संजय राऊत : शरद पवार यांना सोनिया गांधींच्या ऐवजी UPA अध्यक्ष करा - : #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. सोनिया गांधींच्या ऐवजी शरद पवार यांना UPAच्या अध्यक्षपदी बसवा - संजय राऊत

UPAचं पुनर्गठन व्हावं आणि अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे द्यावं, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले, "महाराष्ट्रात जो प्रयोग झाला आहे, तो उत्तम आहे. संपूर्ण देश आमच्याकडे पाहतोय. आम्ही वारंवार आव्हान केलं आहे की, UPAचं पुनर्गठन केलं पाहिजे."

संजय राऊत यांना विचारण्यात आलं की, तुम्ही UPAचे घटक नाहीत. त्यावर ते म्हणाले की, "आता आम्ही NDA(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)तून बाहेर पडलो आहोत. अकाली दलही NDAतून बाहेर पडलाय. ममता बॅनर्जीही UPA किंवा NDA मध्ये नाहीत. असे अनेक प्रादेशिक पक्ष आहेत जे NDA किंवा UPAचे घटक नाहीत. ते UPA मध्ये का नाहीत हा संशोधनाचा विषय आहे."

ते पुढे म्हणाले, "काँग्रेस पक्ष मजबूत व्हायचं असेल तर UPA मजबूत करायला हवं आणि UPAला मजबूत करायचं असेल तर त्याचं नेतृत्व अशा व्यक्तीच्या हाती द्यावे जो अॅक्टिव्ह असेल आणि विरोधकांमध्ये त्यांच्या नावावर सहमती असेल."

तेव्हा असं कुठलं व्यक्तिमत्व आहे ज्याच्या नावावर सहमती होईल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी म्हटलं, "आता तरी फक्त शरद पवार यांचंच नाव समोर येतं. काँग्रेस नेत्यांनी ते स्वीकारायला हवं. शरद पवार यांना UPAचा अध्यक्ष बनवल्यावर UPA अधिक मजबूत होईल."

2. पंधरा हजार सरकारी शाळांमध्ये शौचालय नाही - शिक्षणमंत्री

देशातील 10.8 लाख सरकारी शाळांपैकी 42 हजार शाळांमध्ये पाण्याची व्यवस्थेत कमतरता आणि 15 हजार शाळांमध्ये शौचालयं नसल्याची माहिती शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी लोकसभेत दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं ही माहिती दिली आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना पाणी आणि शौचालयाची सुविधा पुरवण्यासाठी सरकार काय करत आहे, या लेखी प्रश्नावर पोखरियाल यांनी म्हटलं, "सरकारी तसंच खासगी शाळांना वारंवार सूचना करण्यात आल्या आहेत की, सगळ्या शाळांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र शौचालयांची व्यवस्था असावी. तसंच पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी."

3. 'ये तो सिर्फ ट्रेलर है!' - अमित ठाकरे

भांडूप परिसरातील काही शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये प्रवेश केला आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

या प्रवेशाबद्दल अमित ठाकरे यांना विचारलं असता, 'ये तो सिर्फ ट्रेलर है', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ते म्हणाले, "याच भागातील इतर पदाधिकारी सुद्धा येत्या काळात मनसेत प्रवेश करतील. केवळ भांडुपचा नाही तर विक्रोळी आणि मुलुंड परिसरातले विविध पक्षाचे पदाधिकारी येत्या काळात मनसेत प्रवेश करतील.

येत्या काळात अनेक गुजराती बांधव, विक्रोळी परिसरातील मराठी बांधव मनसेत प्रवेश करताना दिसतील. या भागात शिवसेनेला खिंडार पडेल, असं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितलं.

4. फाटलेली जीन्स युवा सांभाळतील, पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय? - उर्मिला मातोंडकर

उत्तराखंडचे भाजपचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे अनेक लोकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनीदेखील ट्विटरवर या मुद्द्यावरुन भाजपला टोला लगावला आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

"फाटलेली जीन्स राज्यातील कर्तबगार युवा सांभाळतील. पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?" असा सवाल उर्मिला मातोंडकर यांनी ट्विटरवर विचारला आहे.

फाटललेली जीन्स घालणारी महिला मुलांना कसे संस्कार देणार, असं वक्तव्य तीरथ सिंह रावत यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलं होतं.

5. महाराष्ट्रात वादळी पावसानं पिकांना झोडपलं

राज्यात कोरोनाचं संकट वाढत चाललं असताना आता अवकाळी पावसाचं संकट देखील समोर उभं राहिलं आहे. नागपूर, वर्ध्यासह विदर्भातील काही भागात अवकाळी पावसानं विजांच्या कटकडाटासह हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे.

हवामानातील बदलामुळे विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 18-21 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)