शेतकरी कर्जमाफी : महाराष्ट्रात 11 महिन्यांमध्ये 1100 शेतकऱ्यांच्या आत्महत्या #5मोठ्या बातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आजचे पेपर आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.

1. 11 महिन्यांमध्ये 1100 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

विदर्भामधील सहा जिल्ह्यांमध्ये दर आठ तासाला एका शेतकऱ्यांची आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या वर्षी 11 महिन्यांमध्ये 1057 शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळल्याचं दिसून आलं आहे. 2001 पासून 15 डिसेंबरपासून 16 हजार 918 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं दिसत आहे. हे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले आहे.

2019 वर्षभरात जानेवारी महिन्यात 85, फेब्रुवारी 78, मार्च 92, एप्रिल 78, मे 98, जून 95, जुलै 105, ऑगस्ट 114, सप्टेंबर 106, ऑक्टोबर 86, नोव्हेंबर 95 आणि 15 डिसेंबरपर्यंत 35 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत.

राज्यात सर्वांत जास्त आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. या जिलह्यातील 260 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. बुलढाणा जिल्ह्यात 258, अमरावती जिल्ह्यात 257, अकोला 115, वाशीम 91, वर्धा जिल्ह्यात 75 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर यावा यासाठी यापूर्वीच्या शासनाने दीड लाखापर्यंत कर्जमाफी दिली पण त्यातल्या बऱ्याच अटींच्या पूर्तता न करता आल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

2. कवयित्री अनुराधा पाटील, शशी थरुर यांना साहित्य अकादमी पुरस्कार

ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांच्या 'कदाचित अजूनही' या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 23 भाषांसाठी अकादमीने वर्ष 2018चे पुरस्कार जाहीर केले. त्यामध्ये सात कवितासंग्रह, सहा कथासंग्रह, तीन निबंध, एक कथेतर गद्य, आत्मचरित्र यांचा समावेश आहे.

गोव्यातील कोकणी कवी निलबा खांडेकर यांच्या कवितासंग्रहालाही पुरस्कार जाहीर झाला आहे. काँग्रेसचे खासदार आणि लेखक शशी थरुर यांना 'अॅन एरा ऑफ डार्कनेस' या पुस्तकाला पुरस्कार जाहीर झाला आहे. एबीपी माझानं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

3. 'प्रादेशिक पक्ष भाजपला पर्याय निर्माण करू शकतील'

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे देशातील विविध पक्षांनी स्वागत केलं असून भाजपला पर्याय म्हणून प्रादेशिक पातळीवर पक्ष उभे राहातील आणि ते राष्ट्रीय पातळीवर भाजपसमोर पर्याय निर्माण करू शकतील असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.

हिवाळी अधिवेशनाच्यावेळेस नागपूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. समाजमाध्यमांवर निर्णय आणण्याचा मोदी सरकारचा विचार असून त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येईल.

अशा प्रकारे येणाऱ्या नियंत्रणाला राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करेल असं ते म्हणाले. हिवाळी अधिवेशन संपल्यावर दोन-तीन दिवसांमध्ये राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असंही त्यांनी सांगितलं. हे वृत्त लोकसत्तानं प्रसिद्ध केलं.

4. LOC वर कधीही परिस्थिती बिघडू शकते, लष्करप्रमुखांचा इशारा

पाकिस्तानकडून सतत सीमाभागात गोळीबार केला जात आहे. तेथे कधीही परिस्थिती बिघडू शकते त्यामुळे देशाला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहायला हवे असा इशारा लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिला आहे. सामनाने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघन करण्याचे प्रकार वाढले आहेत. पाकिस्तान देशातील अनियंत्रित वातावरणामुळे सीमेवरची परिस्थिती बिघडत आहे.

देशवासियांनी सर्व प्रकारच्या परिस्थितीसाठी लढायला सज्ज राहायला हवे. आम्हीही प्रत्येक परिस्थितीत सामना करायला तयार आहोत असं रावत यांनी सांगितलं.

5. पश्चिम बंगाल, आसाममधील स्थितीत सुधारणा

नागरिकत्व सुधारणा कायद्चाच्या विरोधात पूर्व आणि ईशान्य भारतामध्ये तीव्र आंदोलनं झाली. आता या भागात जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पश्चिम बंगाल आणि आसामच्या अनेक भागांमध्ये इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.

आसामामधील दिब्रुगड आणि मेघालयमधील शिलाँग इथली संचारबंदी 14 तासांसाठी शिथिल करण्यात आली. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)