You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भीमा कोरेगाव हिंसेत भाजपच्या जवळचे लोक - अनिल देशमुख #5मोठ्याबातम्या
वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1) भीमा कोरेगाव हिंसेत भाजपच्या जवळचे लोक - अनिल देशमुख
भाजपशी संबंधित लोकांनीच भीमा कोरेगावचा हिंसाचार घडवल्यानं तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) देण्यात आला, असा गंभीर आरोप महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला.
काही दिवसांपूर्वीच NIA नं भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या तपासाची धुरा आपलकडे घेतली. याबाबत बोलताना देशमुख म्हणाले, आपली काळी कृत्य उघडकीस येऊ नये म्हणून केंद्र सरकारनं ही कृती केली.
"भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, अशी मागणी शरद पवारांनी केली होती. त्याचबरोबर इतर अनेक संघटनांनीही अशीच मागणी केली होती. सरकार त्या दृष्टीने पुढे जात असतानाच केंद्रानं हे पाऊल उचलणं चुकीचं आहे," असं म्हणत देशमुखांनी केंद्राच्या निर्णयावर खंत व्यक्त केली.
अनिल देशमुखांच्या वक्तव्यावर भाजपने अद्याप प्रतिक्रिया दिली नाही.
दरम्यान, राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणावरही त्यांनी यावेळी भाष्य केलं. ते म्हणाले, "भाजपची सत्ता असतानाच्या काळात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यामुळेच राज्याच्या गृहमंत्रालयाने या प्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत."
2) निवडणुकीत उमेदवाराला जिंकवण्यात आणि संपवण्यात माझी पीएचडी - पंकजा मुंडे
निवडणुकीत एखाद्या उमेदवाराला निवडून आणण्यात आणि विरोधकाला संपवण्यात माझी चांगली पीएचडी झालीय, असं वक्तव्य भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिल्लीत केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी प्रचारासाठी दिल्लीत बोलावल्याचंही यावेळी पंकजा मुंडेंनी सांगितलं. महाराष्ट्र देशानं ही बातमी दिलीय.
दिल्लीतल्या नरेला विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार निलदमन खत्री यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांनी सभा घेतली होती.
यावेळी पंकजा मुंडेंनी वडील गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, "गोपीनाथ मुंडे यांचा मोठा वारसा मला लाभलाय. सर्वसामन्य, गरीब आणि वंचितांचे ते नेते होते. त्याच मार्गावर मी चालतेय. आपले पंतप्रधानही त्याच मार्गावर चालतायत."
मोठ्या मताधिक्क्यांनी 'झाडूवाल्या' सरकारला आपण इथून बाहेर काढू, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
3) NPR च्या फॉर्ममध्ये बदल करण्याची जदयूची मागणी
बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे प्रमुख नितीश कुमार हे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) बाबत नाराज असल्याचे समोर आले आहे. NPR च्या माध्यमातून माहिती गोळा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या फॉर्ममधून पालकांच्या जन्मस्थळाची माहिती विचारली जाऊ नये, अशी मागणी जदयूनं केलीय. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.
NDA च्या बैठकीत जदयूचे खासदार ललन सिंह यांनी ही मागणी केली असून, या मुद्द्यावर चर्चेचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्याचं ललन सिंह यांनी सांगितलं.
शिरोमणी अकाली दलसह भाजपच्या इतर सहकारी पक्षांनीही जदयूच्या मागणीला समर्थन दिल्याचा दावा ललन सिंह यांनी केला.
काही दिवसांपूर्वीच नितीश कुमार यांनी पटन्यातील एका संमेलनात बोलताना म्हटलं होतं की, "NPR च्या फॉर्ममध्ये नवे प्रश्न समाविष्ट केल्यानं लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. विशेषत: पालकांच्या जन्मस्थळाबाबतचा प्रश्न. या माहितीची खरंतर आवश्यकताच नाहीय."
अनेक लोकांना पालकांच्या जन्मस्थळाची माहिती नसते, असंही नितीश कुमार म्हणाले होते.
4) जामिया गोळीबार : आरोपीला 14 दिवसांची कोठडी
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (CAA) जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गोळीबार करणाऱ्या आरोपीला 14 दिवसांची संरक्षणात्मक कोठडी सुनावण्यात आलीय. बाल हक्क न्याय मंडळाने आरोपीला ही शिक्षा सुनावलीय. लाईव्ह मिंटनं ही बातमी दिलीय.
शुक्रवारी दुपारी आरोपीला न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. आरोपीनं सादर केलेल्या ओळखपत्रात त्याचे वय 17 वर्षे 7 महिने आहे. मात्र, त्याच्या वयाबाबत संशय असल्यानं त्याची वैद्यकीय चाचणी करण्याची विनंती न्याय मंडळाकडे करण्यात आली. पोलीस उपायुक्त राजेश देव यांनी माहिती दिली.
आरोपीच्या गोळीबारात शादाब फारुक हा विद्यार्थी जखमी झाला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय.
दरम्यान, आरोपी हा बारावीचा विद्यार्थी आहे. पुढील महिन्यात त्याची परीक्षा आहे. त्यामुळं न्याय मंडळानं आरोपीला पुस्तकं उपलब्ध करुन देण्यास सांगितलंय.
5) कोरोना व्हायरस : भारतीयांना आणण्यासाठी एअर इंडियाचं खास विमान
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं चीनमध्ये धुमाकूळ सुरु आहे. तिथं अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी भारत सरकारनं पुढाकार घेत, एअर इंडियाचं B747 हे विमान वुहान शहरात पाठवलंय. 324 भारतीय नागरिकांना घेऊन हे विमान मायदेशी परतेल. इंडिया टुडेनं ही बातमी दिलीय.
एअर इंडियाच्या या विमानात राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमधील पाच डॉक्टर तैनात असून, पॅरामिलिटरी स्टाफही आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली.
या विमानात सतर्कता म्हणून औषधं, अन्न, सुरक्षा कवच अशा अनेक गोष्टी ठेवण्यात आल्यात. एअर इंडियाचे ऑपरेशन संचालक कॅप्टन अमिताभ सिंग यांच्या नेतृत्त्वात हे संपूर्ण बचावकार्य होत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)