You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राहुल गांधींनी सांगितलं तर महाविकास आघाडीतून बाहेर पडणार - विजय वडेट्टीवार #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1) राहुल गांधींनी सांगितलं तर महाविकास आघाडीतून बाहेर पडणार - विजय वडेट्टीवार
"महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी राहुल गांधींनी चर्चा करून काँग्रेसच्या सहभागासाठी निर्णय घेतला होता. त्यामुळे ते अध्यक्ष झाल्यावर त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्यास सांगितल्यास आम्ही सत्ता सोडू," असं विधान महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी केलंय. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी यांना पसंती आहे. सोनिया गांधी यांनी संकटात काँग्रेसला सांभाळलं आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांना पसंती आहे, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 23 नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत पत्र पाठवले आहे. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा असं या पत्रात म्हटलं आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांचा समावेश असल्याचे बोललं जातं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्येच दोन गट पाहायला मिळत आहेत.
2) राजू शेट्टी: '...तर आम्ही म्हशीच्या गळ्यातला लोढणं सरकारच्या पाठीत घालू.'
गाईच्या दूध खरेदीमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असून उत्पादन खर्चाच्या निम्माच दर त्याच्या हातात पडतोय, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे.
"आम्ही ठिकठिकाणी आंदोलन पुकारले असून त्याची दखल सरकारने घेतली नाही तर आम्ही म्हशीच्या गळ्यातला लोढणं त्यांच्या पाठीत घालू," असा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे. लोकमतने ही बातमी प्रसिद्ध केलीय.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नुकताच सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैलगाडी मोर्चा काढला.
केंद्र सरकारने दूध भुकटी आणि इतर दुग्धजन्य पदार्थाची आवक थांबवावी, दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी कर रद्द करावा आणि राज्य सरकारने गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे या मागण्या स्वाभिमानी संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.
3) कोव्हिड-19 मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील 542 कोटी रुपयांपैकी 132 कोटींचाच खर्च
राज्या सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधी, कोव्हिड-19 असे बँक खाते उघडून त्यामध्ये देणगी देण्याचे आवाहन नागरिकांना केले होते.
3 ऑगस्टपर्यंत त्यात 541 कोटी 18 लाख 45 हजार 751 रूपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. यापैकी 3 ऑगस्ट पर्यंत 132 कोटी 25 लाख 89 हजार 610 रूपये (24.43 %) इतका खर्च झाला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
या खात्यातून नागपूर जिल्ह्याला केवळ 0.22 % म्हणजेच 1 कोटी 20 लाख रुपये दिल्याचे सामाजिक कार्यकर्ते अभय कोलाकर यांनी माहितीच्या अधिकारातून सांगितले.
या देणगीच्या रकमेला आयकरात सूट आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी सर्वाधिक रक्कम दिल्याचा अंदाज आहे. या खात्यातून औरंगाबाद अपघातातील 16 मजुरांना 80 लाख रुपये दिले गेलेत तर राज्यातील 3 रूग्णालयांनाही मदत करण्यात आली आहे.
4) लॉकडाऊन उघडण्याची घाई महाराष्ट्र करणार नाही - उद्धव ठाकरे
मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल रेल्वे अनलॉकच्या पुढील टप्प्यात सुरू होणार का? असा प्रश्न नोकरदारवर्गाकडून सातत्याने विचारला जात आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक सूचक विधान केले आहे.
देशभरात लॉकडॉऊन उघडण्याचे निर्णय घाईगडबडीने घेतले जात असले तरी महाराष्ट्रात अशी घाई केली जाणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबई लोकलसाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.
कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई याठिकाणी कोरोना प्रादुर्भावाच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे ठाण्यात आले होते.
'एकदा खुली केलेली सेवा पुन्हा बंद करण्याची वेळ येणार नाही, याची दक्षता घेऊनच निर्णय घेण्यात येणार आहे. ग्रामीण भाग आणि इतर शहरांमध्ये पुनश्च हरीओम म्हणत अनेक गोष्टी सुरू केल्या असल्या तरी ज्या गोष्टी सुरू करणे शक्य नाही त्या शक्य नाहीत,' या शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
5) अदानींकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा 74 टक्के वाटा खरेदीची तयारी
देशातील सहा विमानतळाचे अधिकार गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला पीपीई मॉडेलनुसार मिळाले आहेत. अदानी एंटरप्रायजेसने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा 74 टक्के वाटा खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.
हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर अदानी कंपनी खासगी क्षेत्रात भारतातील दोन क्रमांकाचा एअरपोर्ट ऑपरेटर ठरेल. अदानी समूहाला याआधीच देशातील सहा विमानतळाचे अधिकार मिळाले आहेत.
मुंबई विमानतळाच्या जीव्हीके समूहाकडील 50.5 टक्के हिस्सा अदानी समूहाने खरेदी केला.
तर दुसरीकडे केरळमध्ये तिरूवनंतपुरम विमानतळाचे कंत्राट अदानी समूहाला दिल्याप्रकरणी त्याविरोधात विधानसभेत प्रस्ताव मांडण्यात आला आहे. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. हे कंत्राट मिळण्यासाठी राज्य सरकारकडूनही तेवढीच किंमत दिली जाणार होती, पण तरीही केंद्र सराकरने हे काम अदानी समूहाला देण्याचा निर्णय घेतला, असा आरोप पिनराई विजयन यांनी केलाय. केंद्र सरकार विमानतळाच्या खासगीकरणाचा योग्य निर्णय घेत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)