‘तुम्ही गद्दार आहात’... बच्चू कडूंची गाडी अडवून एका वयोवृद्धाचा शाब्दिक हल्ला

Published

आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा असा –

1. ‘तुम्ही गद्दार आहात’... बच्चू कडूंची गाडी अडवून एका वयोवृद्धाचा शाब्दिक हल्ला

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे.

40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडूही शिंदे गटात सामील झाले. यावरून एका वयोवृद्ध व्यक्तीने बच्चू कडूंची गाडी अडवून त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. तुम्ही गद्दारी का केली? असा सवाल वृद्धाने विचारला आहे.

ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

बच्चू कडू यांनी नुकताच धाराशिव जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी संबंधित वृद्ध व्यक्तीने गर्दीत घुसून बच्चू कडू यांना जाब विचारला या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

2. मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा गजाआड

मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे फोनवरून पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनीही फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास चालू केले.

त्यानंतर काही काळातच मुंबईत बॉम्बस्फोट होणार अशा माहितीचा फोन करणाऱ्या व्यक्तीला पालघर, डहाणूमधून अटक करण्यात आली. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव अश्विन महिसकर असल्याचे सांगण्यात आले आहे.

ही बातमी टीव्ही 9 ने दिली आहे.

मुंबईतील नलबाजार, मेहंदी बाजार आणि जेजे हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची नागपूर पोलीस कंट्रोल रूममध्ये माहिती देण्यात आली होती.

त्यानंतर तपासाची सूत्रे गतिमान करून या प्रकरणातील संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून या प्रकरणाची माहिती मिळाली असली तरी त्याचा आणखी कोणत्या गुन्ह्यात समावेश आहे का त्याचा शोध पोलीस करत आहेत.

3. महाराष्ट्रात उष्णतेची लाट, 11 ते 4 बाहेर पडू नका : हवामान विभाग

मागील काही दिवसांपासून राज्याच्या तापमानात प्रचंड वाढ होत आहे. राज्यातील थंडीचा जोर कमी झाला आहे. फ्रेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा चटका जाणवू लागला आहे.राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून उन्हाचा चटका आणखी वाढणार आहे.

महाराष्ट्राच्या अनेक भागात अतिउष्णतेची लाट येणार आहे असं हवामान विभागाने म्हटलं आहे. ही बातमी झी 24 तासने दिली आहे.

नागरिकांनी दुपारी 11 ते 4 वाजेपर्यंत कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये अस आवाहन देखील हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

4. शिंदे-ठाकरे प्रकरण याच आठवड्यात संपविण्याचे 'आदेश’

महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या काळात राज्यपालांकडून घटनात्मक मर्यादांचे उल्लंघन झाले काय? राज्यपालांची ही भूमिका उद्धव ठाकरे सरकार उलथून टाकण्याला कारणीभूत ठरली काय? या मुद्यावर ठाकरे व शिंदे गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद केले.

गेल्या आठवड्यात अपूर्ण राहिलेला युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी मंगळवारी, 28 फेब्रुवारी रोजी पूर्ण केला. त्यावेळी हे प्रकरण याच आठवड्यात संपवा, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वकिलांना सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लवकर लागू शकतो.

ही बातमी लोकमतने दिली आहे.

सरन्यायाधीशांनी राज्यपालांच्या हेतू व मर्यादा भंगांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्याच्या अधिकाराला वैधानिक आधार काय आहे? असा सवाल केला.

5. भारताच्या जीडीपीत घसरण, महागाईचा फटका

चालू वित्त वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत भारताच्या अर्थव्यवस्थेला जबर झटका बसला असून सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) वृद्धीदर घसरून 4.4 टक्के झाला आहे.

अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर 5 टक्क्यांच्या खाली येणे हा चिंतेचा विषय आहे.

ही बातमी पुढारीने दिली आहे.

मंगळवारी, 1 मार्चला सरकारच्या वतीने जीडीपीच्या वृद्धीदराचे आकडे जाहीर करण्यात आले. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या गतीला जबर ब्रेक लागल्याचे या त्यातून दिसून येत आहे. जीडीपीचा वृद्धीदर 2021-2022 च्या तिसऱ्या तिमाहीत तो 5.2 टक्के होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)