रोहित शर्मा : इंग्लंडविरुद्धचा तिसरा वनडे 'हिटमॅनचा' अखेरचा सामना ठरू शकतो, यावर अशी सुरू आहे चर्चा

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

रोहित शर्मा 14 जुलै रोजी ॲजबेस्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात 21 चेंडूत 11 धावा करून बाद झाला होता. या 21 चेंडूंमध्ये 15 चेंडू डॉट्स होते.

गुरुवारी कार्डिफ येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मा खेळपट्टीवर संघर्ष करताना दिसला आणि 47 चेंडूंमध्ये 26 धावांची खेळी केली. यावेळी 47 चेंडूंमध्ये 31 चेंडू डॉट्स होते.

बाद झाल्यानंतर रोहित शर्मा संथ पावलांनी पॅव्हेलियनकडे परतत होता. या दोन खेळीनंतर भारतीय माध्यमांमध्ये बातम्या येऊ लागल्या की इंग्लंडविरुद्ध रविवारी लॉर्ड्स येथे तो आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळू शकतो.

इंडियन एक्स्प्रेसने आपल्या वृत्तात लिहिलंय, बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने त्यांना आपल्या योजनेबद्दल माहिती दिली आहे.

या वृत्तात पुढे म्हटलंय, "सूत्रांच्या माहितीनुसार, निवड समितीने गेल्या आठवड्यात प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत रोहित शर्माशी याबाबत चर्चा केली होती. निवड करणारे सदस्य यशस्वी जैस्वाल याच्यासारख्या युवा खेळाडूंना संधी देऊ इच्छितात, जे दीर्घकाळापासून आपल्या संधीची वाट पाहत आहेत. समितीने हेही स्पष्ट केले आहे की 2027 वर्ल्ड कपच्या योजनांमध्ये त्यांना रोहित शर्मासाठी कोणतीही भूमिका दिसत नाही."

टाइम्स ऑफ इंडियाने म्हटलंय, "आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लंड मालिकेनंतर रोहित शर्मा वनडे संघाचा पहिली पसंतीचा सलामीवीर राहणार नाही, असा निर्णय निवड समितीने घेतला आहे.

सध्याची परिस्थिती पाहता, रविवारी लॉर्ड्स येथे खेळला जाणारा तिसरा वनडे हा 39 वर्षीय रोहित शर्माचा भारतासाठीचा अखेरचा सामना ठरू शकतो."

दोन फॉरमॅटमधून आधीच निवृत्ती

रोहित शर्मानं यापूर्वीच आंतरराष्ट्रीय टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. टी-20 विश्वचषकात भारताला विजय मिळवून दिल्यानंतर काही तासांतच, 29 जून 2024 रोजी त्याने ही निवृत्ती जाहीर केली होती.

त्यानंतर, 7 मे 2025 रोजी, इंग्लंड दौऱ्यापूर्वी, त्याने इंस्टाग्रामवरील एका पोस्टद्वारे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

गेल्या वर्षी, निवड समितीनं रोहित शर्माला वन डे कर्णधारपदावरून हटवून शुभमन गिलला कर्णधार केलं. एकदिवसीय कर्णधार म्हणून रोहित शर्माने भारताला 2023 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचवले. त्यानंतरच्या वर्षी, त्याच्या नेतृत्वात भारताने 2024 चा टी-20 विश्वचषकही जिंकला.

रोहित शर्माबद्दलच्या या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील अभिषेक सिंघवी यांनी इन्स्टाग्रामवर लिहिलं, "काही खेळाडू त्यांनी केलेल्या धावांसाठी ओळखले जातात. पण काही मोजकेच खेळाडू असे आहेत, जे त्यांनी संपूर्ण देशाला दिलेल्या विश्वासासाठी ओळखले जातात. रोहित शर्मा त्या खेळाडूंपैकी एक आहे. महान खेळाडू क्रिकेटमधून निवृत्त होतात, लोकांच्या आठवणींमधून नाही."

क्रीडा पत्रकार विक्रांत गुप्ता यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटलं की, "वन डे आणि टी-20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माचं विराट कोहलीशी जे नातं होतं, तेच कसोटी क्रिकेटमध्ये राहुल द्रविडचं सचिन तेंडुलकरशी होतं. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आतापर्यंतच्या सर्वकालीन महान खेळाडूंपैकी तो एक आहे."

मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. रोहित शर्मानेही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अंतिम निर्णय आता स्वतः रोहित शर्माच्या हातात आहे, असं म्हटलं जात आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं की, मंडळातील कोणालाही रोहित शर्मावर निवृत्तीसाठी दबाव आणायचा नाही. मात्र, पुढील वर्षातील सामने आणि 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी लक्षात घेता, निवड समितीला यशस्वी जैस्वालला संधी देत ​​राहायचं आहे.

रोहितच्या कामगिरीवर प्रश्न

गेल्या काही महिन्यांत रोहित शर्माच्या कामगिरीमुळं त्याच्या भविष्याबद्दल उपस्थित होणाऱ्या प्रश्नांचं प्रमाण वाढलं आहे.

रोहितने त्याच्या अखेरच्या आठ वन डे खेळींमध्ये फक्त 241 धावा केल्या आहेत. त्यात त्याची सरासरी 30 पेक्षा थोडी जास्त आणि स्ट्राइक रेट 90 पेक्षा कमी राहिला. त्याने या काळात फक्त एक अर्धशतक झळकावलं आहे. त्यामुळं संघातील त्याच्या स्थानाबद्दल अधिक चर्चा होत आहे.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानं या अडचणींमध्ये आणखी भर घातली. रोहितनं 47 चेंडूंमध्ये 26 धावा केल्या. त्याच्या खेळण्यात सहजपणाही दिसला नाही. अखेर विल जॅक्सच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. नव्या चेंडूविरुद्ध त्याची संथ फलंदाजी, भारताचा पराभव होऊनही अधिक लयीत दिसलेल्या विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या कामगिरीच्या अगदी विरुद्ध होती.

इंग्रजी वृत्तपत्र 'बिझनेस स्टँडर्ड'नं एका वृत्तात लिहिलं की, रोहित शर्मा ऐवजी जैस्वालला निवडण्याच्या बाजूनं सर्वात प्रबळ युक्तिवाद म्हणजे यशस्वी जैस्वालची झपाट्याने होणारी प्रगती हे आहे, असं समजलं मानली जात आहे.

बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, "यशस्वीनं जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे, तेव्हा कामगिरी केली आहे. अलिकडेच, त्याने तीन डावांमध्ये दोन शतकं झळकावली, त्यामुळं निवडकर्त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे की त्याला अधूनमधून नव्हे, तर सातत्याने संधी मिळायला हव्यात. भारतीय संघ व्यवस्थापनाचा असा विश्वास आहे की, जर त्याच्या संघात नियमित समावेशास आणखी विलंब झाला, तर तो 2027 च्या विश्वचषकासाठी पूर्णपणे तयार होणार नाही."

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, "चॅम्पियन्स ट्रॉफीपासून रोहित शर्माच्या फलंदाजीच्या शैलीत पूर्णपणे बदल झाला आहे. तो आता अधिक सावधगिरीने आणि संयमाने फलंदाजी करत आहे. संघ व्यवस्थापनाचा विश्वास आहे की, कोणत्याही मालिकेत लय मिळवण्यासाठी त्याला किमान तीन सामन्यांची आवश्यकता आहे."

रोहित समोरील हे आव्हान नवं नाही. कारण त्यानं इतर दोन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. तो देशांतर्गत क्रिकेटही खूप कमी खेळतो.

गेल्या हंगामात, तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये फक्त दोन सामने खेळला, त्यापैकी एक सिक्कीमविरुद्ध होता. त्याला फॉर्म परत मिळवण्यासाठी अधिक वेळेची गरज आहे. निवड समितीने हे मत त्याच्यासमोर मांडले आहे. आता, पुढे काय करायचे यावर रोहित आणि बोर्डाला मिळून निर्णय घ्यावा लागेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)