You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत चीन सीमावाद: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनच्या ताब्यात 1000 स्क्वे. किमीचा प्रदेश
आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनच्या ताब्यात 1000 स्क्वे. किमीचा प्रदेश
लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ अंदाजे 1,000 स्क्वेअर किमीवर चीनचा ताबा असल्याचं द हिंदूने म्हटलं आहे.
अधिकाऱ्यांनी द हिंदूला सांगितले, "पेट्रोलिंग पॉइंट 10-13 पासून देपसांग प्लेन्स या भागावर (हा भाग भारताचा आहे अशी धारणा आहे) असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच 900 स्क्वेअर किमीच्या भूभागावर सध्या चीनचा ताबा आहे."
एप्रिल आणि मे या कालावधी दरम्यान चीनने आपली गस्त वाढवून या भागावर आपली पकड मजबूत केली आहे.
जून 15 ला गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे 20 सैनिक मृत्युमुखी पडले होते. द हिंदूने सांगितले आहे की देपसांग प्लेन ते चुसुल या भागात चीनने अगदी व्यवस्थितरीत्या आपलं सैन्य घुसवलं आहे. गलवान व्हॅलीत 20 स्क्वेअर किमी, हॉट स्प्रिंग्समध्ये 12 स्क्वेअर किमी, पॅंगाँग भागात 65 स्क्वेअर किमी आणि चुसुल भागात 20 स्क्वेअर किमी चा भूभाग चीनच्या ताब्यात आहे.
2. ज्यांना इतर राज्यांची सुरक्षा हवीये त्यांनी आपलं चंबूगबाळ आवरावं- संजय राऊतांचं कंगनाला प्रत्युत्तर
मला मुव्ही माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते, असं ट्वीट करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतला शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'पोलिस यंत्रणेवर अविश्वास दाखवताय. कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल कर त्यांनी आपलं चंबूगबाळं आवरावं आणि आपल्या राज्यात जावं,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
भाजप नेते राम कदम यांच्या ट्वीटला उत्तर देताना कंगनानं मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटत असल्याचं म्हटलं होतं.
'या राज्यावर, पोलिसांवर विश्वास नाही. तुम्ही इकडे मीठ खाताय, ही तर बेईमानी आहे. अशा व्यक्तींच्या मागे राजकीय पक्ष उभे राहत असतील तर हीसुद्धा बेईमानी आहे. त्यामुळं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी या विषयावर गांभीर्यानं दखल घेऊन या लोकांवर कारवाई केली पाहिजे,' अशी मागणी कंगनाच्या ट्वीटनंतर संजय राऊत यांनी सरकारकडे केली आहे.
3. व्हायरल झालेला 1800 रुपयांचा व्हीडिओ आमच्यासाठी आव्हान- यशोमती ठाकूर
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 1800 रुपयांच्या व्हीडिओमुळे अनेकांची करमणूक झाली असली, तरी राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने हा व्हीडिओ गांभीर्यानं घेतला आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी याबद्दल एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, मेहनत करून घरकाम करणाऱ्या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे. हिशोबात चूक होणं हा थट्टेचा विषय असू शकत नाही. 'लोकमत'नं ही बातमी दिली आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात. ही घटना आम्ही आमच्यासाठी आव्हान म्हणून पाहत आहोत, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं. आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असंही ठाकूर यांनी म्हटलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडिओत संबंधित महिलेला तरुण पाचशेच्या तीन नोटा, दोनशेची एक नोट आणि शंभरची एक नोट दिल्याचं समजावत आहेत आणि ती महिला मला माझे अठराशे रुपये हवेत म्हणून हुज्जत घालत आहे.
या व्हीडिओचा वापर करून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आर्थिक साक्षरता, घसरलेला जीडीपी याविषयी मोदी सरकारवर निशाणा साधला होता.
4. प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं सोमवारी (30 ऑगस्ट) निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात सर्व शासकीय इमारतींवरचा भारताचा तिरंगा झेंडा हा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. तसेच या काळात कोणत्याही पद्धतीचे शासकीय मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
मंगळवारी (31 ऑगस्ट) सकाळी १० वाजता त्यांचं पार्थिव हे राहत्या घरी आणलं जाईल. यानंतर काही काळासाठी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. सध्या करोनामुळे निर्माण झालेलं वातावरण लक्षात घेता सर्व नियमांचं पालन करुन शासकीय इतमामात मुखर्जी यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
5. चीनच्या घुसखोरीप्रकरणी अजित डोभाल यांची आढावा बैठक
पेंगाँग लेक परिसरात चीननं पुन्हा घुसखोरी केल्याची माहिती भारतीय लष्करानं सोमवारी (31 ऑगस्ट) दिली होती. या घडामोडीनंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय पॅनलनं या घटनेची चौकशी केली. या बैठकीला गुप्तचर यंत्रणांच्या प्रमुखांसह लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अजित डोभाल यांना माहिती दिली. NDTV इंडियानं ही बातमी दिली आहे.
इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक अरविंद कुमार आणि 'रॉ'चे सचिव सामंत गोयल यांनी येत्या काही महिन्यात चीनकडून काय प्रतिक्रिया अपेक्षित आहेत, यासंबंधीचे त्यांचे अंदाज सांगितलं. या बैठकीत केंद्रीय गृह सचिव अजय भल्लाही उपस्थित होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)