You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काँगोच्या जंगलात सापडलं नारिंगी ओठांचं माकड, अभ्यास करणाऱ्या पथकाला मिळाली महत्त्वाची माहिती
- Author, व्हिक्टोरिया गिल
- Role, विज्ञान प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या जंगलात एक नवीन प्रकारचं माकड सापडलं असून अभ्यासकांनी ही माकडांची नवीन प्रजाती असल्याचं जाहीर केलं आहे.
या माकडांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे ओठ गुलाबी-नारिंगी रंगाचे आहेत. काळ्या केसांचं हे माकड काँगोच्या मध्य-पूर्व भागातील लोमामी नॅशनल पार्कमध्ये आढळलं. घनदाट जंगलात खूप उंच झाडांवर लपलेल्या या माकडाला लोकांनी पाहिले आणि त्याचे फोटोही टिपले.
पर्यावरणप्रेमींनी 2008 मध्ये पहिल्यांदा या जरा वेगळ्या दिसणाऱ्या माकडाला पाहिले होते. पण तेव्हा त्यांना त्याचा फक्त एक अंधुक आणि अस्पष्ट फोटोच घेता आला होता.
त्यानंतर तब्बल 10 वर्षांनी हे माकड पुन्हा एकदा दिसले तेव्हा एका आंतरराष्ट्रीय पथकानं या माकडाचा शोध घेण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी मोहीम आखली. त्यांच्या अभ्यासातूनच ही माकडांची एक नवीन प्रजाती असल्याचं हे समोर आलं.
गेल्या 75 वर्षांमध्ये आफ्रिकेत सापडलेली माकडांची ही पाचवी नवी प्रजाती आहे.
फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी करणाऱ्या ज्युनियर अंबोको नावाच्या विद्यार्थ्याने या माकडाचा शोध घेण्यात मुख्य भूमिका बजावली.
त्यांनी माकडांचे आवाज रेकॉर्ड केले, फोटो काढले आणि त्यांच्या डीएनएची सखोल तपासणी केली.
हा शोध 'PLoS One' नावाच्या मासिकात छापून आला आहे. ज्या प्राण्याबद्दल जगातील खूपच कमी लोकांना माहिती आहे, अशा प्राण्याला समोरासमोर पाहणं हा एक "खूपच थक्क करणारा आणि आनंददायी अनुभव होता, असं ज्युनियर अंबोको यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं
लाजाळू प्रजाती
नवीन प्रजातीचा शोध लागणं म्हणजे ती इतर प्राण्यांपेक्षा वेगळी आहे हे अधिकृतपणे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करावं लागतं. स्थानिक लोकांना या माकडाबद्दल आधीपासूनच माहिती होती आणि ते त्याला 'लिक्वेली' या नावाने हाक मारतात.
पण ज्युनियर अंबोको यांनी सांगितलं की, हे माकड थोडं लाजाळू आहे त्यामुळे ते नेहमी उंच झाडांवर लपून बसतं.
ज्युनियर अंबोको यांनी सांगितलं की, "शोधादरम्यान आम्ही या माकडांच्या राहण्याच्या ठिकाणाजवळ असलेल्या 52 गावांमध्ये जाऊन लोकांशी चर्चा केली. पण फक्त आठ गावांतल्या लोकांनीच या माकडाला कधीतरी पाहिल्याचं सांगितलं."
डीआरसी (काँगो), अमेरिका आणि जर्मनी येथील या शास्त्रज्ञांच्या या टीमने देशातील नैसर्गिक विविधतेचा विचार करून या प्राण्याला 'कोलोबस काँगोएन्सिस' (Colobus congoensis) हे लॅटिन नाव दिलं.
हे माकड 'कोलोबस' माकडांच्या कुटुंबातीलच एक आहे. फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक केट डेटवाइलर यांच्या मते, "आफ्रिकेतील माकडांची ही एक खूप महत्त्वाची प्रजाती आहे. विशेष म्हणजे या माकडांना हाताचे अंगठे नसतात."
प्राध्यापक डेटवाइलर यांनी सांगितलं की, "झाडांच्या उंचावर राहणारे ही शाकाहारी माकडं जंगलाच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
जंगलात झाडांच्या बिया पसरवणे आणि नवीन झाडे रुजवून ती वाढवणे, यामध्ये या माकडांचा मोठा हात असावा असे आम्हाला वाटते."
या माकडांच्या चेहऱ्यावर असलेल्या वेगळ्या आणि ठळक रंगाच्या खुणांबद्दल प्राध्यापक डेटवाइलर यांनी अंदाज व्यक्त केला.
"इतर प्राण्यांना काहीतरी इशारा देण्यासाठी किंवा आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी निसर्गाने दिलेला हा संकेत असू शकतो. तसेच यामुळे ही माकडं एकमेकांना सहज ओळखू शकत असावीत," असं ते म्हणाले.
या माकडांचा ओरडण्याचा आवाजही एकदम वेगळा असतो. जणू काही ते गर्जनाच करत आहेत.
ज्युनियर अंबोको यांनी सांगितलं की, "त्यांचा आवाज बऱ्याचदा ऐकू येतो पण ते डोळ्यांना मात्र सहसा दिसत नाहीत."
ही माकडं खूपच दुर्मिळ आहेत आणि ते जंगलातील फक्त अशाच ठराविक भागात राहतात जिथे त्यांना त्यांचे आवडते अन्न आणि सुरक्षित जागा मिळते, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे
मांसासाठी या माकडांची शिकार केली जाते. त्यामुळं आता या नवी प्रजाती म्हणून ओळख मिळाल्यामुळं त्यांना अधिकृतपणे संरक्षण मिळेल, अशी आशा संशोधकांना आहे.
शास्त्रज्ञांना या लपून राहणाऱ्या नवीन माकडांबद्दल अजून खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत.
जंगलात या प्रजातीची एकूण किती माकडं शिल्लक आहेत याचा अंदाज घेण्यासाठी आणि त्यांच्या स्वभावाचा अभ्यास करण्यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.