You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'चूक मान्य करा नाहीतर परिणाम भोगा'; होर्मुझवरून ट्रम्प यांनी इराणला दिला थेट इशारा
- Author, ॲना फ़ागे
- Role, वॉशिंग्टन
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
इराणने सार्वजनिकपणे होर्मुझ सामुद्रधुनी खुली असल्याची घोषणा करावी आणि शनिवारी होणाऱ्या चर्चेअंतर्गत व्यापारी जहाजांवर गोळीबार थांबवण्याचं वचन द्यावं, अशी अमेरिकेची इच्छा आहे.
इराणने खासगी पातळीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागारांकडे कबूल केलं की जहाजांवर झालेला गोळीबार ही एक चूक होती, असं अमेरिकी माध्यमांनी नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांच्या वक्तव्याच्या आधारावर म्हटलं आहे.
मात्र, वृत्तांनुसार इराणने याची जबाबदारी आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या एका अंतर्गत गटावर टाकली आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीसंदर्भात या आठवड्यात झालेल्या चकमकी असूनही दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू ठेवण्यावर सहमती दर्शवली आहे.
व्हाइट हाऊसनं या घटनेला युद्धविरामाचं उल्लंघन मानलं आहे, असं ट्रम्प यांनी सांगितलं आहे.
'इराणने चूक मान्य करावी नाहीतर परिणामांसाठी तयार राहावं'
जूनमध्ये अमेरिका आणि इराण यांनी युद्धविराम करारावर स्वाक्षरी केली होती. त्याअंतर्गत इराणने व्यापारी जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याचंही मान्य केलं होतं.
बीबीसीच्या अमेरिकेतील सहयोगी सीबीएस न्यूजला वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, इराणचा दावा आहे की कट्टरपंथीयांचा एक 'अनियंत्रित' गट व्यापारी जहाजांवर गोळीबार करून चर्चा कमकुवत करण्याचा प्रयत्न करत होता.
"ते (इराण) पुन्हा चर्चेच्या टेबलवर आले आणि म्हणाले, 'आमच्याकडून चूक झाली. आम्ही चूक केली. चला, चर्चा सुरू ठेवू." असं एका अधिकाऱ्याने टीव्ही नेटवर्क (सीबीएस न्यूज) ला सांगितलं.
तर प्रादेशिक मध्यस्थांच्या माध्यमातून इराणी नेतृत्वाला संदेश पाठवण्यात आला आहे. त्यात इराणने एक निवेदन जारी करावं, ज्यात होर्मुझ खुली असल्याचं घोषित करावं आणि व्यापारी जहाजांवर गोळीबार थांबवण्याची घोषणा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे, असं शुक्रवारी पत्रकारांशी झालेल्या ब्रीफिंगमध्ये अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितलं.
अनेक माध्यमांच्या वृत्तांत ही माहिती देण्यात आली आहे.
रॉयटर्सनुसार, एका अधिकाऱ्याने म्हटलं, "ते आम्हाला हे निवेदन देतील किंवा मग त्यांच्यासाठी परिणाम चांगले नसतील."
सीबीएसच्या वृत्तानुसार, व्हाइट हाऊसची हीदेखील इच्छा आहे की इराणने जहाजांवर झालेला गोळीबार ही चूक होती, हे सार्वजनिकपणे मान्य करावं.
शुक्रवारी नव्या हल्ल्याची माहिती नाही
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स, परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ आणि पश्चिम आशियाविषयक चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावणारे दोन जण, ज्यामध्ये विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांचा समावेश आहे, ते शनिवारी ओमानमध्ये होणाऱ्या चर्चेचं नेतृत्व करू शकतात.
दरम्यान, कतारचं एक शिष्टमंडळ शुक्रवारी इराणमध्ये पोहोचलं. या भेटीचा उद्देश तणाव कमी करणं आणि होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांची वाहतूक सुरळीत ठेवण्याबाबत चर्चा करणं हा आहे.
ट्रम्प यांनी शुक्रवारी ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये लिहिलं, "इराणच्या इस्लामिक रिपब्लिकने आमच्याकडे चर्चा सुरू ठेवण्याची विनंती केली आहे."
ते पुढे म्हणाले, "आम्ही त्यासाठी सहमती दर्शवली आहे, पण अमेरिकेने त्यांना पूर्ण स्पष्टतेसह सांगितलं आहे की शस्त्रसंधी आता संपली आहे."
या आठवड्याच्या सुरुवातीला आखाती प्रदेशात चकमकी सुरू झाल्यानंतर शुक्रवारी कोणत्याही नव्या हल्ल्याची माहिती मिळाली नाही.
जूनमध्ये दोन्ही देशांदरम्यान अंतरिम करारावर स्वाक्षरी झाल्यानंतरची ही अमेरिका आणि इराण यांच्यातील सर्वात गंभीर लष्करी चकमक मानली जाते.
अमेरिकेने सुचवलेल्या ओमानच्या सागरी मार्गाचा वापर करत असताना तीन जहाजांना लक्ष्य करण्यात आलं.
आपल्या सागरी क्षेत्रातून जाणारा पर्यायी मार्ग हाच एकमेव "सुरक्षित" मार्ग आहे, असं इराणने अनेकदा म्हटलं आहे.
होर्मुझचं भवितव्य
एकूणच गेल्या महिन्यात दोन्ही देशांच्या चर्चेत प्रगती तेव्हा झाली जेव्हा अमेरिका आणि इराण 14 मुद्द्यांच्या एका एमओयूवर सहमत झाले. याचा उद्देश युद्धविरामाची मुदत वाढवणं आणि "सर्व आघाड्यांवरील" संघर्ष संपवणं हा होता.
या कराराअंतर्गत इराण आणि ओमान यांनी इतर आखाती देशांसह मिळून होर्मुझ सामुद्रधुनीच्या भविष्यातील प्रशासन आणि सागरी सेवांच्या व्यवस्थेबाबत निर्णय घेण्यासाठी चर्चा करायची आहे.
संघर्षादरम्यान इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवरील आपलं सार्वभौमत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.
यासाठी त्याने "पर्शियन गल्फ स्ट्रेट अथॉरिटी"ची स्थापना केली, जी "सुरक्षित प्रवासासाठी परवाने" जारी करण्याचं काम करेल, असा त्याचा दावा होता.
इराणच्या फर्स वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे की अमेरिकेसोबतच्या नव्या कराराअंतर्गत अखेरीस होर्मुझ सामुद्रधुनीचं व्यवस्थापन इराण आणि ओमान यांच्या समन्वयाने केलं जाईल.
यामध्ये या जलमार्गातून जाणाऱ्या जहाजांकडून संभाव्य "सेवा शुल्क" आकारण्याची तरतूदही असू शकते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.