कोरोना व्हायरस : ऑक्सिजन तुटवड्यामुळे 20 रुग्णांचा मृत्यू, ऑक्सिजन टँकर दाखल

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

ऑक्सिजन तुटवड्यामुळे दिल्लीतल्या जयपूर गोल्डन हॉस्पिटलमधल्या 20 रुग्णांचा मृत्यू झालाय.

दिल्लीतल्या रोहिणी भागात असलेल्या जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये आता फक्त अर्धा तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा उरला असल्याचं या हॉस्पिटलने सकाळी म्हटलं होतं.

यानंतर दुपारी साडेबारा वाजल्यानंतर ऑक्सिजन टँकर या हॉस्पिटलमध्ये दाखल झालाय.

या हॉस्पिटलमध्ये 200 रुग्ण असून यापैकी 80 ऑक्सिजन सपोर्ट तर 35 जण ICU मध्ये आहे.

काल रात्री ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अतिशय अत्यवस्थ असणाऱ्या 20 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचं PTI वृत्तसंस्थेने म्हटलंय.

ऑक्सिजन पुरवठ्याची आपण वाट पाहत असून कोव्हिड 19च्या 215 रुग्णांना याची तातडीची गरजच असल्याचं हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालकांनी म्हटलंय.

ज्या 20 जणांचा मृत्यू झाला त्यातले बहुतेकजण कोव्हिड-19चे रुग्ण होते आणि या हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअर युनिटमध्ये अॅडमिट होते, असं हिंदुस्तान टाईम्सने हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांचा दाखला देत म्हटलंय.

हॉस्पिटलकडचा ऑक्सिजन साठा संपल्याने ऑक्सिजनचं प्रेशर कमी झालं आणि या सगळ्या रुग्णांचा मृत्यू झाला.

या हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक दीप बलूजा म्हणाले, "क्रिटिकल केअर युनिटमध्ये हाय प्रेशर ऑक्सिजन पुरवठा देण्यात येत असलेले सगळे पेशंट्स आम्ही गमावले. शुक्रवारी रात्री 10 वाजेपर्यंत आमच्याकडचा लिक्विड ऑक्सिजनचा सगळा साठा संपला. यानंतर आम्ही मेन गॅस पाईपलाईनला जोडलेल्या ऑक्सिजन सिलेंडर्सचा आधार घेतला. पण तिथलं प्रेशर लो असल्याने रुग्णांचा मृत्यू झाला."

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार या हॉस्पिटलला शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत त्यांच्यासाठीचा ऑक्सिजन मिळायला हवा होता, पण मध्यरात्रीपर्यंत हा साठा हॉस्पिटलपर्यंत पोहोचला नव्हता.

20 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही या हॉस्पिटलला गरज आहे त्याच्या फक्त 40 टक्के ऑक्सिजन त्यांना मिळाला आहे.

डॉ. बलूजा म्हणाले, "आमच्यापुढे पुन्हा एकदा संकट उभं आहे. 200 आयुष्यं धोक्यात आहेत. काल रात्री आम्ही खूप जणांचा जीव वाचवला पण आज आम्ही कदाचित असं करू शकणार नाही. बॅकअप म्हणून ठेवलेला ऑक्सिजनही आता संपला आहे."

दिल्लीला ऑक्सिजन द्या, केजरीवालांची सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतातील सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ऑक्सिजनची मागणी केली आहे. केजरीवालांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली.

केंद्र सरकार आम्हाला मदत करत आहेच, असंही अरविंद केजरीवाल यांनी नमूद केलं आहे.

दिल्लीत बऱ्याच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन कमी पडत असल्याचे वृत्त येत आहेत. अशावेळी केजरीवालांनी ही मागणी केली आहे. या पत्राला कुठल्या राज्यातून प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)