अभिजीत दिपके म्हणतात, 'धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत जंतरमंतर सोडणार नाही'

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

'शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत आपण जंतरमंतर सोडणार नाही.' अशी घोषणा कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)चे प्रमुख अभिजीत दिपके यांनी केली आहे.

सीजेपीने एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे आज 20 जूनरोजी सीजेपीचे आंदोलन सुरू आहे.

अभिजीत दिपके यांनी जंतरमंतरवरील आंदोलनासाठी दिलेली परवानगी वाढवण्याची विनंती दिल्ली पोलिसांना केली आहे.

सरकारने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या अटींबाबत चर्चा करण्यासाठी त्यांच्याशी संवादाचे मार्ग खुले करावेत, असंही ते म्हणाले आहेत.

कॉक्रोच जनता पार्टीनं त्यांच्या एक्स अकाउंटवरून आणखी एक पोस्ट करत नागरिकांना जंतरमंतरवर एकवटण्याचं आवाहन केलं. '20 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता जंतर मंतरवर एकत्रित या आणि धर्मेंध्र प्रधान यांच्या राजीनाम्याची स्पष्ट मागणी करा' असं आवाहन या पोस्टमध्ये करण्यात आलं आहे.

दरम्यान, देशभरात वाढलेल्या पेपरफुटीच्या घटना, परीक्षांमधील गोंधळ आणि निकालातील विलंब यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप करत कॉक्रोच जनता पार्टी देशभरातील विविध ठिकाणी आंदोलन करत आहे.

दिल्लीत आंदोलन केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने पुण्यातील आंदोलनात लखनौ, अमृतसर, हैदराबाद आणि जयपूर येथेही आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच देशभरातील युवकांनी मोठ्या आंदोलनासाठी एकत्र यावे असे आवाहन केलं होतं.

जयपूर येथील आंदोलनादरम्यान दिपकेंना झाली होती मारहाण

दरम्यान, सीजेपीकडून 15 जून रोजी जयपूर येथील शहीद स्मारकावर नीट पेपरफुटी, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर आंदोलन करण्यात आलं होतं.

याचदरम्यान काही व्यक्तींनी सीजेपीचे नेते अभिजीत दीपके यांच्यावर हल्ला केला. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने एक व्हीडिओ प्रकाशित केला होता.

या व्हीडिओमध्ये गर्दीतून जात असताना अभिजीत दिपके यांच्यावर हल्ला झाल्याचं दिसत आहे. यानंतर उपस्थित आंदोलकांनी हल्लेखोराचा पाठलाग करत त्याला मारहाण केल्याचंही दिसत आहे.

पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून हल्लेखोरांना ताब्यात घेतले. मात्र, अभिजीत दीपके यांनी त्यांच्याविरोधात कठोर कारवाई न करण्याची भूमिका घेत त्यांना सोडून देण्याची विनंती केली होती.

मारहाणीवर प्रतिक्रिया देताना अभिजीत दिपके म्हणाले होते की, "शारीरिक हल्ले हे भीती आणि भ्याडपणाचे लक्षण आहेत. आम्ही शांततापूर्ण मार्गाने आमचा आवाज उठवणे सुरूच ठेवू. मी महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकरांचा अनुयायी आहे आणि शांतता व प्रेमाच्या जोरावर हा लढा लढत राहीन."

"धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे," अशीही मागणी त्यांनी केली होती.

सीजेपीचं जंतर मंतरवरील पहिलं आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची सुरुवात जंतर मंतरवरूनच झाली होती. 6 जूनरोजी कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके अमेरिकेतून दिल्लीत आले. त्यांनी सोशल मीडियावरून आपल्या भारतात येण्याबाबतची माहिती दिली होती.

दिल्ली पोलिसांनी कॉक्रोच जनता पार्टीला जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली. त्यानुसार, 6 जूनरोजी 2-3 हजार समर्थकांच्या साथीने कॉक्रोच जनता पार्टीचं एकदिवसीय आंदोलन पार पडलं. या आंदोलनात पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुकदेखील सहभागी झाले होते.

आंदोलनात सहभागी झालेल्या समर्थकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली.

अशी सुरू झाली ही 'ऑनलाइन चळवळ'

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक वक्तव्य केल्यानंतर त्याच्या विरोधात ही 'ऑनलाइन चळवळ' सुरू झाली होती.

न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी त्यांच्या त्या वक्तव्यात काही 'फेक डिग्री असणाऱ्या तरुणां'ची तुलना झुरळांबरोबर केली होती. याच वक्तव्यानंतर अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर 'कॉकरोच जनता पार्टी'ची घोषणा केली. त्यानंतर त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर फॉलोअर्सचा अक्षरशः पूर आला.

मूळच्या छत्रपती संभाजीनगरच्या अभिजीत दिपके या तरुणाने अमेरिकेच्या बोस्टनमध्ये बसून कॉक्रोच जनता पार्टी नावाने एक वेबसाईट, इंस्टाग्राम हॅन्डल आणि एक्सचं खातं बनवलं. आणि बघता बघता संपूर्ण देशभर ही कॉक्रोच जनता पार्टी अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरली.

इन्स्टाग्रामवर अवघ्या काही तासांतच त्यांनी भाजप, काँग्रेससह देशातील अनेक प्रमुख राजकीय पक्षांच्या फॉलोअर्सच्या संख्येलाही मागे टाकलं.

दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीच्या अधिकृत एक्स अकाउंटवर भारतात बंदी घालण्यात आली. @CJP_2029 हे एक्स खातंही बंद करण्यात आलं.

मात्र काही तासांतच ते नव्या खात्यासह पुन्हा एक्सवर सक्रिय झाले. एक्सने केलेल्या या कारवाईनंतर अभिजित दिपके यांनी 'कॉक्रोच इज बॅक' (@Cockroachisback) या नावाने एक नवीन अकाउंट सुरु केलं. याही अकाउंटला नेटकऱ्यांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला. सध्या याच अकाउंटवरून कॉक्रोच जनता पार्टी आपली भूमिका मांडत असते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.