राजस्थानमधली कोरोनाग्रस्तांची संख्या 2061 वर
राजस्थानात कोरोना व्हायरसची लागण झालेले 27 नवे रुग्ण आज आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2061 वर पोहोचली आहे, अशी माहिती राजस्थान आरोग्य विभागाने दिली आहे.
You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
राजस्थानात कोरोना व्हायरसची लागण झालेले 27 नवे रुग्ण आज आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2061 वर पोहोचली आहे, अशी माहिती राजस्थान आरोग्य विभागाने दिली आहे.
सध्या 15 लाखांपेक्षाही जास्त चाचण्या घेण्याची सरकारची क्षमता आहे. काही कंपन्या टेस्ट किट बनवत आहेत. कोव्हिड-19 शी लढण्यासाठी सुमारे 1 लाख 25 हजार स्वयंसेवक तयार आहेत, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिल्याची बातमी एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
लॉकडाऊनबाबत पुनर्विचार करण्याची वेळ आलीय, असं काँग्रेस नेते कपिल सिब्बल म्हणाले. तसंच, आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कोव्हिड-19 साठी राष्ट्रीय धोरण आखण्याची गरजही सिब्बल यांनी व्यक्त केलीय.
"केशकर्तनालयं, सलून इथे ग्राहकांना सेवा दिली जाते. केंद्रीय गृहमंत्रालयाने काढलेला आदेश वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांना लागू आहे. सलून उघडण्याचा निर्णय झालेला नाही. दारुविक्रीची दुकानं उघडण्याचा निर्णय झालेला नाही", असं जॉइंट सेक्रेटरी पुन्या सैला श्रीवास्तव यांनी सांगितलं.
कोरोनावर उपचारांमध्ये आवश्यक अशी वैद्यकीय उपकरणं घेऊन स्पाईसजेट कंपनीचं विमान चीनहून भारतात दाखल झालं. वैद्यकीय आणि आपात्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक अशी 18 टनांची मदत घेऊन हे विमान अवतरलं आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात, कोरोनाचे 394 नवे रुग्ण आढळले आहेत तर 18 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 6,817 झाली आहे. आतापर्यंत 301 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
चीनच्या शांग्जी भागात कोरोनाचे सात नवे रुग्ण आढळून आले. हे सातही जण रशियाहून परतले असल्याचं स्पष्ट झालं आहे. चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या अमेरिका आणि अन्य युरोपीय देशांच्या तुलनेत कमी आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार चीनमधल्या वुहान शहरातून झाला होता. चीनने कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवलं. गेल्या आठवड्यात चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद नाही.
मात्र अन्य देशातून येणाऱ्या लोकांच्या माध्यमातून होणारा संसर्ग चीनसाठी काळजीचा मुद्दा आहे. मांझोली शहरात तीन नवे रुग्ण आढळले आहेत. या सगळ्यांनाही बाहेरच्या देशातून आल्याने कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा यासाठी चीनमध्ये विदेशी नागरिकांच्या येण्याजाण्यावर प्रतिबंध लागू करण्यात आले. बीजिंगहून अन्य देशांमध्ये जाण्यास मनाई आहे. बंदरं आणि सीमेनजीकचे भाग सील करण्यात आले आहेत.
चीनचे नागरिक अन्य देशांमधून परतत आहेत. त्यांच्या येण्याबरोबरच कोरोना संसर्ग होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. शांझी शहरातील कोरोना रुग्ण 20 एप्रिलला मॉस्कोहून परतले होते. या भागातील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचे 30 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 24 एप्रिलला कोरोनाचे 12 नवे रुग्ण आढळले.
नोंदणीकृत दुकानं उघडी ठेवण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने नव्याने स्पष्टीकरण दिलं आहे.
1. ग्रामीण भाग: शॉपिंग मॉल वगळता सर्व दुकानांना मुभा
2. शहरी: शॉपिंग मार्केट/मार्केट कॉम्प्लेक्स मॉल्स वगळता इतर दुकानांना मुभा
3. ई कॉमर्स वेबसाईट्सवरून केवळ जीवनावश्यक वस्तूंना परवानगी
4. दारू विक्रीवरील बंदी कायम
दक्षिण आणि मध्य अमेरिकेत कोरोनाचं संकट तीव्र होताना दिसतं आहे. ब्राझीलची आरोग्य व्यवस्था कोसळण्याच्या बेतात आहे. ब्राझीलमधील अधिकाऱ्यांनी सांगितलं की दफनभूमीत सामूहिक दफन करावं लागत आहे. कबर खणणाऱ्यांना दिवसात 100 मृतदेहांचे दफनविधी करावे लागत आहेत.
कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर मृतांचं प्रमाण तिपटीने वाढलं आहे. ब्राझीलमध्ये 53,000 कोरोना रुग्ण असून, 3,600 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. चाचण्यांचं प्रमाण कमी असल्याने, हा आकडा वाढू शकतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, युरोपियन युनियनचा एक अहवाल प्रसिद्ध होऊ नये यासाठी चीनतर्फे प्रयत्न सुरू होते. मात्र हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. चीनने कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला आहे.
हा अहवाल प्रसिद्ध होऊ नये यासाठी चीनतर्फे प्रयत्न करण्यात आले. रॉयटर्सने चार सूत्रं तसंच अधिकृत कागदपत्रांच्या आधारे हे वृत्त दिलं आहे. चीनने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
युरोपियन युनियनच्या प्रवक्त्याने सांगितलं की, "हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे. हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे आणि जसा आहे तसाच प्रसिद्ध झाला आहे".
हा अहवाल 21 एप्रिलला प्रसिद्ध होणं अपेक्षित होतं. चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी युरोपियन युनियनशी संपर्क साधला. अहवाल असा प्रसिद्ध झाला तर युरोपियन युनियन आणि चीन यांच्यातील संबंध बिघडू शकतात असं संकेत चीनतर्फे देण्यात आले.
चीनच्या विदेश मंत्रालयातील अधिकारी यांगशिआगुआंग यांची प्रतिक्रिया रॉयटर्सने मिळवली आहे. हा अहवाल प्रसिद्ध झाल्याने चीन नाराज होणं स्वाभाविक आहे.
मोदी सरकारने 1.1 कोटी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नाहक दुखावलं आहे. त्यांचा DA अर्थात डिअरनेस अलाऊन्स रद्द करण्याचा निर्णय घेतला. सेंट्रल व्हिस्ता प्रोजेक्टवर पैशाची उधळण करण्यापेक्षा कर्मचाऱ्यांचा भत्ता रद्द करणं असंवेदनशील आणि अमानवी आहे अशी टीका काँग्रेसने केली आहे.
देशभरात गेल्या 24 तासात, कोरोनामुळे 57 मृत्यूंची नोंद. शुक्रवारी देशात 1,429 कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 24,506 इतका झाला आहे. 5,063 जण या आजारातून बरे झाले आहेत. देशात कोरोनाच्या 18,668 अॅक्टिव्ह केसेस आहेत.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर युरोपीय देशांमध्ये चीनविषयी भीती निर्माण झाली आहे.
चीनने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आणखी योग्य पद्धतीने रोखू शकलं असतं असं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांनी फायन्नॅशियल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
चीनबाबत युरोपपासून अमेरिकेपर्यंत सगळीकडे संशयाचं वातावरण आहे. कारण चीनमधूनच वैद्यकीय उपकरणं या देशांना पुरवली जात आहेत.
या अवघड कालखंडात चीनशी कोणत्याही स्वरुपाचा करार करण्याबाबत युरोपीय देश संदिग्ध मनस्थितीत आहेत. चीनशी कोणत्याही स्वरुपाचा करार करण्यावरून भीतीचं वातावरण आहे असं काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सांगितलं.
अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांसाठी बहुतांश देश चीनवर अवलंबून आहेत. कोरोना विषाणूसंदर्भात ठोस माहितीकरता जगाचं चीनकडे लक्ष आहे.
कोणत्याही स्वरुपाची वक्तव्यं, मतभेद याच्यापासून आपण दूर राहायला हवं कारण आता कोरोनाचा बीमोड करणं हे आपलं सगळ्यांचं उद्दिष्ट आहे असं चीनमधील ब्रिटनच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्यांनी सांगितलं.
युरोपियन युनियनच्या अहवालानुसार, कोरोनामुळे जगभरातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणांमध्ये मूलभूत स्वरुपाचा बदल होऊ शकतो. कोरोना विषाणूच्या प्रसाराचा जगातील देशांच्या व्यापारावर परिणाम होईल याचं खंडन चीन, रशिया हे देश करत आहेत. चीनचे अधिकारी तसंच प्रसारमाध्यमं कोरोना विषाणूसंदर्भात सगळे आरोप फेटाळून लावत आहेत. चीनमधील सरकारी सोशल मीडिया माध्यमांनी कोरोनाच्या संसर्गाचा संबंध अमेरिकेच्या लष्करातील प्रतिनिधींच्या दौऱ्याशी जोडला आहे.
या अहवालात रशियाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.
शुक्रवारचा दिवस अमेरिकेसाठी सुवार्ता घेऊन आला. कोरोनामुळे सगळयात कमी मृत्यूंची नोंद अमेरिकेत झाली.
गेल्या 24 तासात अमेरिकेत कोरोनामुळे 422 जणांचा मृत्यू झाला आहे. 31 मार्चला 391 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सगळ्यात कमी मृत्यू शुक्रवारी नोंदले गेले.
न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत कोरोनाने 16,000 जणांचा जीव घेतला आहे. हा आकडा अविश्वसनीय आहे असं गव्हर्नर अँड्यू कोमो यांनी सांगितलं. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतो आहे मात्र हा विषाणू विनाशकारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमात सूट दिल्यास कोरोना पुन्हा डोकं वर काढू शकतो, त्यामुळे नियमात सवलत देण्याची घाई करून चालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तुम्हाला माहितीय, आम्ही दररोज जगभरातले सर्व महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये अपडेट करत असतो.
कालचे, म्हणजेच एप्रिल 24चे अपडेट्स पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराबाबत अमेरिकेच्या अन्न आणि औषध विभागाने इशारा दिला आहे. काही रुग्णांमध्ये या आजाराचा दुष्परिणाम जाणवतो आणि त्यांचं हृदय बंद पडण्याचा धोका असतो. काही रुग्णांनी अशा तक्रारी केल्या आहेत. दरम्यान रुग्णालयं आणि संशोधन उपक्रमांना या औषधाच्या वापराची परवानगी देण्यात आली आहे.