सहा आठवडे चाललेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतर आता सर्वांच लक्ष आहे आजच्या निकालाकडे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसारॉ लोकसभेच्या 543 पैकी 542 जागांवर मंगळवारी (4 जून) सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल.
गुजरातच्या सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुकेश दलाल हे याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. या जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्यानंतर बाकी अपक्ष उमेदवारांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले होते.
नियमानुसार सर्वांत आधी पोस्टल बॅलेटची मतमोजणी होईल आणि नंतर अर्ध्या तासाने ईव्हीएममधील मतांची मोजणी.
जर एखाद्या केंद्रावर पोस्टल बॅलेट नसतील, तर थेट ईव्हीएमच्या मतांची मोजणी सुरू होईल.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सोमवारी एक पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, 19 एप्रिल ते एक जून पर्यंत चाललेल्या सात टप्प्यांतील मतदानादरम्यान देशातील 96.8 कोटी नोंदणीकृत मतदारांपैकी 64.2 कोटी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
यामध्ये महिला मतदारांची संख्या 31.2 कोटी आहे.
सरासरी 58.58 टक्के मतदान झालं आहे.
राजीव कुमार यांनी म्हटलं की, या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान 1.5 निवडणूक कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.