You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उपोषण, आंदोलन आणि शिक्षणात नवीन प्रयोग; जाणून घ्या सोनम वांगचूक यांचा प्रवास
- Author, दिग्विजय जिरगे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, अभियंता आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक हे मागील 18 दिवसांपासून दिल्ली येथील जंतर-मंतर या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
उपोषणामुळे वांगचूक यांची प्रकृती खालावली आहे. कॉक्रोच जनता पार्टीने दिलेल्या माहितीनुसार त्यांचे वजन सुमारे 8.5 किलोंनी कमी झाले आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
देशभरातून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली जात आहे. परंतु, सोनम वांगचूक आपल्या उपोषणावर ठाम आहेत.
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा यासह शिक्षण क्षेत्रासाठीच्या विविध मागण्यांसाठी वांगचूक हे दिल्लीतील जंतर-मंतर येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. "जोपर्यंत शिक्षण व्यवस्थेत सरकारकडून जबाबदारी निश्चित केली जात नाही, तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नसल्याचे," वांगचूक यांनी म्हटल्याचे दीपके यांनी सांगितलं आहे.
'थ्री इडियट्स' चित्रपटामुळे सोनम वांगचूक यांचं नाव देशातील घराघरापर्यंत पोहोचलं. चित्रपटात अमीर खानने साकारलेलं फुन्सुख वांगडू हे पात्र सोनम यांच्यापासून प्रेरणा घेऊन सादर करण्यात आलं होतं.
लडाखसाठी त्यांनी केलेल्या आंदोलनाने जगाचं लक्ष वेधून घेतलं. सतत नवनवे प्रयोग करणारे सोनम वांगचूक सातत्याने चर्चेत असतात.
विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि प्रशासनाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी जंतर-मंतरवर आंदोलन करत असलेल्या सोनम वांगचूक यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया.
वयाच्या नवव्या वर्षापर्यंत शाळेतच गेले नव्हते
सोनम वांगचूक हे शिक्षणतज्ज्ञ, नवोपक्रमशील संशोधक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी 'लल्लनटॉप'ला दिलेल्या एका मुलाखतीत लडाखमधील दुर्गम गावातून सुरू झालेला आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ होईपर्यंतचा आपला प्रवास सांगितला होता बीबीसी हिंदीने या मुलाखतीचा संदर्भ घेऊन लेख लिहिला होता.
60 वर्षीय सोनम वांगचूक यांचा जन्म 1966 मध्ये लेहमधील उलेटोक्पो या दुर्गम गावात झाला. ते सांगतात की, वयाच्या नवव्या वर्षापर्यंत ते शाळेत गेलेच नव्हते.
त्यामुळेच त्यांना वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची सवय लागली शाळेत जाता आले नाही, त्यामुळे त्यांच्या आईने त्यांना घरीच स्थानिक भाषेत शिकवलं. सुरुवातीचं बहुतांश ज्ञान त्यांनी स्वतःच्या अनुभवातूनच आत्मसात केलं.
वडील राजकारणी, मंत्रिमंडळात मंत्रीही
सोनम वांगचूक यांचे वडील सोनम वांग्याल हे राजकारणी होते. नंतर ते जम्मू-काश्मीर सरकारमध्ये मंत्रीही होते. सोनम 9 वर्षांचे झाल्यानंतर त्यांना श्रीनगरमधील एका स्थानिक शाळेत शिक्षणासाठी पाठवण्यात आलं.
शाळेत त्यांना थेट इंग्रजीची पुस्तकं देण्यात आली. त्यांना त्यातील काहीच समजत नव्हतं. त्यामुळे शिक्षक त्यांना अनेकदा एकतर वर्गाच्या शेवटच्या बाकावर बसवत किंवा वर्गाबाहेर उभं करत असत.
शाळेतील या त्रासाला कंटाळून वयाच्या 12व्या वर्षी ते एकटेच बसने दिल्लीला गेले. लडाखमधील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विशेष केंद्रीय विद्यालयात प्रवेश मिळावा, हा त्यांचा उद्देश होता.
पण तिथे विद्यार्थ्यांची खूपच गर्दी होती आणि प्रवेशासाठी त्यांना कित्येक दिवस छावणीत वाट पाहत थांबावं लागलं होतं.
हे सर्व पाहिल्यानंतर सोनम वांगचूक थेट शाळेच्या मुख्याध्यापकांच्या दालनात गेले आणि त्यांना प्रवेश देण्याची विनंती केली. त्यांचा हा धाडसी आणि जिद्दी स्वभाव पाहून मुख्याध्यापकांनी त्यांना प्रवेश दिला होता, असे त्यांनी त्या मुलाखतीत सांगितले होते.
बी.टेकचं शिक्षण आणि शिकवणी वर्गाची सुरुवात
यानंतर सोनम वांगचूक यांनी अभियांत्रिकी प्रवेशाची तयारी केली. श्रीनगरच्या रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये (सध्याचे एनआयटी) प्रवेशासाठीची लेखी परीक्षा ते उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते मुलाखतीसाठी गेले.
मुलाखतीदरम्यान मुख्याध्यापकांनी त्यांच्या वडिलांचं नाव पाहून ते काय करतात, असं विचारलं. त्यावर वांगचूक यांनी, 'ते शेतकरी आहेत,' असं उत्तर दिलं होतं. प्रत्यक्षात त्या वेळी त्यांचे वडील जम्मू-काश्मीरमध्ये मंत्री होते.
बी.टेकचं एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकायचं होतं, कारण त्यांना ऑप्टिक्स विषयाची आवड होती. परंतु, त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यावं.
सोनम वांगचूक यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची निवड केली. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी शिक्षणाचा खर्च उचलण्यास नकार दिला. त्यानंतर स्वतःचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली.
वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी हॉटेलमधील एक खोली भाड्याने घेऊन विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. अवघ्या 2 महिन्यांत त्यांनी आपल्या तीन वर्षांच्या अभियांत्रिकीच्या शिक्षणाची फी जमा केली.
'सेकमोल'ची स्थापना आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार
कॉलेजचं शिक्षण पूर्ण होताच 1988 मध्ये सोनम वांगचूक यांनी 'स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख' (सेकमोल) या संस्थेची स्थापना केली.
सुरुवातीच्या काही वर्षांत 'सेकमोल'ने सरकारी शाळांच्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी, बदल घडवून आणण्यासाठी काम केलं. त्याचबरोबर, शाळेत नापास झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना सेकमोलच्या कॅम्पसमध्ये शिकवलं जात होतं.
सेकमोलमध्ये पारंपरिक शालेय शिक्षणाऐवजी वेगळ्या पद्धतीने शिकवलं जातं. येथे निसर्गाच्या सान्निध्यात राहून प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्यावर भर दिला जात.
1994 मध्ये सोनम वांगचूक यांनी 'ऑपरेशन न्यू होप' (ओएनएच) सुरू केलं. या उपक्रमातून आतापर्यंत 700 शिक्षक आणि 1000 ग्राम शिक्षण समित्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे.
या उपक्रमामुळे लडाखमधील शालेय शिक्षणात मोठा बदल झाला. 1996 पर्यंत दहावीची परीक्षा फक्त 5 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होत होते. 2015 पर्यंत हा आकडा वाढून 75 टक्क्यांपर्यंत वाढला.
शालेय शिक्षणात सुधारणा आणि पर्यायी शिक्षणाची कल्पना त्यांनी विद्यापीठ स्तरावरही नेली. याच उद्देशाने त्यांनी 'हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज, लडाख' (एचआयएएल) या संस्थेची स्थापना केली.
सेकमोलमध्ये झालेल्या संशोधनाला एचआयएएलमध्ये आणखी पुढे नेलं जातं. उदाहरणार्थ, सौरऊर्जेच्या मदतीने खोल्या उबदार ठेवण्याचं तंत्र सेकमोलमध्ये विकसित झालं आणि एचआयएएलने त्यावर पुढे काम केलं.
भारतीय लष्कराच्या सहकार्याने चीनच्या सीमेवरील लष्करी छावण्यांसाठी या तंत्राचा वापर करण्यात आला. नंतर हे तंत्र अफगाणिस्तानमध्येही नेण्यात आल्याचे वांगचूक सांगतात.
2018 मध्ये शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सोनम वांगचूक यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
शेतीसाठी 'आइस स्तूपा'ची संकल्पना
सोनम वांगचूक हे नवोपक्रमशील संशोधक म्हणून ओळखले जातात. हवामान बदलामुळे शेतीसाठी पाण्याची कमतरता निर्माण होत असल्याचं पाहून त्यांनी 'आइस स्तूप' (बर्फाचे स्तूप) ही कल्पना मांडली.
'स्तूप' असे नाव दिलेल्या (बौद्ध बहुल प्रदेशात लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे नाव निवडलं) या शंकूच्या आकाराच्या बर्फाच्या टेकड्या हिवाळ्यात पाणी गोठवून ठेवतात. उन्हाळ्यात हे बर्फ वितळतं आणि त्यातून सिंचनासाठी पाणी पुरवतात.
सोनम वांगचूक आणि त्यांच्या टीमने तयार केलेल्या 6 'आइस स्तूपां'मध्ये सुमारे 3 कोटी लिटर पाणी साठवता येतं. त्यांनी लडाखपुरतंच नव्हे, तर संपूर्ण हिमालयीन भागातील लोकांपर्यंत आणि अगदी स्वित्झर्लंडपर्यंतही पर्यावरण व शिक्षणातील आपल्या कल्पना पोहोचवल्या आहेत.
तब्बल 170 दिवस तुरुंगात कैद
ऑक्टोबर 2025 मध्ये लडाखमध्ये आंदोलन भडकवल्याचा आरोप करत सरकारने सोनम वांगचूक यांना अटक केली होती. परंतु, त्यांनी हे आरोप फेटाळले होते. सुमारे 170 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर सरकारने त्यांच्यावरील आरोप मागे घेतले आणि त्यांची सुटका केली.
लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा आणि त्याचा सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश व्हावा, या मागण्यांसाठी त्यांनी यांनी 21 दिवस उपोषण केलं होतं.
ऑक्टोबर 2024 मध्येही याच मागणीसाठी त्यांनी लडाख ते दिल्ली पदयात्रा काढली होती. परंतु, दिल्ली पोलिसांनी त्यांना सिंघू सीमेवर ताब्यात घेतलं होतं.
2025 मध्ये त्यांनी 35 दिवसांचं उपोषण केलं. त्यातील 15व्या दिवशी, म्हणजे 24 सप्टेंबरला लेहमधील आंदोलन हिंसक झालं. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे 50 जण जखमी झाले होते.
हिंसक आंदोलन झाल्यानंतर दोन दिवसांनी, 26 सप्टेंबर 2025 रोजी लडाखमध्ये वांगचूक यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएसए) ते 170 दिवस तुरुंगात कैद होते.
'मी फुन्सुख वांगडू नाही'- सोनम वांगचूक
सोनम वांगचूक यांचं नाव घेतलं की नेहमी 'थ्री इडियट्स' या हिंदी चित्रपटाची चर्चा केली जाते. अनेक वर्षांपासून 'थ्री इडियट्स' चित्रपटातील आमिर खानने साकारलेलं 'फुन्सुख वांगडू' हे पात्र सोनम वांगचूक यांच्यापासून प्रेरित असल्याचं म्हटलं जातं. इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राच्या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, वांगचूक यांनी नेहमीच या दाव्यापासून स्वतःला दूर ठेवलं आहे.
त्यांचं म्हणणं आहे की, चित्रपट बनवताना त्यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नव्हती, याबाबत त्यांची परवानगीही घेतली नाही आणि त्यांनी याबाबत निर्मात्यांना पत्र लिहिलं तरी त्याचं उत्तरही मिळालं नाही. "माझ्या शाळेत गुपचूप येऊन त्यांनी चित्रपटाचं चित्रीकरण केलं," असं त्यांनी एकदा म्हटलं होतं.
'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमामध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी बोलताना सोनम वांगचूक यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते की, "हा चित्रपट माझ्यापासून प्रेरित आहे असं म्हणाल, तर मी ते नाकारणार नाही. पण संपूर्ण चित्रपट माझ्या आयुष्यावर आधारित आहे, हे मला मान्य नाही.
जोश टॉक्समधील एका भाषणात सोनम वांगचूक म्हणाले होते की, "लोक मला नेहमी विचारतात, 'थ्री इडियट्समधील शाळा हीच तुमची शाळा आहे का? तुम्हीच फुन्सुख वांगडू आहात का?' मला एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे. नाही, मी फुन्सुख वांगडू नाही. मी सोनम वांगचूक आहे."
"मी चित्रपटांत काम करत नाही, तर प्रत्यक्ष आयुष्यात काम करतो. भारताला अभिमान वाटेल असे नवे शोध आणि प्रयोग करण्यासाठी मी काम करतो."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.