You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेच्या अॅरिझोना प्रांतातील तलावात बुडून कसा झाला भारतीय कुटुंबाचा मृत्यू?
अमेरिकेच्या अॅरिझोना प्रांतातील एका तलावात बुडून भारतीय कुटुंबातील काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.
यातून ज्या दोन मुली बचावल्या होत्या त्यांना आता अमेरिकेतील नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलंय. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या दोन्ही मुलींना लवकरच भारतात त्यांच्या कुटुंबीयांकडे पाठवले जाईल.
यातल्या एका मुलीचं वय सात आणि दुसरीचं वय बारा वर्षे आहे. आई वडिलांच्या मृत्यूनंतर त्या दोघींनाही अॅरिझोना डिपार्टमेंट ऑफ चाईल्ड सेफ्टी विभागाकडे ठेवण्यात आलं होतं.
या मुलींची आई हरिता मुद्दन्ना, वडील नारायण मुद्दन्ना (49 वर्षे) आणि त्यांचे फॅमिली फ्रेंड असलेले गोकुल मेडिसेती (47 वर्षे) यांचा अॅरिझोना येथील कोकोनिनो काउंटीच्या वुड्स कॅनियन तलावात बुडून मृत्यू झाला होता.
26 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर अॅरिझोना डिपार्टमेंट ऑफ चाईल्ड ऑफ सेफ्टी विभागाने मुलींचा ताबा घेतला.
मुलींना लवकरच भारतात पाठवण्यात येईल
कोकोनिनो काउंटी शेरिफ ऑफिसचे जॉन पॅक्स्टन यांनी एबीसी 15 डॉटकॉमशी बोलताना सांगितलं की, "तुम्हाला मुलांशी कसं डील करायचं याची सवय नसते."
"पण त्यांना शक्य तितकं सुरक्षित वाटावं यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळापासून त्या दूर राहाव्यात आणि त्यांना उबदार वाटावं यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्यावेळेस आम्हाला जे जे काही सुचलं ते ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला." या मुलींचा ताबा मिळवण्यासाठी मुद्दन्ना कुटुंबाचे शेजारी आणि जवळचे मित्र असलेले किशोर पित्ताला पेसनला गेले. डिपार्टमेंटने ही तात्पुरत्या स्वरूपात त्यांना मुलींची जबाबदारी दिली आहे.
एबीसी 15 डॉटकॉमशी बोलताना किशोर पित्ताला म्हणाले की, "त्यांच्या चेहऱ्यावरून कळत होतं की त्या दुःखी आहेत. पण त्यांच्या स्थितीत पूर्वीपेक्षा सुधारणा झाली आहे."
दरम्यान, अॅरिझोना तेलगू असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकट कोम्मिनेनी यांनी सांगितलं की, "आता या दोन्ही मुलींना लवकरच भारतात पाठवण्यात येईल. त्यांचे आजी-आजोबा भारतात आहेत आणि ते या दोन मुलींची काळजी घेतील."
अपघात कसा झाला
ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 डिसेंबरला बर्फाळ वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी तीन कुटुंबं कोकोनिनो काउंटीमधील वुड्स कॅनियन तलावाजवळ पोहोचले. यात सहा प्रौढ आणि पाच मुलांचा समावेश होता.
शेरिफ ऑफिसचे जॉन पॅक्स्टन सांगतात की, "यातल्या काही जणांना तलावाच्या वरच्या बाजूला गोठलेल्या बर्फावर उभं राहून सेल्फी घ्यायचा होता."
तिथं गेलेल्यांपैकी तीन लोक या तलावात पडले. तलावातील पाण्याचं तापमान मायनस 30 डिग्री इतकं होतं.
या गोठलेल्या बर्फावरून जे लोक तलावात पडले त्यांना वाचवण्यासाठी जवळच्या पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना बोलवण्यात आल्याचं कोकोनिनो काउंटी शेरीफ कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय.
या अपघातामुळे अॅरिझोनामधील भारतीय लोकांना दुःख झालं असून पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी लोक पुढे सरसावले आहेत.
हरिता मुद्दनाचा वाढदिवस होता
किशोर पित्ताला यांनी सांगितलं की मुद्दना कुटुंबाने काही दिवसांपूर्वीच त्यांना देखील वुड्स केनियन तलावाला भेट देण्यासाठी विचारलं होतं.
ते म्हणाले, रविवारी रात्री त्यांनी आम्हाला एक लिंक पाठवली आणि सांगितलं की आम्ही वुड्स केनियन लेकसाठी निघत आहोत. तुम्ही आमच्यासोबत येणार का? पण मी त्यांना म्हटलं मी खूप थकलेलो आहे आणि येता येणार नाही.
पण आणखी दोन कुटुंबं हरिताचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाली. वेंकट कोम्मिनेनी म्हणतात की “एकूण 11 जण त्या ठिकाणी होते आणि दोन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडणाऱ्या गोकुळ यांच्या पाठीमागे एक पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.”
मदतीसाठी क्राउड फंडिंग
वेंकट कोम्मिनेनी सांगतात की या दुर्घटनेतील पीडितांच्या मदतीसाठी अनेक जण समोर आले आहेत. काही जणांनी मुद्दना कुटुंबातील मुलींना दत्तक घेण्याची देखील तयारी दर्शवली आहे. काही जण त्या मुलींच्या संगोपनाची आयुष्यभर जबाबदारी उचलण्यास तयार आहेत.
गोफंडमी फंडरेजरने दोन्ही कुटुंबासाठी पाच लाख अमेरिकन डॉलरहून अधिक रक्कम जमा केली आहे. वेंकट कोम्मिनेनी यांनी सांगितलं की ही रक्कम मुलींच्या नावे ठेवली जाईल जेणेकरून त्यांचे शिक्षण आणि त्यांच्या भविष्यातील अन्य गरजा पूर्ण होतील.
वुड्स केनियन लेक पेयसन शहराच्या पूर्व बाजूस अपाचे सिटग्रीव्ह नॅशनल फॉरेस्ट या ठिकाणी आहे.
हरिताला बचावपथकातील कर्मचाऱ्यांनी तलावातून काढलं होतं पण तिला वाचवण्यात यश आलं नाही. इतर दोन जणांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले आहेत.
अमेरिकेत भीषण थंडीची लाट
अमेरिका आणि कॅनडामध्ये १० लाखाहून अधिक लोक हिमवादळाचा सामना करत आहेत.
या वादळांमुळे एका मोठ्या भागात भीषण बर्फ पडत आहे आणि थंड हवा सुरू आहे आणि तापमान हे गोठवून टाकण्यापर्यंत पोहोचले आहे.
या लाटेचा परिणाम क्युबेक ते टेक्सासच्या 3200 किमी परिसरात दिसत आहे. या वादळात किमान 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)