कसे आहात? घरीच आहात ना? कोरोनाला पळवून
लावण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे. राज्य, देश तसंच
आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोरोनाचे सगळे अपडेट्स तुम्हाला इथे मिळत राहतील. काळजी
घ्या.
जगभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची
संख्या 28 लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या
दोन लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत 185 देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे.
अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक 9 लाख 54 हजार 182 रुग्ण आढळले असून 54 हजार 388 जणांचा मृत्यू झाला आहे.
तसंच अमेरिकेच्या अन्न आणि औषध विभागाने कोरोना रुग्णांसाठी
हाइड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध देण्यासंदर्भात इशारा दिला आहे.
रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या
बातमीनुसार, चीनने आपलं वैद्यकीय पथक उत्तर कोरियाला पाठवलं आहे. उत्तर
कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची प्रकृती ठीक नसल्याच्या बातम्या येत आहेत.
भारताच्या आरोग्य मंत्रालयाने
दिलेल्या माहितीनुसार, देशभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 826 एवढी झाली आहे. 26 हजार 917 जणांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे.
याव्यतिरिक्त, कोव्हिडमधून बरे झाल्यावर पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते अशी माहिती
जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.