You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडेंनी फोन करून म्हटलं, 'लवकर बरा हो' #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडेंनी फोन करून म्हटलं, 'लवकर बरा हो'
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांना फोन करून प्रकृतीबाबत विचारपूस केली. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.
"स्वतःची काळजी घे, कुटुंबाची काळजी घे. आई आणि मुली लहान आहेत. कोरोनामधून लवकर बरा हो," असं पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात पहिल्यांदाच संभाषण झाल्याचं बातमीत म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. धनंजय मुंडे यांची दोनदा कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील एक रिपोर्ट निगेटिव्ह तर दुसरा पॉझिटिव्ह आला. त्यांना कोणतीही लक्षणं दिसत नव्हती, पण श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
2.भारतातील सहिष्णुतेचा DNA नाहीसा होत चाललाय- राहुल गांधी
जागतिक स्तरावर भारताची एक सहिष्णू देश म्हणून ओळख आहे. मात्र, अलीकडच्या काळात देशातून सहिष्णूतेचा हा DNA नाहीसा होत चाललाय, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. झी 24 तासनं ही बातमी दिलीय.
राहुल गांधी यांनी शुक्रवारी (12 जून) अमेरिकेचे राजकीय अधिकारी निकोलस बर्न्स यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही टीका केली.
यावेळी त्यांनी म्हटलं, "आपला देश अत्यंत सहिष्णू आहे. आपल्या DNA मध्येच ही सहिष्णुता अस्तित्त्वात आहे. त्यामुळे आपल्याकडे नव्या कल्पनांचे मोकळेपणाने स्वागत केले जाते. मात्र, हल्ली हा मोकळेपणा असणारा DNA आश्चर्यकारकरित्या देशातून गायब होत चालला आहे. त्यामुळे देशात पूर्वीसारखी सहिष्णूता राहिलेली नाही, हे दुर्दैवानं म्हणावं वाटतं."
"अमेरिकेत आफ्रिकन अमेरिकन्स, मेक्सिकन आणि इतर लोकांमध्ये फूट पाडली जाते. भारतात हाच प्रकार हिंदू, मुस्लीम आणि शीखांबाबत घडतो. या सगळ्यामुळे तुम्ही देशाचा साचा कमकुवत करत आहात. मात्र, देश कमकुवत करणारे हे लोक स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घेतात," असंही ते म्हणाले.
3. प्रवाशांना विमान तिकीटाचे पैसे परत द्या – सर्वोच्च न्यायालय
लॉकडाऊनच्या काळात तिकीट रद्द केलेल्या प्रवाशांच्या तिकीटाचे पैसे परत करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं खासगी विमान कंपन्यांना दिला आहे. यासाठी या कंपन्यांनी उड्डयण मंत्रालयाशी चर्चा करून मार्ग काढावा, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
अनेक विमान कंपन्यांना प्रवाशांना क्रेडिट शेलमध्ये ठेवलं आहे, जेणेकरून ते वर्षभरात कोणत्याही तारखेला विमान प्रवास करू शकतील.
पण, प्रवासी लीगल सेल या संस्थेनं याला आक्षेप घेत प्रवाशांना तिकीटाचे पैसे परत द्यावेत, या आशयाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
4. ‘पुनःश्च हरीओम’, ‘मिशन बिगिन अगेन’ या घोषणांमुळे वाढला गोंधळ
पुनःश्च हरीओम, मिशन बिगिन अगेन या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांमुळे गोंधळ वाढला असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे. दापोली येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी 'पुनःश्च हरिओम', 'मिशन बिगिन अगेन' म्हटलं. नंतर गरज पडली तर लॉकडाऊन करावा लागेल म्हटलं. हे सगळं गोंधळात टाकणारं आहे. उलट आता दृढतेने हे सांगितलं पाहिजे की, जे काही सुरू करतो आहोत, त्यामध्ये कितीही संकटं आली तरीही आम्ही त्याचा सामना करू," असं फडणवीस म्हणाले.
या सरकारनं ज्या उपाय योजनांची घोषणा केली त्या घोषणा कागदावर आहेत. प्रत्यक्षात कुठेही मदत मिळालेली नाही, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
5. पावसाचे दमदार आगमन, मराठवाडा, विदर्भात हजेरी
महाराष्ट्रात दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी मान्सूननं विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत मुसंडी मारली आहे. त्यामुळे कोकणासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस झाला. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
नाशिक परिसरातही पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांची खरीपाच्या पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे.
येत्या 24 तासांत मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
---------------हे वाचलंत का चा ठोकळा टाकणे--------------