You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अंतिम वर्ष परीक्षा : ऑक्टोबरपासून राज्यात परीक्षा, घरूनच पेपर द्यायला प्राधान्य
अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून घेतल्या जातील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान त्याचे निकाल येतील. या परीक्षा कमी मार्काच्या असतील तसंच शक्य झाल्यास घरातून परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली जाण्याची शक्यता आहे, असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
याबाबत मुख्यमंत्री आणि राज्यापालांशी चर्चा करून येत्या 2 दिवसांमध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल, तसंच काही विद्यापिठांच्या विनंतीनुसार यूजीसीकडे 31 ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढ मागितली जाईल, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलता येतील, पण सरसकट रद्द करता येणार नाही, परीक्षा घेतल्याशिवाय पदवी देता येणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे.
या निर्णयाचा आदर करून महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षांतील अंतिम सत्रांच्या परीक्षा घेण्याची राज्य सरकारची तयारी आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
कोर्टाच्या या निर्णयावर बोलताना सामंत म्हणाले होते, "सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. राज्यातील कोव्हिड-19 चा वाढता प्रादुर्भाव, विद्यार्थी, पालक यांची मानसिकता, कुलगुरू यांच्या सूचना आणि काही शैक्षणिक संघटनांचे निवेदन अशा सर्वांगीण परिस्थितीचा विचार करूनच परिक्षेसंदर्भात राज्य शासनाकडून सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यात आली होती."
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - कोरोना लॉकडाऊन : महाराष्ट्रात जुलै महिन्यात काय अनलॉक होणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यातल्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. त्यांनी त्यांचा अहवाल दिल्यानंतर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
साधारण 60 लाख 382 हजार विद्यार्थ्यांची अंतिम वर्षाची परीक्षा होणार आहे.
मुंबई, पुणे सोलापूर, नागपूर या विद्यापिठांनी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढीची विनंती केली आहे. तर अमरावती आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाने 10 नोव्हेंबर पर्यंत मुदातवाढ मागितली आहे. त्याबाबत UGC ला विनंती करणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं आहे.
विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होणार नाही हा विचार करून नवा पॅटर्न तयार करू, असं आश्वासन उदय सांमत यांनी दिलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)