पश्चिम बंगाल : आपल्या ताफ्यावर हल्ला झाल्याचा केंद्रीय मंत्री मुरलीधरन यांचा दावा

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी आपल्या ताफ्यावर हल्ला केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते व्ही. मुरलीधरन यांनी केलाय.

परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन यांनी याचा एक व्हिडिओ ट्वीट करत म्हटलंय, "पश्चिम मिदनापुरमध्ये टीएमसीच्या गुंडांनी माझ्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गाडीच्या खिडकीच्या काचा फुटल्या."

सोबतच त्यांच्या खासगी कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय. या हल्ल्यामुळे आपल्याला दौरा अर्ध्यात सोडावा लागल्याचं त्यांनी म्हटलंय.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मुरलीधरन यांच्या ताफ्यावरच्या या हल्ल्याचा निषेध केलाय. पश्चिम बंगालमधली कायदा-सुव्यवस्था यंत्रणा उद्धस्त झाली असल्याचं त्यांनी म्हटलंय.

तर भाजप नेते सगळीकडे फिरत लोकांना चिथावणी देत असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी म्हटलंय.

नवीन सरकारला 24 तासही झालेले नसताना ते पत्र पाठवत आहेत, टीम पाठवत आहेत, नेते इथे येत असल्याचं ममतांनी म्हटलंय.

भाजप नेते जनमताचा स्वीकार करू शकत नसल्याचं म्हणत लोकांनी दिलेला निकाल भाजप नेत्यांनी स्वीकारावा, असं आवाहन ममता बॅनर्जींनी केलंय.

दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर पश्चिम बंगालच्या अनेक भागांतून हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. यामध्ये किमान 17 जण मारले गेल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

यासाठी तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचं भाजपने म्हटलंय. तर भाजप कार्यकर्ते हे प्रकार करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केलाय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)