You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
SSC HSC Result 2020 : दहावी-बारावीचा निकाल जुलैमध्येच लागणार #5मोठ्याबातम्या
वेबसाईट आणि वृत्तपत्रांमध्ये आलेल्या आजच्या महत्त्वाच्या पाच बातम्या
1) दहावी-बारावीचा निकाल जुलैमध्येच लागणार
कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला आहे. दहावी-बारावीची निकालही लांबलेत. निकाल कधी लागणार, ही परीक्षार्थींची चिंता आता दूर झालीय.
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत, तर दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत दिली. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
दहावीच्या परीक्षेला यंदा 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी बसले होते, तर बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बसले होते. बारावीची परीक्षा लॉकडाऊनच्या आधीच संपली होती. दहावीचा भूगोल विषय वगळता इतर विषयांची परीक्षा झाली होती.
जिओ टीव्ही आणि गूगल मीटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा निर्णय सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीत घेण्यात आलाय.
या बैठकीला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या सुद्धा उपस्थित होत्या. ऑनलाईन शिक्षण, दहावी-बारावीचे निकाल, अकरावीची प्रवेश प्रक्रिया अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.
2) कोरोना: धारावी नियंत्रणात, केंद्राकडून ठाकरे सरकारचं कौतुक
मुंबईत धारावीत गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनानं थैमान घातलं होतं. अखेर धारावीतल्या रुग्णवाढीचा दर नियंत्रणात आणण्यात महाराष्ट्र सरकारला यश मिळालंय. त्यामुळे केंद्र सरकारनेही ठाकरे सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप मारलीय. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.
महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेनं धारावीत कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामाची केंद्र सरकारनं दखल घेत, कौतुक केलंय.
मे महिन्यात धारावीत रुग्णवाढीचा दर 4.3 टक्के होता. हाच दर आता म्हणजे जून महिन्यात 1.2 झाला आहे.
एवढंच नव्हे, तर धारावीतल्या कोरोनाग्रस्तांच्या दुपटीचा वेगही आता 78 दिवसांवर आलाय.
दाटीवाटीचा भाग असूनही मुंबई महापालिका आणि राज्य सरकारनं काँटॅक्ट ट्रेसिंग, कंटेनमेंट झोनचं काटेकोर पालन इत्यादी उपाययोजनांमधून धारावीत कोरोनाला नियंत्रित केलंय.
3) IIT गांधीनगर: 'सांडपाण्याद्वारे कोरोनाबद्दल आधीच कळू शकतं'
कुठल्या भागात कोरोनाची साथ पोहोचलीय, याची माहिती सांडपाण्याच्या माध्यमातून मिळू शकते. या अनुषंगाने गुजरातमधील आयआयटी गांधीनगरमधील संशोधकांनी महत्त्वपूर्ण संशोधन केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी प्रसिद्ध केलीय.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या ट्रिटमेंट प्लांटचा यासाठी उपयोग होऊ शकतो आणि त्याद्वारे कोरोनाबद्दल आधीच आपल्याला माहिती मिळू शकते, अशाप्रकारचे हे संशोधन आयआयटी गांधीनगरमधील संशोधकांनी केलंय.
कुठल्या भागात कोरोनाची साथ पसरलीय, हे कळल्यास त्या भागातील नागरिकांना सतर्क करता येऊ शकतं. त्यामुळे हे संशोधन महत्त्वाचे मानले जाते आहे.
4) पुरी रथयात्रेला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी
पुरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला अखेर सुप्रीम कोर्टानं परवानगी दिली. मात्र, कोर्टानं काही अटी ठेवल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मोठी गर्दी होणार नाही, आरोग्यासाठीची सर्व खबरदारी घेतली जाईल आणि सोशल डिस्टंन्सिंगचं पालन केलं जाईल, या अटींवर सुप्रीम कोर्टानं रथयात्रेस परवानगी दिलीय. द इंडियन एक्प्रेसनं ही बातमी दिलीय.
सुप्रीम कोर्टाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरन्यायाधीश शरद बोबडे हे या खंडपीठाचे प्रमुख होते. 18 जूनच्या निकालात बदल करून नवा निर्णय देण्यात आला.
या यात्रेला लाखो भाविक येतात. कोरोना व्हायरसची साथ वेगानं पसरत असताना, एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविक आल्यास घातक ठरू शकेल, असं मत कोर्टानं नोंदवलं होतं. मात्र, आता नव्या आदेशात अटींसह परवानगी दिलीय.
5) सप्टेंबरपर्यंत गरिबांना मोफत धान्य द्या - सोनिया गांधी
कोरोना लॉकडाऊनमुळे भारतातील गरिबांचे, स्थलांतरित मजुरांचे आणि हातावर पोट असलेल्यांचे मोठे हाल होत असल्याचं म्हणत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. त्यांनी या पत्रातून सप्टेंबर 2020 पर्यंत गरिबांना मोफत धान्य देण्याची मागणी केलीय.
एनडीटीव्ही इंडियानं ही बातमी प्रसिद्ध केलीय.
"मागील तीन महिन्यात लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी देशभरात करण्यात आली. या काळात लाखो गरिबांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. अशात गरीबांच्या दोन वेळच्या जेवणासाठी त्यांना धान्य उपलब्ध करुन देण्यात आलं. ते पुढे आणखी तीन महिने उपलब्ध करुन देण्यात आलं," अशी मागणी सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे केलीय.
अंत्योदय अन्न योजनेच्या अंतर्गत गरिबांना प्रतिमहिना पाच किलो धान्य उपलब्ध करुन द्यावं. ही तरतूद सप्टेंबरपर्यंत पुढे न्यावी, असंही सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)