पुण्यातल्या साडी सेंटरला आग, 5 कामगारांचा होरपळून मृत्यू

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

पुण्यातील देवाची ऊरळी येथील सासवड रोडच्या लगत असलेल्या राजयोग होलसेल साडी डेपो या दुकानाला पहाटे आग लागली. या आगीमध्ये धुराने गुदमरून आणि होरपळून पाच कामगारांचा मृत्यू झाला.

राकेश रियाड (वय २२), धर्मराम वाडियासार (वय २५),राकेश मेघवाल (वय २५), सुरज शर्मा (वय २५) हे चारही  राहणार राजस्थान तर धीरज चांडक (वय २३), रा. लातूर असे मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत.

रात्रीच्या वेळी कामगार दुकानात झोपत असत. चोरी होऊ नये म्हणून दुकानाला बाहेरून कुलूप लावलं जात असे.

पहाटे सव्वा चारच्या सुमारास कामगारांचा मॅनेजरला आग लागल्याचा फोन आला. शॉर्टसर्किटने आग लागल्याने आम्हाला गुदमरत आहे. बाहेर पडता येत नाही.

मॅनेजर तेथे पोहचेपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. बाहेरून कुलूप काढल्यानंतर कपडा असल्याने आगीने जोरात पेट घेतला.

दुसऱ्या मजल्यावरील काचा फोडण्यात आल्या. मागून भिंत तोडण्यात आली आणि सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली. 

मात्र यातील कामगारांना वाचवण्यात यश आले नाही. त्यांनी खिडक्या वाकविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना बाहेर पडता आले नाही.सुमारे सात हजार स्केअर फूटच्या या दुकानात साडी व रेडिमेड कपड्यांचे दालन होते.

राहण्याची वेगळी सोय नसल्यामुळे राजस्थानचे चार कामगार आणि लातूरचा एक कामगार असे पाच जण दुकानातच झोपत असत.

चोरी होईल या भीतीने दुकानाला बाहेरून कुलूप लावले जात असे. बाहेरून कुलूप असल्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. ऊरळी देवाची येथील राजू भाडळे यांच्या मालकीचे हे दुकान असून सुशील नंदकिशोर बजाज व भवरलाल हजारीलाल प्रजापती यांनी ते चालवण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतले होते.

या आगीत सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. आग विझवण्यासाठी पाच गाड्या अग्निशामक दलाच्या, चार देवदूत, दोन ब्राउजर, तसेच आठ-दहा टँकरने  आग आटोक्यात आली.

सकाळी पावणे सातच्या सुमारास या दुकानामधून कामगारांना बाहेर काढण्यात आले. तिथून त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं तिथं पोहोचल्यावर त्यांना मृत घोषित केलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)