You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बाळासाहेब ठाकरे यांचे नाव किती ठिकाणी द्यायचे? - देवेंद्र फडणवीस #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव किती ठिकाणी द्यायचे? - देवेंद्र फडणवीस
बाळासाहेबांचे नाव किती ठिकाणी द्यायचे याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. तसंच विवाद होईल अशा ठिकाणी त्यांचे नाव का दिले जात आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. लोकसत्ताने हे वृत्त दिले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला कुठेही, कधीही आमचा विरोध नाही. पण या सरकारने ठरवावं किती ठिकाणी, किती जागांना बाळासाहेबांचे नाव देणार आहोत? गोरेवाडा प्राणीसंग्रहालाय गोंडवानाचा भाग असल्याने आणि तिथल्या गोंड आदिवासी समाजाच्या मागणीमुळे गोंडवाना नाव देण्याचा निर्णय झाला होता."
ते पुढे सांगतात, "मला वाटतं की ही जी मंत्र्यांमध्ये स्पर्धा आहे. बाळासाहेब ठाकरे मोठेच होते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला त्यांचे नाव दिल्याने ते आणखी मोठे होतील असे नाही. पण तरीही आम्ही बाळासाहेबांच्या नावाला कधीही विरोध केला नाही." असेही त्यांनी स्पष्ट केले.
2. थकबाकी न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश - महावितरण
लॉकडॉऊनच्या काळात अधिकचे वीज बिल आकारल्याची तक्रार मोठ्या संख्येने ग्राहकांकडून करण्यात आली. या वीज बिलात सवलत मिळेल अशी अनेक आश्वासने राज्य सरकारने दिली. पण आता महावितरणने ग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.
डिसेंबर 2020 पर्यंत राज्यात 63 हजार 740 कोटी रुपयांचे वीज बिल थकलेले आहे. ग्राहकांनी ही थकबाकी न भरल्यास महावितरणकडून वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिले आहे.
कृषिपंप ग्राहकांकडे 45,498 कोटी, घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांकडे 8485 कोटी रुपये, उच्चदाब ग्राहकांकडे 2435 कोटी रुपये प्रलंबित आहेत.
थकबाकी असलेल्या ग्राहकांना प्रलंबित वीज बिल टप्प्याटप्प्याने भरता येणार आहे. तसंच बिल उशिरा भरल्याने अधिकचे पैसे आकारले जाणार नाहीत असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
3. भारत बायोटेकचे अखेर स्पष्टीकरण, कोव्हॅक्सिन लस कोणी घेऊ नये?
रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यास, रोगप्रतिकारक शक्ती कमी करत असलेले एखादे औषध घेत असल्यास आणि अॅलर्जी असलेल्या नागरिकांनी कॉव्हॅक्सिन लशीचा डोस घेऊ नये अशी माहिती भारत बायोटेकने दिली आहे. एनडिटिव्हीने हे वृत्त दिले आहे.
यापूर्वी सरकारने रोगप्रतिकारक शक्ती कमी असली तरीही लस घेण्यास हरकत नाही पण अशा नागरिकांमध्ये लशीचा प्रभाव कमी दिसेल असे सांगितले होते. आता मात्र लस बनवणाऱ्या भारत बायोटेकने याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
भारत बायोटेकच्या परिपत्रकात म्हटल्यानुसार, ज्यांना अॅलर्जीचा इतिहास आहे, ज्यांना ताप आहे, ज्यांना रक्तस्त्रावाचा विकार आहे, गर्भवती किंवा स्तनपान करणारे आणि आरोग्याशी संबंधित इतर कोणत्याही गंभीर समस्या असलेल्यांना कोवाक्सिनची लस देऊ नये.
भारतात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लशीची मोहिम सुरू झाली. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत लस घेतलेल्या 580 नागरिकांमध्ये लशीचे दुष्परिणाम दिसून आले आहेत.
4. सरपंचपदासाठी आरक्षणाची सोडत कधी?
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर सरपंच आणि उपसरपंच निवडीच्या प्रक्रियेसाठी मोर्चेबांधणी सुरू झालीय. पण सरपंचपदाच्या आरक्षणावर राजकीय डावपेच अवलंबून असल्याने आरक्षणाची सोडत कधी निघणार? असा प्रश्न विचारला जातोय.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत बोलताना सांगितले, "पुढील आठ ते दहा दिवसांत सरपंचपदासाठी आरक्षण सोडत करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. आरक्षणाची सोडत साधारण आठवड्याभरात सुरू करा असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयांना देण्यात आले आहेत," लोकमतने हे वृत्त दिले आहे.
यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षण आधीच जाहीर न करण्यात आल्याने मतदानाची टक्केवारी चार टक्क्यांनी वाढल्याचेही त्यांनी सांगितले.
5. बंडखोरी झालेल्या नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी स्वत: मैदानात उतरणार
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालीय. तृणमूल काँग्रेससमोर नंदीग्राममध्ये बंडखोरीचं आव्हान उभं राहिलं. आता त्याच नंदीग्राम मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केलीय.
तृणमूल काँग्रेसमध्ये नंदीग्राममधून अनेक वर्ष सक्रिय राहिलेल्या शुभेंदू अधिकारी यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला.यानंतर ममता बॅनर्जींनी नंदीग्राममध्ये शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभा घेतली. या सभेतच त्यांनी ही घोषणा केली. एबीपी माझानं हे वृत्त दिले आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, "नंदीग्राम माझ्यासाठी पवित्र आहे. त्यामुळे मला असे वाटते मी इथून निवडणूक लढवली पाहिजे. आमच्या प्रदेशाध्यक्षांना मी विनंती करते की त्यांनी मला यासाठी परवानगी द्यावी."
आतापर्यंत ममता बॅनर्जी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होत्या. पण आता त्या नंदीग्राम आणि भावनीपूर अशा दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवणार का? की केवळ नंदीग्राममधून हे अद्याप स्पष्ट नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)