You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
यश गांधी: लटपटणाऱ्या पायांनी न डगमगता IIM पर्यंत भरारी
- Author, मधु पाल
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
'इच्छा असेल तर मार्ग दिसेल' असं म्हणतात. असंच काहीसं मुंबईत राहणाऱ्या 21 वर्षांच्या यश अवधेश गांधीनं त्याच्या आयुष्यात करून दाखवलंय.
आयुष्यातील सर्व आव्हानांचा सामना करत यश गांधी IIM लखनौपर्यंत पोहोचला आहे.
यशचा IIM लखनौपर्यंत पोहोचण्याचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. कारण सेरेब्रल पाल्सी आणि डिस्लेक्सिया यांसारख्या अत्यंत गंभीर आजाराने यश त्रस्त आहे. लटपटत चालणाऱ्या यशचं स्वप्नांच्या दिशेनं जाताना मात्र अजिबात लटपटला नाही.
अनंत अडचणीनंतरही यशने मॅनेजमेंटसाठीची कॉमन एन्ट्रन्स टेस्ट अर्थात CAT ची तयारी केली आणि 92.5 गुण मिळवून उत्तीर्ण झाला. यशने केवळ पालकांचंच नाव मोठं केलं नाही, तर अनेक तरुणांसाठी तो आदर्श ठरलाय.
यशला ज्याप्रकारचे आजार आहेत, अशा विद्यार्थ्यांना परीक्षा देताना रायटरची आवश्यकता भासते. कारण ते स्वत:च्या हाताने पेपर लिहू शकत नाहीत.
'मी स्वत:ला इतर मुलांसारखंच मानतो'
सेरेब्रल पाल्सी आणि डिस्लेक्सिया यांसारख्या आजारांमध्ये शरीरातील आवश्यक स्नायू कमकुवत होतात. IIM लखनौमध्ये 2020-22 या शैक्षणिक वर्षासाठी दिव्यांग कोट्यातून यश गांधी दाखल झालाय. यशचे गुण पाहता त्याला मोठमोठ्या IIM संस्थांकडून प्रस्ताव आले. मात्र, यशने IIM लखनौची निवड करण्याचा निर्णय घेतला.
बीबीसी हिंदीशी बोलताना यश म्हणाला, "लहानपणापासूनच मला अभ्यासाची आवड आहे. अभ्यास हेच आयुष्य बनवलं. त्यामुळे अभ्यासात कुठलीच अडचण आली नाही. बारावीतच मी ठरवलं होतं की, मला पुढे MBA कराचंय आणि तेव्हाच त्यादृष्टीने तयारी सुरु केली. 2019 मध्ये CAT साठी अर्ज भरला."
आजवरच्या संघर्षमय प्रवासाबद्दल आठवत यश सांगतो, "लहानपणापासूनच अभ्यासात रस होता. मात्र, गणित समजायला मला थोडा त्रास व्हायचा. माझं लेखनही नीट व्हायचं नाही."
"मी प्रचंड नाराज असायचो. अगदी MBA चं स्वप्न मनातून काढून टाकण्याचाही विचार आला. पण मग माझ्या आई-वडिलांनी मला समजावलं. तसंच, बारावीत शिकणारा माझा लहान भाऊ हर्षलने मला गणित विषय शिकवला आणि माझी देखभालही केली," असं यश सांगतो.
यश म्हणतो, "काही लोकांनी मला समजावण्यासाठी खूप प्रयत्न केले, मदत केली, मात्र काहीजणांनी थोडीशी इच्छाही दर्शवली नाही. पण मला त्यांच्या भूमिकेनं फरक पडत नाही. कारण मी मला कुणापेक्षा कमी समजत नाही. इतर सर्वसामान्य लोकांप्रमाणेच मी मला मानतो. आपण स्वत:मुळे कधीच निराश व्हायला नको. एखादी गोष्टी आपल्याने होणार नाही, असाही आपण विचार करायला नको. माझ्या अनुभवावरून मी केवळ एवढंच सांगू शकतो की, वेळ लागेल, पण काही अशक्य नाही."
भारतातल्या सर्वात मोठ्या कंपनीत काम करण्याचं यशचं स्वप्न आहे.
'जन्मानंतर हालचालच होत नव्हती'
यशच्या यशस्वी वाटचालीत त्याच्या आई-वडिलांचा मोठा वाटा आहे. यशचे वडील अवधेश गांधी एका खासगी कपंनीत काम करतात, तर आई जिग्ना शाह घरातून टिफिन सर्व्हिस चालवतात.
यशचे वडील अवधेश गांधी म्हणतात, "यश ज्यावेळी जन्मला, तेव्हा त्याचं शरीर अजिबात हालचाल करत नव्हतं. यश जेव्हा सात महिन्यांचा झाला, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की, मोठा होईपर्यंत याची सर्व देखभाल करावी लागेल.
यशनं स्वत:च्या पायावर उभं राहावं, एवढंच आमचं ध्येय होतं. कारण आम्ही आज आहोत, उद्या नसू. तेव्हा त्यानं कुणावर अवलंबून राहू नये. त्यामुळे त्याचे सर्व दु:ख-वेदना आम्ही सहन करायला तयार होतो, पण त्याला स्वत:च्या पायावर उभं राहिलेलं पाहायचं होतं."
'इतर मुलांपेक्षा अधिक मेहनत करावी लागली'
यशनं प्रचंड मेहनत घेतल्याचं त्याचे वडील सांगतात. ते म्हणतात, "यशला आम्ही तो लहान असल्यापासूनच सर्वसामान्य मुलांच्या शाळेतच प्रवेश दिला. शाळेत त्याला शिकताना बरेच अडथळे यायचे आणि इतर विद्यार्थ्यांसोबतच्या स्पर्धेत तो कमी पडायचा. मात्र, हळूहळू तो शिकत गेला."
मुलाचं कौतुक करताना अवधेश गांधी यांची छाती अभिमानाने फुलून येते.
"सर्वसामान्य मुलांपेक्षा माझ्या मुलाला अधिक मेहनत करावी लागली, तरीही कॉलेजमध्ये तो पहिल्या रँकने उत्तीर्ण झाला. मी खूप आनंदी आहे, कारण मी जेव्हा प्रवेश फी भरली, तेव्हा यश दोन दिवस रडत होता. कारण CAT ची परीक्षा उत्तीर्ण झालो नाही, तर वडिलांचे पैसे फुकट जातील, असं त्याला वाटत होतं," असं अवधेश गांधी मुलाबद्दल सांगतात.
"कोचिंगसाठी दिलेले पैसे परत मिळत नाहीत, तेव्हा तो मला म्हणायचा की, काही काळासाठी मी नोकरी करतो. मात्र, आम्ही त्याला समजावलं की, जरी यश मिळालं नाही, तर जास्तीत जास्त काय होईल, तू प्रयत्न तर करा," असं अवधेश गांधी सांगतात.
यश गांधी आता त्याच्या नव्या प्रवासाला पूर्णपणे तयार आहे. यश म्हणतो, "आता IIM लखनौमध्ये प्रवेश मिळाल्यानं मी खूप खुश आहे आणि ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून सध्या अभ्यास करतोय. इथेही थोडा संघर्ष आहेच. अनेक तास लॅपटॉपसमोर बसून राहावं लागतं. मात्र, या नव्या संघर्षासाठी मी तयार आहे. कारण मला वाटतं की, आयुष्यात तुम्हा सर्व तेव्हाच मिळतं, जेव्हा तुम्ही अडचणींचा सामना करता."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)