येथून होत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात नागपूर, लखनौ आणि देशाच्या वेगवेगळ्या भागात अशाच प्रकारचे आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.