सुषमा स्वराज : 'तुम्ही जरी मंगळावर अडकला असाल, तरी भारतीय दूतावास तुम्हाला मदत करेल'

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

ट्विटरचा सकारात्मक पद्धतीने कसा उपयोग करता येतो हे सुषमा स्वराज यांनी सिद्ध केलं.

एखादी व्यक्ती जग सोडून गेल्यानंतर तिच्या आठवणी, शेवटचं संभाषण सांगितलं जातं. पण सुषमा स्वराज गेल्या आणि बहुतेकांनी पहिल्यांदा शेअर केलं त्यांचं शेवटचं ट्वीट. मृत्यूच्या फक्त तीन तासपूर्वीचं.

कारण हेच होतं सामान्य नागरिक आणि एका दिग्गज राजकारणी - मंत्र्यांमधलं कनेक्शन. सोशल मीडिया. त्यातही ट्विटर.

भाजपमधल्या इतर नेत्यांनी ट्वीटरची कास धरण्याआधीच सुषमा स्वराज यांनी 'मिलेनियल्स'ची ही नस पकडली आणि तिचा अचूक वापर केला.

कधी दिलासा देत, कधी अडचणी सोडवत, कधी स्वतःची मतं मांडत तर कधी आपल्या हजरजबाबीपणाने लोकांची मनं जिंकत सुषमा स्वराज यांनी आपली ट्विटर टाईमलाईन अक्षरशः सतत हलती ठेवली.

सोशल मीडियाचा योग्य आणि प्रभावीपणे वापर केला तर तो सामान्य नागरिक आणि प्रशासनाच्याही किती फायद्याचा ठरू शकतो, हे सुषमांनी दाखवून दिलं. त्यांच्या या 'ट्विटर सेव्ही' पणामुळेच परराष्ट्र मंत्रालय सामान्य नागरिकांसाठी खासकरून अडचणीत सापडलेल्या भारतीयांसाठी अगदी एका क्लिकवर आलं.

अडचणीत असलेल्या कोणीही सुषमांना ट्विट केलं की त्यांना उत्तर तर मिळायचंच पण अनेकदा तिथल्या तिथे, अगदी ट्विटरवरच त्या आपल्या सहकाऱ्यांना पावलं उचलण्यासाठी सूचनाही द्यायच्या.

फिरायला गेल्यावर पासपोर्ट हरवलेल्या अनेकांना सुषमांनी मदत तर केलीच. पण ट्विटरचा वापर करत त्यांनी गंभीर अडचणीत असलेल्या अनेकांना सुखरूप मायदेशी आणलं.

ट्विटरवरची रेस्क्यू ऑपरेशन्स

फेब्रुवारी 2015 मध्ये बसरामध्ये ओलीस ठेवण्यात आलेल्या 168 नागरिकांचा व्हीडिओ ट्विटरवरून त्यांच्यासोबत शेअर करण्यात आला. या व्हीडिओच्या आधारे तातडीने कारवाई करत त्यांनी या भारतीय नागरिकांची सुटका तर केलीच पण ट्विटरवरून याविषयीची माहितीही सर्वांना दिली. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी केलेलं हे पहिलं मोठं रेस्क्यू ऑपरेशन होतं.

पण ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी केलेलं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन होतं - ऑपरेशन राहत. युद्ध सुरू असणाऱ्या येमेनमधून या मोहीमेद्वारे 1947 परदेशी नागरिक आणि 4741 भारतीयांची हवाईमार्गे आणि समुद्री मार्गांनी सुटका करण्यात आली. यासाठी सुषमा स्वराज या एकीकडे धोरणात्मक चर्चा करत होत्या, त्याविषयीचे निर्णय घेत होत्या. पण सोबतच ट्विटरवरून त्यांनी याविषयीची इत्यंभूत माहिती पुरवत लोकांना दिलासाही दिला. ही ऑपरेशन राहत मोहीम 11 दिवस सुरू होती.

एका भारतीयाशी लग्न केलेल्या येमेनी महिलेने आपल्या 8 महिन्यांच्या बाळाचा फोटो ट्वीट करत सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली.

सुषमांनी या आई-लेकरांची सुटका तर केलीच पण 8 महिन्यांच्या या तान्ह्या नागरिकाचं ट्विटरवरून स्वागतही केलं.

मानवी तस्करीच्या सापळ्यात अडकलेल्या आपल्या बहिणीची सुटका करण्यासाठी देव तांबोळींनी सुषमांकडे मदत मागितली. त्यांनी पुरवलेल्या माहितीवरून ताबडतोब पावलं उचलण्यात आली. आणि त्यांच्या बहिणीसोबतच इतर मुलींचीही सुटका करण्यात आली.

फेब्रुवारी 2016 मध्ये कॅप्टन तुषार महाजन काश्मिरमधल्या पाम्पोरमध्ये शहीद झाले. त्यांचे बंधू निखिल महाजन यांना वॉशिंग्टनहून भारतात परतायचं होतं. ट्विटरवरून ही गोष्ट सुषमा स्वराज यांना समजल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून तातडीने हालचाली करण्यात आल्या. आणि निखिल महाजन यांची भारतात परण्याची सोय करण्यात आली.

मूळचे तामिळनाडूते जगन्नाथ सेल्वराज दुबईत अडकले होते. आईच्या अंत्यसंस्कारांसाठी त्यांना भारतात परतायचं होतं. बसचं भाडं परवडत नसल्याने दुबईच्या कामगार न्यायालयात हजेरी लावण्यासाठी त्यांनी तब्बल 1 हजार किलोमीटर्सची पायपीट केली होती.

ही बातमी सुषमा स्वराज यांना ट्विट करण्यात आल्यानंतर त्यांनी यात हस्तक्षेप केला आणि दुबईतल्या भारतीय दूतावासाकडून याविषयीचा अहवाल मागवला.

सहृदयी सुषमा स्वराज

परराष्ट्र मंत्री म्हणून काम करताना सुषमा ट्विटरवरून सामान्यांपर्यंत तर पोहोचल्याच पण हे करताना त्यांच्यातली माणुसकीही वेळोवेळी दिसत राहिली.

2018 साली दिल्लीच्या संगम विहारमध्ये गरीब वस्तीत राहणाऱ्या 14 वर्षांच्या इशाची निवड लंडनमधल्या एका कॉन्फरन्ससाठी करण्यात आली. तिथे ती भारताचं प्रतिनिधित्त्व करणार होती. पण तिला व्हिसा मिळत नव्हता.

अर्पिता तिवारी नावाच्या एका महिलेने ट्विटरवरून ही गोष्ट परराष्ट्र मंत्री असणाऱ्या स्वराज यांच्यापर्यंत पोहोचवली आणि इशाचा लंडनला जायचा मार्ग मोकळा झाला.

जेव्हा परराष्ट्र मंत्री म्हणतात, 'मला मोडकं-तोडकं इंग्लिशही समजतं'

ट्विरटवरून सुषमांकडे मदत मागणाऱ्यांमध्ये सर्व प्रकारचे नागरिक होते. मलेशियामध्ये असलेल्या एका भारतीयाने आपल्या मोडक्या-तोडक्या इंग्रजीमध्ये मित्रासाठी सुषमांकडे मदत मागितली.

त्याच्या इंग्लिशची ट्विटरवर खिल्ली उडवण्यात आली. पण एका मोठ्या खात्याच्या मंत्रीपदी असणाऱ्या सुषमा स्वराजांनी त्याला दिलेलं उत्तर दिलासा देणारं होतं. त्यांनी ट्विट केलं - 'काही अडचण नाही. परराष्ट्र मंत्री झाल्यापासून मला सर्व प्रकारचे हेल असणारं इंग्लिंश आणि व्याकरण समजतं'

हजरजबाबी सुषमा

'मी तर देशाची चौकीदार'

'मैं भी चौकीदार' मोहीमेमध्ये भाजपच्या सर्व नेत्यांनी आणि मंत्र्यांनी आपल्या ट्विटर हँडलच्या पुढे 'चौकीदार' लावून घेतलं. एका युजरने सुषमा स्वराजांना विचारलं, तुम्ही का असं केलं नाहीत? त्यांनी हजरजबाबी उत्तर दिलं - 'कारण मी देशाची आणि देशाबाहेर असलेल्यांची खरीखुरी चौकीदार आहे.'

"मंगळावर अडकलात तरी सोडवून आणू..."

अडचणीत असलेल्यांना दिलासा देण्यात, तत्परतेने उत्तर देण्यात सुषमा स्वराज माहीर तर होत्याच. पण त्यांच्या काही उत्तरांनी ट्विटरवर त्यांना तुफान लोकप्रिय केलं. एकदा एका माणसाने ट्विट करत आपण 'मंगळावर अडकल्याचं' सांगितलं.

सुषमांनी त्वरित उत्तर दिलं, "तुम्ही जरी मंगळावर अडकला असाल, तरी भारतीय दूतावास तुम्हाला मदत करेल"

"आम्ही तुम्हाला विलग करणार नाही"

सुषमांचा नर्मविनोदी स्वभाव त्यांच्या ट्विट्सवरून दिसायचा. एका ७० वर्षांच्या गृहस्थांनी त्यांना संपर्क करत सांगितलं. की कैलास - मानसरोवर यात्रेसाठी त्यांची आणि बायकोची निवड झाली, पण वेगवेगळ्या पथकांमध्ये. सुषमा स्वराजांनी त्यांना उत्तर दिलं, "तुम्हाला वेगळं करण्याचा दोष कॉम्प्युटरचा. पण काळजी करू नका. आम्ही तुम्हा दोघांना एकत्र एकाच पथकातून पाठवू."

जेव्हा सुषमा स्वराज पाकिस्तानी मुलींना मदत करतात

चंदीगढमध्ये एका यूथ फेस्टिवलसाठी आलेला 19 पाकिस्तानी मुलींचा गट भारतात अडकला. सर्जिकल स्ट्राईक्सनंतर तणाव निर्माण झाला होता. पण सुषमांनी या मुलींना दिलासा दिला, संरक्षण दिलं आणि त्यांना परत पाठवण्याची व्यवस्थाही केली.

19 मुलींचा हा गट एका विशेष बसने वाघा बॉर्डर ओलांडून परत पाकिस्तानात गेला. पण या कृतीसोबतच सुषमांनी केलेलं ट्वीट सर्वांची मनं जिंकून गेलं. त्या म्हणाल्या, "आलिया - मला तुमची काळजी होती. क्यूँकी बेटियाँ तो सबकी सांझी होती है" (आपल्या मुलींची काळजी तर सर्वांनाच असते.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)