एअर इंडिया विमान अपघात ज्याने कॅमेऱ्यात कैद केला, तो आर्यन अहमदाबाद सोडून का गेला?

    • Author, रॉक्सी गागडेकर छारा
    • Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

17 वर्षीय आर्यन सध्या साबरकांठा जिल्ह्यातील आपल्या गावात राहतो. 12 जून 2025 रोजी तो अहमदाबादला आला होता. तेव्हा त्याने एक विमान उडताना पाहिले आणि त्याचं चित्रीकरण केले. पण काही सेकंदांतच ते विमान कोसळलं.

या दुर्घटनेत विमानात असलेल्या 241 प्रवाशांसह एकूण 260 जणांचा मृत्यू झाला होता.

आर्यनने आपल्या मोबाईलवर शूट केलेला हा व्हीडिओ त्या अपघाताचा महत्त्वाचा पुरावा ठरला. 13 जून 2025 रोजी बीबीसी गुजरातीने आर्यनचा शोध घेऊन त्याची मुलाखत घेतली होती. आता एक वर्षानंतर आर्यन आपल्या गावामध्ये राहतो आणि त्याला आता विमानांचे व्हीडिओ करायला भीती वाटते.

आर्यन साबरकांठा जिल्ह्यातील खानपूर गावात आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत राहतो. नुकतीच तो बारावीची परीक्षा पास झाला आहे आणि आता तो कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याच्या तयारीत आहे.

बीबीसी गुजरातीसोबत झालेल्या खास संवादात त्याने मागील एक वर्षभरात आपल्या आयुष्यात झालेले बदल सांगितले. त्याच्या परिसरात त्याला आता एक नवीन ओळख मिळाली आहे. आजकाल त्याचे मित्र आणि आसपासचे लोक त्याला 'व्हीडिओवाला मुलगा' म्हणून ओळखतात.

लग्नसोहळा असो किंवा कॉलेजचा कोणताही कार्यक्रम, लोक त्याला पाहताच पहिला प्रश्न विचारतात की, त्याने हा व्हीडिओ कसा बनवला आणि त्याने त्यादिवशी नेमकं काय पाहिलं होतं?

आर्यन खूप शांत स्वभावाचा असून तो कमी बोलतो. त्याला मोबाईलवर विविध व्हीडिओ काढण्याची आवड आहे. तो घराबाहेर गेला की, आपल्या मोबाईलमध्ये छोट्या-मोठ्या घटनांचे शूटिंग करतो. कदाचित या सवयीमुळेच त्याने एआय-171 विमान अपघाताचा व्हीडिओ रेकॉर्ड केला असावा.

आर्यनने विमानाचा व्हीडिओ कसा शूट केला?

बीबीसी गुजरातीसोबत बोलताना आर्यनने सांगितलं की, तो मेघानी नगरमधील आपल्या घराच्या गच्चीवर उभा होतो.

"मी आणि माझी बहीण गावाहून बसने नुकतंच आलो होतो. मी गच्चीवर उभा होतो आणि माझी बहीण गच्चीवरच्याच एका खोलीत होती. त्या वेळी वडील कामावर गेले होते. आम्ही सकाळी निघालो आणि दुपारी इथे पोहोचलो होतो. मी आजूबाजूच्या घरांचं शुटिंग करत होतो."

आर्यनचं घर विमानतळाच्या धावपट्टीच्या अगदी जवळच आहे. घराच्या एका बाजूला विमानतळाची धावपट्टी आहे, तर दुसऱ्या बाजूला एआय-171 विमान कोसळलेले 'आयजी कॅम्पस' आहे.

तो पुढे सांगतो, "मी पाहिलं की, एक विमान धावपट्टीवरून उड्डाण करत होतं. कुतूहलापोटी मी त्याचा व्हीडिओ काढायला सुरुवात केली. विमान थोडं वर गेलं, मग खाली आलं, पुन्हा एकदा वर गेलं आणि काही क्षणांत पुढे जाऊन कोसळलं. लगेचच तिथे आग लागली आणि धूर दिसू लागला. हे पाहून मी खूप घाबरलो होतो."

त्यानंतर आर्यन लगेचच आपल्या बहीण नीलमकडे गेला आणि तिला विमान कोसळल्याचे सांगितलं. नीलमने बाहेर पाहिलं तेव्हा समोर सर्वत्र धूरच धूर दिसत होता.

बीबीसी गुजरातीशी बोलताना नीलम म्हणाली, "मी लगेच वडिलांना फोन केला. ते थोड्याच वेळात घरी आले. त्यांनी आम्हाला धीर दिला आणि घाबरण्यासारखं काहीही नसल्याचं सांगितलं."

आता सगळेच आर्यनला 'व्हीडिओवाला मुलगा' म्हणतात

व्हीडिओ समोर आल्यानंतर सर्वात आधी बीबीसी गुजरातीने आर्यनशी संपर्क साधला. आर्यन सांगतो, "व्हीडिओनंतर विमानतळ प्राधिकरणाचे (एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया) काही अधिकारी माझ्याकडे आले होते. त्यांनी त्या व्हीडिओबद्दल माहिती घेतली. त्यानंतर बीबीसी गुजरातीच्या टीमने माझ्याशी संपर्क साधला."

त्यानंतर आर्यनचा तो व्हीडिओ व्हायरल झाला आणि तो एका रात्रीतच माध्यमांच्या चर्चेचा विषय बनला.

आर्यनचे वडील मगनभाई असारी यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं की, "माध्यमांचं त्याच्याकडे इतकं लक्ष होतं की, आम्हाला त्याला अहमदाबादहून परत आमच्या साबरकांठ्यातील गावी पाठवावं लागलं. सतत पत्रकारांशी बोलून तो थकून जायचा आणि त्याला कोणाशीही बोलायची इच्छा होत नव्हती. त्यामुळे आम्ही त्याला गावी घेऊन आलो."

गावी गेल्यानंतरही आर्यन खूप प्रसिद्ध झाला. नीलम सांगते, "सगळे लोक त्याला 'व्हीडिओवाला मुलगा' आला असं म्हणायचे."

आर्यन आता उडणाऱ्या विमानांचे व्हीडिओ का काढत नाही?

आर्यन म्हणाला, "सर्वजण मला सांगायचे की, तू खूप प्रसिद्ध झाला आहेस. माझ्या शिक्षकांनीही माझे कौतुक केलं. त्यांनी सांगितलं की, मी चांगलं काम केलं आहे, माध्यमांना आणि या घटनेची चौकशी करणाऱ्यांना मदत केली आहे. हे ऐकून मला आनंद होत होता, पण त्याचवेळी या घटनेबद्दल खूप दुःखही वाटत होतं."

या घटनेनंतर आर्यनने एकाही विमानाचा व्हीडिओ काढलेला नाही. तो म्हणतो, "मला भीती वाटते की, मी पुन्हा एखाद्या विमानाचा व्हीडिओ काढला तर तेही कोसळेल आणि लोकांचा मृत्यू होईल. त्यामुळे मी आता विमानांचे व्हीडिओ काढत नाही."

पण आर्यन आजही विविध कार्यक्रम आणि प्रसंगांचे व्हीडिओ नियमितपणे काढत असतो.

त्याच्या मोबाईलमधील शेवटचा व्हीडिओ हा अहमदाबादहून आपल्या गावाकडे परत जातानाच्या प्रवासाचा आहे. त्याने महामार्गावरील हिरवळ आणि रस्त्यावरील वाहनांचे व्हीडिओ काढले होते.

तो म्हणतो, "अलीकडेच मी एका लग्नाला गेलो होतो. तिथे अनेक लोक माझ्याभोवती जमले होते. सगळे मला माझ्या व्हीडिओबद्दल प्रश्न विचारत होते आणि मी खूप प्रसिद्ध झालो आहे, असं सांगत होते. हे ऐकून मला छान वाटतं, कारण मी असं काही केलं आहे जे इतर कुणीही केलं नव्हतं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)