You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराणमध्ये पुन्हा स्फोट, अमेरिकेचे सलग सहाव्या रात्री हल्ले; होर्मुझमध्ये काय घडतंय?
- Author, जारास्लोव लुकिव आणि टोबी मान
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
इराणमध्ये नव्याने स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेने सलग सहाव्या रात्री इराणवर नव्या हल्ल्यांची मालिका सुरू केली, असे अमेरिकन लष्कराने म्हटले आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रणासाठी दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष सुरू असताना हे हल्ले करण्यात आले.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (Centcom) ने सांगितलं, हे हल्ले "इराणच्या लष्करी क्षमतेला आणखी कमकुवत करण्यासाठी" करण्यात आले. सामुद्रधुनीवरील नाकेबंदीचा भाग म्हणून त्यांनी एका जहाजावर चढाई केली, असंही त्यांनी सांगितलं.
तर अमेरिकन क्षेपणास्त्रांनी सामुद्रधुनीजवळील केश्म बेटाजवळ, तसेच बंदर अब्बास आणि बुशेहर येथे हल्ले केले, असं इराणच्या सरकारी माध्यमांनी वृत्त दिलं आहे. बुशेहर येथे अणुऊर्जा प्रकल्प आहे.
संघर्षाच्या तीव्रतेत वाढ झाल्याचे संकेत देत, सरकारी माध्यमांनी म्हटलं की, होर्मोजगान प्रांतातील दोन पूलही लक्ष्य करण्यात आले.
बीबीसीने होर्मोजगान प्रांतातील बंदर अब्बासच्या पश्चिमेकडील एका पुलावर झालेल्या हल्ल्याची पडताळणी केली आहे.
ट्रम्प यांनी दिली होती धमकी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण चर्चेसाठी परत न आल्यास त्यांचे पूल आणि वीज प्रकल्पांवर हल्ले करण्याची धमकी या आठवड्याच्या सुरुवातीला दिली होती.
एप्रिलमध्ये ट्रम्प यांनी अमेरिकेकडून इराणमधील नागरी पायाभूत सुविधांवर, ज्यामध्ये पूल आणि वीज प्रकल्पांचाही समावेश होता अशा जागी बॉम्बहल्ले केले जातील असं म्हटलं होतं.
त्यानंतर संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांनी म्हटलं होतं की, "जाणीवपूर्वक नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांवर हल्ला करणे हा युद्धगुन्हा (वॉरक्राईम) आहे."
युद्धातील मानवीय आचरणासंदर्भातील 1949 जिनिव्हा कराराद्वारे नागरिकांसाठी अत्यावश्यक मानल्या जाणाऱ्या ठिकाणांवरील हल्ल्यांवर बंदी घातलेली आहे.
सेंटकॉमने असंही म्हटलं की, मंगळवारी रात्री सुरू झालेल्या इराणच्या बंदरांच्या नव्या अमेरिकी नाकेबंदीचा भाग म्हणून नाविक दलाने ओमानच्या आखातात एका तेलवाहू जहाजावर चढाई केली.
त्यांनी पुढे सांगितलं की, "नाकेबंदी मोडण्याचा प्रयत्न करणारी 3 व्यापारी जहाजं वळवण्यात आली."
सेंटकॉमनुसार, 13 एप्रिल ते 18 जून दरम्यान इराणच्या बंदरांवरील त्यांच्या मागील नाकेबंदीच्या काळात अमेरिकन सैन्याने नऊ जहाजं निष्प्रभ केली होती आणि 140 हून अधिक जहाजांना वळवलं होतं.
युद्ध समाप्त करण्यासाठी झालेल्या प्राथमिक करारावर वाढत्या संघर्षामुळे आणखी ताण निर्माण होत असतानाच, ट्रम्प अजूनही इराणशी चर्चेसाठी तयार आहेत असं व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेव्हिट यांनी गुरुवारी सांगितलं.
त्यांनी पत्रकारांना सांगितलं, "जेव्हा ते अमेरिकेला दिलेल्या शब्दांपासून मागे हटतात, तेव्हा अध्यक्ष त्यांना जबाबदार धरणार. पण त्याच वेळी ते नेहमीच राजनैतिक तोडग्यासाठी तयारही असतात."
त्यांनी सांगितलं की, इराणने अजूनही अमेरिकेशी करार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, "आम्ही त्यांच्याशी बोलत आहोत, पण पुन्हा सांगते, अध्यक्ष त्यांना कोणत्याही परिणाम भोगायला लावल्याशिवाय सामुद्रधुनीतील जहाजांवर गोळीबार करू देणार नाहीत."
हल्ल्यांची तीव्रता वाढत असताना, इराणच्या किनाऱ्यालगतची आणि जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुझ सामुद्रधुनी बंदच राहिली आहे. अमेरिकन-इस्रायली हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात तेहरानने ती बंद केली होती.
यापूर्वी गुरुवारी, तेहरानने जॉर्डन, कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकी लष्करी तळांवर हल्ले केल्याचा दावा केला, तर अमेरिकेने सामुद्रधुनीतील अनेक ठिकाणांवर सहा तास चाललेल्या हल्ल्यांची मालिका केल्याचं सांगितलं.
या कारवाया ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्यानंतर झाल्या. त्यांनी म्हटलं होतं की, इराणने 'योग्य वर्तन' करावं, अन्यथा चर्चेसाठी परत न आल्यास त्याला आणखी लष्करी कारवाईला सामोरं जावं लागेल.
इराणद्वारे वाटाघाटीत सहभाग घेणारे मोहम्मद बाघेर घालीबाफ यांनी सरकारी माध्यमांना सांगितलं की, देशाच्या हिताचा नसेल अशा कोणत्याही कराराचं पालन करण्याचं तेहरानकडे "कोणतंही कारण नाही."
इराणच्या राष्ट्रीय सुरक्षेचा आधार होर्मुझ सामुद्रधुनीतील "इराणी व्यवस्था" टिकवून ठेवण्यावर आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, बुधवारी ट्रम्प यांनी डेना करारी या अमेरिकन नागरिकाच्या सुटकेबद्दल इराणचं कौतुक केलं. करारी यांना डिसेंबर 2024 मध्ये "चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आलं होतं," असं त्यांनी म्हटलं.
"इराणने दाखवलेल्या या सद्भावनेच्या कृतीबद्दल अमेरिकेची संयुक्त संस्थानं आभारी आहेत!" असं ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट केलं आहे.
त्या अमेरिकेत परतण्याच्या मार्गावर आहेत, असं करारी यांच्या वकील जॅरेड जेन्सर यांनी सांगितलं आहे.
मात्र, गुरुवारी इराणच्या न्यायव्यवस्थेने आपल्या कारागृहांतून कोणत्याही अमेरिकन कैद्याची सुटका किंवा अदलाबदल करण्यात आलेली नसल्याचं म्हटलं, अशी माहिती इराणच्या सरकारी माध्यमांनी दिली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)