राहुल गांधी : मी नरेंद्र मोदींना घाबरत नाही, पण गोळी मारतील

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

राहुल गांधी यांनी आज (19 जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली. शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं राहुलं गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

"माझं एक व्यक्तिमत्व आहे. मी ना नरेंद्र मोदींना घाबरत, ना इतर कुणाला घाबरत. मी स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे. मला हे लोक स्पर्शही करू शकत नाहीत. हा, गोळीने मारू शकतात," असं म्हणत राहुल गांधी पुढे म्हणाले, "मी देशभक्त आहे. माझ्या देशाचं रक्षण करतो आणि यापुढेही करत राहीन. मी एकटा उभा राहीन, पूर्ण देश एका बाजूला झाला तरी देशासाठी उभा राहीन."

यावेळी राहुल गांधी यांनी भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावर देखील तोफ डागली. नड्डा यांनी ट्वीट केलेल्या प्रश्नांना उत्तप देतांना त्यांनी जे पी नड्डा कोण आहेत असा देखील सवाल केला.

"राहुल गांधी कोण आहे, काय करतो, हे हिंदुस्तानातील प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे. शेतकऱ्यांना माहिती आहे, घट्टा परसौलमध्ये जे. पी. नड्डा नव्हते. मी तर त्यांना तिथं पाहिलं नाही. जमीन संपादनावेळी नड्डा-मोदीजी नव्हते, राहुल गांधीच होता. शेतकऱ्यांच्या जमिनीवेळी, कर्जमाफीवेळी काँग्रेस उभी राहिली. नड्डा कुठेच नव्हते," असं म्हणत राहुल गांधी यांनी जे पी नड्डा यांच्यावर टीका केली.

शेतकरी मोदींपेक्षा हुशार - राहुल गांधी

राहुल गांधी पुढे म्हणाले, "जर तुम्ही गेल्या 6-7 वर्षांपासून पाहिल्यास प्रत्येक क्षेत्रात चार-पाच लोकांचाच एकाधिकार वाढत जातोय. विमानतळ असो वा टेलिकॉम, सर्व ठिकाणी याच लोकांची एकाधिकारशाही आहे. या देशाचे चार-पाच नवे मालक आहेत. आतापर्यंत शेतीत एकाधिकारशाही नव्हती. आतापर्यंत शेतीचा फायदा शेतकरी, मजूर, माध्यमवर्ग आणि गरिबांना मिळत होता."

कृषी कायद्यातील तरतुदी काँग्रेसच्या अजेंड्यावरही होत्या, असा आरोप भाजपनं केल्यानंतर, राहुल गांधींनी उत्तर दिलं, "काँग्रेसनं कृषी क्षेत्रात सुधारण्याचं बोललं होतं, पण हे क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचं बोललो नव्हतो. आमच्या कुठल्याच कायद्यात हे लिहिलं नव्हत की, शेतकरी कोर्टात जाऊ शकत नाही किंवा बाजार समित्या नष्ट केल्या जाऊ शकतात."

केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही नव्या कृषी कायद्यांवर राहुल गांधी यांनी टीका केली. "एक व्यवस्था होती, जी यांची मदत करायची. त्यात बाजार समित्या आणि जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्याचा समावेश होता. कायदेशीर व्यवस्था समाविष्ट होती. केंद्र सरकार तिन्ही नव्या कायद्यांमार्फत शेतकऱ्यांबाबत स्वातंत्र्यापूर्वीची व्यवस्था आणू पाहतंय. संपूर्ण भारतातील शेती या चार-पाच लोकांकडे नरेंद्र मोदी देत आहेत. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर आले आहेत," अस राहुल गांधी म्हणाले.

"केंद्र सरकार आणि त्यांच्या अहंकाराला वाटतं की, शेतकऱ्यांना थकवलं जाऊ शकतं, मुर्ख बनवलं जाऊ शकतं. मात्र, शेतकऱ्यांना ना थकवलं जाऊ शकतं, ना मुर्ख बनवलं जाऊ शकतं," असं राहुल गांधी म्हणाले.

तसंच, पंतप्रधानांपेक्षा जास्त समज देशातील शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे तिन्ही कायदे मागे घ्यावेत, हाच यावरील उपाय आहे, अशी मागणीही त्यांनी केली.

'बालाकोट'ची माहिती आधीच पत्रकाराला देणं गुन्हेगारी कृत्य - राहुल गांधी

यावेळी राहुल गांधी यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या लीक झालेल्या चॅट्सवरही भाष्य केलं.

राहुल गांधी यांनी म्हटलं, "एका पत्रकाराला बालाकोटची घटना घडण्याआधीच संरक्षण खात्यातील माहिती दिली जाते. त्याच पत्रकाराने पुलवामानंतर म्हटलं की, हे आपल्यासाठी खूप चांगलं झालं."

ही माहिती अर्णब गोस्वामींना माहिती असेल, तर पाकिस्तानलाही माहिती असेल, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

"बालाकोटसारख्या मिशनची माहिती केवळ चार-पाच लोकांकडेच असते. पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री, एअर चीफ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनाच माहिती असते. पण बालाकोटसारख्या मिशनवेळी पायलटलाही शेवटच्या मिनिटाला माहिती दिली जाते. म्हणजे, या पाचपैकी कुणीतरी अर्णब गोस्वामींना माहिती दिली," असंही राहुल गांधी म्हणाले.

तसंच, "हे गुन्हेगारी कृत्य आहे आणि ज्यांनी दिले ती व्यक्ती व पत्रकार यांना तुरुंगात जावं लागेल. ही प्रक्रिया सुरू व्हायला हवी. पण ही प्रक्रिया होणार नाही. कारण पंतप्रधानांनीच माहिती दिली असेल," असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)