You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मीर: अमित शहा – नेहरूंचा संयुक्त राष्ट्राकडे जाण्याचा निर्णय हिमालयाएवढी मोठी चूक #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. नेहरूंची ती चूक हिमालयाहून मोठी -अमित शहा
"काश्मीरचा इतिहास मोडून-तोडून देशासमोर ठेवला गेला, कारण ज्यांची चूक होती त्यांनी हा इतिहास लिहिला. स्वत:ची चूक झाकण्यासाठी चुकीचा इतिहास जनतेसमोर आणला. मात्र आता खरी वेळ आली आहे की, जनतेसमोर काश्मीरचा खरा इतिहास मांडला जाईल," असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं.
माजी सरकारी अधिकाऱ्यांनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
"काश्मीरमधून 370 कलम हटवण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे. हे कलम हटवण्यासाठी आम्ही अनेक वर्षं संघर्ष करत होतो. ज्यावेळी आपलं सैन्य जिंकत होतं त्यावेळी युद्धविराम का दिला गेला? त्यावेळी युद्ध थांबवण्याची काय गरज होती? संयुक्त राष्ट्राकडे जाण्याचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी घेतला. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. नेहरूंची ही चूक हिमालयाहून मोठी होती. हा दोन्ही देशामधला वाद होता," असं शहा म्हणाले.
2. आणखी एका बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध
आर्थिक नियमिततेचं कारण देत रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेवर आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. बँकेच्या संचालकांविरुद्ध दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करण्यात आल्यानंतर दोन दिवसात रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने ही बातमी दिली आहे.
चेन्नईत मुख्यालय असलेल्या 93 वर्षं जुन्या लक्ष्मी विलास बँकेच्या देशभरात 569 शाखा आहेत. निर्बंध जारी केल्याने नव्याने कर्ज देणे, लाभांश जाहीर करणं, शाखांचा विस्तार अशा प्रत्येक गोष्टीत बँकेवर मर्यादा आल्या आहेत.
आर्थिक संकटाशी सामना करण्याची कुवत नसणे, मोठ्या प्रमाणातील थकित कर्ज, अॅसेट क्वालिटीत झालेली घसरण या तीन मुख्य कारणांमुळे रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे.
3. कांदा निर्यातीवर बंदी
सणासुदीच्या काळात गगनाला भिडू पाहणारे कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी कांदा निर्यातीवर बंदी घातली आणि कांद्याचा साठा करण्यावर मर्यादा आणली. महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला, अशी बातमी 'द हिंदू'ने दिली आहे.
देशात कांद्याची उपलब्धता वाढून भाव कमी व्हावेत या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचं ग्राहक मंत्रालयाने स्पष्ट केलं. केंद्राने 50 हजार टन कांद्याचा राखीव साठाही उपलब्ध करून दिला आहे.
कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने किरकोळ दुकानदारांना 100 क्विंटल तर घाऊक विक्रेत्यांना 500 क्विंटल कांद्याचा साठा करण्याची मर्यादा घालून दिली असल्याचं ग्राहक मंत्रालयाने स्पष्ट केलं.
4. MTNL कर्मचाऱ्यांना दोन महिने पगार नाही
महानगर टेलिफोन निगमच्या मुंबई आणि दिल्लीतील कर्मचाऱ्यांचा वेतनाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. गेल्या दोन महिन्यांचे वेतन कर्मचाऱ्यांना मिळालेलं नाही. याबाबत व्यवस्थापनाकडून ठोस उत्तर देण्यात आलेलं नाही. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
वेतनाच्या अनिश्चिततेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. अनेक कर्मचारी सेवानिवृत्ती घेण्याच्या मार्गावर आहेत तर काही स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या तयारीत आहेत. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. MTNLमधील युनायटेड फोरम संघटनेनं यासंदर्भात आंदोलनही केलं होतं.
5. बिहारमध्ये पूर, 23 जणांचा बळी
बिहार राज्यात पुरपरिस्थितीमुळे बळींची संख्या 23 झाली आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी "प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे मात्र निसर्गापुढे आपलं काही चालत नाही," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली आहे. 'आजतक'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
बिहारच्या उत्तरेकडील प्रदेशाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. पटणामधील राजेंद्रनगर भागाची स्थिती पुरामुळे भयंकर झाली आहे.
6. हंगामी लाभांशापोटी रिझर्व्ह बँकेकडे आणखी 30 हजार कोटी मागणार?
2019-20 या आर्थिक वर्षातील वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पनाच्या साडेतीन टक्क्यांपर्यंत राखण्यासाठी वर्षाच्या अखेरीस सरकार रिझर्व्ह बँकेकडून हंगामी लाभांशापोटी सुमारे 30 हजार कोटी रुपयांची मागणी करण्याची चिन्हं आहेत. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
महसुली उत्पन्नात फार वाढ होत नसल्याने तसेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहातील 5 टक्के इतक्या म्हणजे गेल्या सहा वर्षात कमी राहिलेल्या विकासदरात वाढ करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडत आहे.
कंपनी करातून भरीव सवलतींची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)