You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जर्मनीतल्या हॅम्बर्ग शहरात गोळीबार, अनेक लोकांचा मृत्यू
उत्तर जर्मनीतल्या हॅम्बर्ग शहरात जेव्होवाज विटनेस या धार्मिक पंथाच्या बैठकीदरम्यान झालेल्या गोळीबारात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत लोकांना नक्की आकडा अजून समोर आलेला नाही.
जेव्होवाज विटनेस हा ख्रिश्चन धर्माशी संबधित एक पंथ आहे. 19 व्या शतकात या पंथाची स्थापना अमेरिकेत झाली होती.
पोलिसांचं म्हणणं आहे की, ‘ज्याने गोळीबार केला त्याचा मृत्यू झाल्याचं समजलं जातंय. जर्मन माध्यमं ज्या सहा-सात लोकांचा मृत्यू झाल्याचं म्हणतंय, त्यात बंदुकधारी होता की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही.’
पोलिसांनी असंही म्हटलंय की, “गोळीबार का झाला, त्या व्यक्तीने हल्ला का केला याबद्दल अजून ठोस माहिती पुढे आलेली नाही.”
याशिवाय ग्रॉस बोरस्टेल जिल्ह्यात डीलबॉज स्ट्रीट याभागात झालेल्या गोळीबारातही अनेक लोक जखमी झाले आहेत.
पोलीस प्रवक्ते होल्गर वेहरेन यांनी म्हटलं की पोलिसांना स्थानिक वेळेनुसार रात्री 9.15 वाजता कळलं की बैठकस्थानी गोळीबार झालेला आहे.
त्यांनी पुढे सांगितलं की जे अधिकारी घटनास्थळी पोहचले त्यांना ‘काही लोक गोळीबारात गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडलेले आढळले. त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक होती.’
“यानंतर आम्हाला त्या इमारतीच्या वरच्या भागात गोळ्या झाडल्याचा आवाज आला पण जेव्हा आम्ही तिथे पोचलो तेव्हा तिथे आम्हाला एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. अजूनपर्यंत हे स्पष्ट झालेलं नाही की गुन्हेगार घटनास्थळाहून फरार झाला आहे की नाही.”
वेहरेन यांनी म्हटलं की, “आम्हाला इतकं माहितेय की या गोळीबारात अनेक लोक मारले गेलेत तर अनेक जखमी झालेत. जखमींवर उपचार सुरू आहेत.”
या भागात राहाणाऱ्या लोकांना सूचना दिल्यात की त्यांनी बाहेर पडू नये. या भागातले जे व्हीडिओ समोर आलेत त्यात पोलीस लोकांना मीटिंग हॉलमधून बाहेर काढताना दिसत आहेत.
हॅम्बर्गच्या गृहखात्याचे मंत्री अँडी ग्रोटे यांनी ट्विटरवर लिहिलं, “घटनास्थळी विशेष पोलीस दल आणि मोठ्या संख्येने अधिकारी तैनात केले गेले आहेत.”
पोलिसांनी जनतेला ‘अफवांवर विश्वास ठेवू नका’ असंही आवाहन केलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)