गिअर, पेडल, सीट आणि दगडी जातं वापरून बनवलेली पिठाची गिरणी, जी विजेशिवाय चालते

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
    • Reporting from, जालना
  • Published

“2016 साली खूप पाऊस झाला. लाईटचे पूर्ण पोल पडले आणि 10 दिवस लाईट नव्हती. घरी जातं आहे. लाईट नव्हती मग बाऱ्याबाऱ्या खाली (आळीपाळीनं) दळून भाकरी केल्या आणि त्या खूप टेस्टेड लागल्या. मग इतकी चांगली चव कशी काय आली? तर आई म्हटली, घरच्या जात्यावर त्याची गती कमी असती, पीठ थंड येतं, म्हणून त्याच्यातले सात्विक घटक तसे राहते म्हणून चव येते.”

2016 साली हा प्रसंग घडला आणि जालना जिल्ह्यातल्या श्रीपत धामनगावचे शेतकरी सुनील शिंदे यांना पेडलवर चालणारी पिठाची गिरणी बनवण्याची कल्पना सुचली.

सुनील यांनी सायकलचे गिअर, पेडल, सीट आणि दगडी जाते वापरुन ही पिठाची गिरणी तयार केलीय.

2016 पासून सुरुवात केल्यानंतर 2018 साली पहिली गिरणी तयार झाली. पुढची 4 वर्षं त्यांनी गिरणीच अनेक बदल केले आणि आता ही गिरणी विक्रीस उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या गिरणीचं वेगळेपण सांगताना सुनील सांगतात, “याचं वेगळेपण आपलं जुन्या पद्धतीचं घरच्या जात्यावरचं दळण मिळणं, लाईटची कोणतीही आवश्यकता नाही आणि व्यायाम करण्यासाठी बाहेर जायचं काम नाही. आपल्या घरातल्या घरात आपण व्यायाम करू शकतो.”

गिरणी कशी तयार केली?

सुनील सांगतात, “त्याला आपण एक मेटलचा पाईप वापरला. गिरणीला जसा सायकलचा अँगल पाहिजे, त्या त्या अँगलनं आपण त्याची डिझाईन तयार केलीय. माणसाच्या उंचीनुसार हँडलची उंची कमी जास्त करण्याची व्यवस्था केली. सीटची उंची कमी जास्त आणि ते मागे-पुढे घेण्याची व्यवस्था केली. त्याचप्रमाणे गिअर किती साईजचा असला पाहिजे, ते पाहून त्याची बसवण्याची व्यवस्था केली.

“जात्यासाठी आपण इकडं एक विशिष्ट प्रकारची खाण आहे आणि त्याचा कणखरपणा चांगला आहे, ते लवकर घासत नाही, तो दगड वापरला. त्यानुसार आपण आपल्या डिझाईनप्रमाणे जातं बनवून घेतोय. किती जाडी आणि रुंदी असली पाहिजे तसं जातं बनवून घेतो.”

4 वर्षं आवश्यक ते बदल करून सुनील यांनी ही गिरणी आता विकण्यास सुरुवात केलीय. वेगवेगळी प्रदर्शनं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी या गिरणीचा प्रसार केला.

सध्या त्यांच्याकडे 50 ऑर्डर असून पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कर्नाटक या भागातून जास्त मागणी आहे.

ते सांगतात, “प्रतिसाद खूप आहे. पण सगळ्यांना वस्तू चांगली गेली पाहिजे म्हणून आपण काळजीपूर्वक तयार करतो. ऑर्डरवाल्यांना एक महिना थांबायला सांगतो. कारण एक महिन्यात इथं पीठ आम्ही तयार करुन पाहतो आणि नंतरच त्यांना देतो.”

पेडलवर चालणाऱ्या पिठाच्या गिरणीवर ज्यावेळेस मी दळण करायला बसलो, त्यावेळेस आपली आजी असेल किंवा आई असेल, ज्या पद्धतीनं जात्यावर बसून दळण दळत होत्या, त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

गिरणीला बसवलेल्या चाळणीशेजारी जात्यावर पडणाऱ्या गव्हाचा स्पीड कमी जास्त करण्यासाठी व्हॉल्व्ह बसवलेला आहे. गव्हाचे दाणे कमी कमी पडले खाली पडणारं पीठ एकदम मऊ येतं.

पीठ पडण्यासाठी एका बाजूला तशी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या गिरणीचं पेटंट मिळवण्यासाठी सध्या सुनील यांचे प्रयत्न सुरू आहेत. पुढेही त्यांचे काही प्लॅन्स आहेत.

ते सांगतात, “ज्या काही नॅचरल वस्तू आहेत, जुन्या आहेत. याच्यावरलंच खाणं चवदार आहे आणि शरिरासाठी चांगलं आहे. त्यामुळे जशी आपण गिरणी वेगळ्या पद्धतीची बनवली, तसंच आपला पाटा वरवंटा आहे, त्याच्यावर कुणी वाटायला तयार नाही कारण हाताची आग होते. तर आधुनिक पद्धतीचा पाटा वरवंटा तयार करण्याची डिझाईन चालू आहे.”

सुनील 2002 सालापासून वेगवेगळ्या प्रकारची यंत्र बनवताहेत. आतापर्यंत एकूण 28 प्रकारची अवजारं बनवल्याचं ते सांगतात. यात बैल चलित रोटावेटर, मानव चलित खत पेरणी यंत्राचा समावेश आहे.

पण, याची कल्पना त्यांना सुचली कशी?

ते सांगतात, “शेती करत असतानाच नवनवीन अवजारं बनवण्याची कल्पना सूचत राहिली. मजुरांची अडचण येईल. काम कसं सोपं होईल, कमी टायमात जास्त काम कसं होईल या विचारातून नवंनवं करण्याची कल्पना सुचत राहिली.”

सुनील यांनी बनवलेल्या चंद्रिका बांधणी यंत्रासाठी त्यांचा राष्ट्रपती भवनात सत्कार करण्यात आला. या यंत्राचा वापर रेशीम उद्योगात केला जातो.

सुनील यांनी आधी कुंभार पिंपळगावमध्ये असलेला त्यांचा वर्कशॉप मागणीनुसार पुरवठ्याची क्षमता वाढवता यावी, यासाठी जालना एमआयडीसीमध्ये हलवला आहे.

इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण झालेले सुनील आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर अधिकाअधिक लोकोपयोगी यंत्र बनवण्याचं ध्येय बाळगून आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)