You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मीर : भाजपचे 3 स्थानिक नेते कोण होते ज्यांची हत्या झाली?
- Author, माजिद जहांगीर
- Role, बीबीसी हिंदीसाठी, श्रीनगरहून
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
"तुला कुणी मारलं बाळा. आम्हाला सोडून तू कुठे निघून गेलास. तुझी पोर तुझी वाट बघतेय. तुझ्याविना आम्ही कसं जगणार," भाजप कार्यकर्ते फिदा हुसैन यांच्या आई शकीला बानो मुलाच्या मृत्यूने कोलमडून गेल्या होत्या.
दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातल्या यारी खोशपुरा गावात घराबाहेर बसलेल्या शकीला बेगम यांना दुःख अनावर झालं होतं. त्यांच्या आसपास अनेकजणी जमल्या होत्या. त्या त्यांना धीर देत होत्या.
शुक्रवारी (30 ऑक्टोबर) फिदा हुसैन, उमर रहमान आणि हारून रशीद यांच्या घरांबाहेर सारखंच दृश्य होतं.
तिघांच्याही कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता. या तिघांच्या हत्येनंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
दक्षिण काश्मीर हा कट्टरतावाद्यांचा दबदबा असलेला भाग मानला जातो.
श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गापासून केवळ तीन किमी अंतरावर यारी खोशपुरा आहे. इथे बरेच सुरक्षा कॅम्प आहेत.
गुरुवारी संध्याकाळी उशिरा फिदा हुसैन (30) आणि त्यांचे दोन सहकारी उमर रहमान (19) आणि हारून रशीद बेग यांना त्यांच्याच गावात ठार करण्यात आलं.
हे तिघेही भाजप कार्यकर्ते होते आणि लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेने या तिघांची हत्या केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
मुलीच्या वाढदिवसाचा केक आणण्यासाठी गेले होते फिदा
शुक्रवारी फिदा हुसैन आणि उमर रहमान यांच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येनं स्थानिक सहभागी झाले होते. तर हारूश रशीद शेजारच्या सुपत गावचे होते.
फिदा हुसैन यांचे वडील गुलाम मोहम्मद इटू सरकारी शाळेत शिक्षक आहेत. फिदा त्याच्या मुलीच्या वाढदिवसासाठी केक आणायला गेले होते, असं ते सांगतात.
गुलाम मोहम्मद म्हणाले, "नेहमीप्रमाणे तो कामासाठी सकाळीच घराबाहेर पडला. तो कुठे गेलाय, मला माहिती नव्हतं. रात्री जवळपास 8 वाजता आम्ही गोळ्या झाडण्याचा आवाज ऐकला. यात जखमी झालेल्या एका व्यक्तीने आम्हाला फोन करून घटनेची माहिती दिली. आम्ही 20 मिनिटांत घटनास्थळी पोहोचलो. आम्ही पोहोचलो तेव्हा तिघे गाडीत होते आणि तिघांचाही मृत्यू झाल्याचं आम्हाला दिसलं. आम्ही तिघांनाही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. पण त्यांचे प्राण वाचू शकले नाही. वाढदिवसाचा केक गाडीतच होता. त्याच्या मुलीचा वाढदिवस होता. ती जेमतेम वर्षभराची झालीय."
फिदाच्या घरापासून अर्धा किमी अंतरावर तिघांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
फिदाचे वडील गुलाम मोहम्मद यांनी सांगितलं, "तिघांजवळ कुठलंही हत्यार नव्हतं. निष्पाप लोकांना मारण्यात कसलं आलंय धाडस? हे भेकडपणाचं काम आहे. ते नरकात जातील.
"त्याच्याकडे सुरक्षा नव्हती. काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या सूचनेनुसार त्याला सिक्युरिटी झोनमध्ये पाठवण्यात आलं होतं. पण 10 दिवसातच तो परतला होता. मुलीची आठवण येते म्हणाला होता," फिदाने बीफॉर्मचं शिक्षण पूर्ण केलं होतं.
भाजप नेते सिक्युरिटी झोनमध्ये का नव्हते?
काश्मीर झोनचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी यारी खोशपुरामध्ये पत्रकारांशी बोलताना हा लश्कर-ए-तोएबाच्या अतिरेक्यांचा पूर्वनियोजित कट असल्याचं म्हटलं.
ते म्हणाले, "अल्ताफ नावाच्या स्थानिकाच्या अल्टो कारमध्ये बसून अतिरेकी फिदाच्या कारजवळ आले आणि त्यांनी बेछूट गोळीबार केला. गोळीबारात ते जखमी झाले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला."
अल्टो कार तेलवानी गावाजवळून जप्त करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
भाजप कार्यकर्ते तिथे का फिरत होते? यावर उत्तर देताना विजय कुमार म्हणाले, "5 ऑगस्टपूर्वीच ज्यांना धोका होऊ शकतो अशा 1619 लोकांची यादी तयार करण्यात आली होती. पहलगामच्या सिक्युरिटी झोनमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं. मात्र, फिदा एक शपथपत्र देऊन तिथून बाहेर पडले होते."
ठार झालेले सर्वजण आपल्या घरापासून इतक्या लांब काय करत होते, याचा पोलीस तपास करत आहेत.
फिदाला 8 गोळ्या लागल्याचं त्यांचे चुलत भाऊ सज्जाद अहमद यांनी सांगितलं.
फिदाच्या मागे त्यांच्या पत्नी, मुलगी, सहा बहिणी आणि आई-वडील आहेत.
घटनेच्या आधी फिदा भेटायला आला होता आणि त्याने काही पैसे उसने घेतले होते, असं फिदाचे आणखी एक चुलत भाऊ जहांगीर अहमद यांनी सांगितलं.
ते म्हणाले, "त्याने मला दुपारी 3 वाजता फोन केला होता. त्याला 11 हजार रुपये हवे होते. तो लेवडोरामधल्या माझ्या घरी आला आणि पैसे घेतले. त्याच्यासोबत इतरही दोघे होते. त्यांचाही या घटनेत मृत्यू झाला आहे. संध्याकाळी एका लग्नात जाणार असल्याचं त्याने मला सांगितलं होतं. पण संध्याकाळी मला कळलं की फिदावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. आम्ही घटनास्थळी पोहोचलो त्यावेळी गाडीतच तिघांचाही मृत्यू झाला होता."
'विचारधारेला विचारांनी उत्तर द्यावं'
विचारधारेच्या आधारे कुणाला ठार करणं चुकीचं असल्याचं फिदाचे मित्र आशिक हुसैन यांचं म्हणणं आहे.
ते म्हणाले, "कुणी एखाद्या राजकीय विचारसरणीविषयी सांगत असेल तर त्याला राजकीय स्वरुपात उत्तर द्यायला हवं. पण तुम्ही त्याला ठार कसं करू शकता? कुणालाही ठार करणं आंतरराष्ट्रीय कायदा आणि इस्लामविरोधी आहे."
या हत्याकांडानंतर गावात भीतीचं वातावरण आहे आणि म्हणूनच सरकार आणि इतर नेत्यांनी पुढे येऊन परिस्थिती हाताळायला हवी, असं आशिक हुसैन म्हणतात.
गुरुवारच्या हल्ल्यात उमर रहमान यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या गावातही शोकाकुल वातावरण आहे.
त्यांच्या घराबाहेर मोठा जमाव होता.
उमर रहमान यांचे काका मोहम्मद शाबान बीबीसीला संतप्त प्रतिक्रिया देताना म्हणाले, "त्यांना (कट्टरतावाद्यांना) वाटतं की ते जिहाद करत आहेत. निष्पापांना ठार करणं जिहाद आहे का? तो महिनाभरापूर्वीच तामिळनाडूहून परतला होता. तो साधा आणि गरीब मुलगा होता."
उमर भाजपचा कार्यकर्ता असल्याचा त्यांनी इन्कार केला आहे.
मात्र, उमर भाजपचे सदस्य होते, असं काश्मीर भाजपचे मीडिया इंचार्ज मंजूर अहमद यांचं म्हणणं आहे.
उमर यांचे कुटुंबीय घाबरले असल्याने ते सत्य सांगत नसल्याचं भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या दुसऱ्या एका सदस्याचं म्हणणं आहे.
भाजप कार्यकर्ते का आहेत निशाण्यावर?
काश्मीरमध्ये सुरक्षेतल्या त्रुटीसाठी पोलीस जबाबदार असल्याचं भाजपचं म्हणणं आहे.
काश्मीर भाजप प्रवक्ते अल्ताफ ठाकूर म्हणतात, "कुलगाममध्ये आमचे जिल्हाध्यक्ष एसपी यांना सुरक्षेविषयी लिखित निवेदन दिलं होतं. काही घडल्यास भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांना योग्य सुरक्षा पुरवण्यासाठी योग्य पावलं उचलू, असं आश्वासन त्यावेळी एसपींनी दिलं होतं. मारले गेलेल्या लोकांच्या थडग्यांना सुरक्षा देणार का, असं मी त्यावेळी म्हटलं होतं.
"एसपींनी या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवी. मी उप-राज्यपाल, डीजीपी आणि आयजींना या प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे. या भागात यापूर्वीही आमच्या दोन कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. मात्र, त्या प्रकरणामध्येही अजून कारवाई झालेली नाही. यात सामान्य लोक होते, असं एसपी म्हणाले होते. मात्र, पक्षाने पत्रक काढल्यानंतर त्यांनी हे भाजप कार्यकर्ते असल्याचं मान्य केलं होतं."
भाजप कार्यकर्त्यांनाच का लक्ष्य करण्यात येतंय? या प्रश्नावर ठाकूर म्हणतात, "आमचा राष्ट्रवादी पक्ष आहे. आम्ही भारत माता की जय म्हणतो आणि आम्ही काश्मीरमध्ये लोकांना पक्षाशी जोडण्याचं काम हाती घेतलं आहे. पाकिस्तानची साथ असणारे अतिरेकी याला धक्का पोहोचवू इच्छितात. त्यातूनच अशा प्रकारच्या घटना घडत आहेत."
गेल्या तीन महिन्यात काश्मीर खोऱ्यात कमीत कमी 8 भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांची संशयित अतिरेक्यांनी हत्या केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)