You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भीमा कोरेगाव: वरवरा राव कुटुंबीयांना दिलासा नाही, तपासणीसाठी डॉक्टर तुरुंगात पाठवण्याचा आदेश
भीमा कोरेगाव प्रकरणात अटकेत असलेले तेलुगू कवी आणि लेखक वरवरा राव यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. गुरुवारी (12 नोव्हेंबर) मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणी पार पडली. राष्ट्रीय तपास यंत्रणांना (NIA) हे निर्देश दिले आहेत.
यापूर्वी त्यांची तपासणी नानावटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केल्याने पुन्हा तिथेच तपासणी करण्यात यावी असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
न्यायालयाने म्हटले, "व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून डॉक्टरांना आरोग्य तपासणी करणं शक्य नसल्यास त्यांनी लवकरात लवकर तळोजा तुरुंगात जावून वरवरा राव यांची तपासणी करावी." 16 नोव्हेंबरपर्यंत याचा अहवाल सादर केला जावा असंही न्यायालयाने स्पष्ट केले.
वरवरा राव यांच्या पत्नी पेंड्याला हेमलता यांनी तळोजा तुरुंगातून त्यांची सुटका करण्याची मागणी केली होती.
तुरुंग अधिकारी 2018 पासून योग्य वैद्यकीय उपचार देत नसल्याची तक्रारही त्यांनी याचिकेत केली होती. न्यायमूर्ती ए. के. मेनन आणि न्यायमूर्ती एस. पी. तावडे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.
81 वर्षांचे वरवरा राव एल्गार परिषद प्रकरणी गेल्या दीड वर्षांपासून तुरुंगात आहेत. राव यांचं वय आणि ढासळणारी तब्येत यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांची आहे.
29 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाला या याचिकेवर त्वरित निर्णय घेण्यास सांगितले होते. राव यांच्याबाबतीत अधिकाऱ्यांनी राज्यघटनेच्या आणि आंतरराष्ट्रीय कराराच्या अनुच्छेद 21 नुसार वैयक्तिक स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. या आधारावर त्यांनी राव यांच्या सुटकेची मागणीही केली.
राव यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात यावे आणि त्यांच्या तपासणीसाठी वैद्यकीय तज्ज्ञांची नेमणूक करावी अशीही मागणी याचिकेत केली आहे.
गुरुवारी (12 नोव्हेंबर) पी. हेमलता यांच्या वकील इंदिरा जयसिंग यांनी युक्तिवाद करताना राव यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची मागणी केली.
त्या म्हणाल्या,"राव यांना डिमेन्शिया झाला आहे. त्यांच्या मूत्रमार्गाची अवस्था गंभीर झाली असून वेळेत उपचार केले नाहीत तर त्यांना जीव गमवावा लागेल. हे तुरुंगात असताना मृत्यू झाल्याचे प्रकरण बनेल."
एनआयएने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, "राव यांची तब्येत चांगली नाही, पण तळोजा तुरुंगातील डॉक्टर नियमितपणे त्यांच्या प्रकृतीची तपासणी करत होते आणि आवश्यक ते सर्व उपचार देत आहेत."
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हायकोर्टाने राव यांच्यावर लवकरात लवकर उपचार करण्यात यावेत असे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी 17 नोव्हेंबर रोजी होणारआहे.
साधारण पाच महिन्यांपूर्वी बेशुद्ध झाल्याने वरवरा यांना जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना पाईल्स आणि हृदयाशी संबंधित आजार आहे. अल्सर आणि रक्तदाबाच्या गोळ्या सुरू आहेत. राव यांना जामीन देण्यात यावा यासाठी कुटुंबीयांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
ही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)