You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

रवींद्र वायकर 48 मतांनी विजयी, नाट्यमय घडामोडींनंतर लागला निकाल

लोकसभा निवडणुकांच्या निकालांचे लाईव्ह अपडेट्स तुम्हाला इथे वाचता येतील. तसंच, निकालासंबंधी इतरही घडामोडींचे अपडेट तुम्हाला या लाईव्ह पेजवर मिळतील.

थोडक्यात

  • लोकसभा निवडणुकीचे कल आता हाती येत आहेत.
  • अभिनेत्री कंगना रणौत हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून जवळपास 54 हजार मतांनी आघाडीवर आहे.
  • नैऋत्य मोसमी वारे आता महाराष्ट्राच्या अगदी वेशीवर पोहोचले आहेत आणि पुढच्या तीन चार दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल अशी अपेक्षा आहे.
  • दक्षिण मध्य मुंबई लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांनी मोठी आघाडी घेतली आहे.
  • दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यावर मोठी आघाडी मिळवली आहे.
  • जालना मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजपचे रावसाहेब दानवे पिछाडीवर, काँग्रेसचे कल्याण काळे आघाडीवर
  • सांगलीत १२ व्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील 52 हजार 573 मतांनी आघाडीवर, भाजपाचे संजय पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर
  • अकोला मतदारसंघात काँग्रेसचे अभय पाटील आघाडीवर, भाजपचे अनुप धोत्रे आणि वंचितचे प्रकार आंबेडकर पिछाडीवर
  • नाशिकमध्ये महायुतीला दणका, मविआचे राजाभाऊ वाजेंना मोठी आघाडी

लाईव्ह कव्हरेज

ओंकार करंबेळकर

  1. स्मृती इराणी यांचा अमेठीत पराभव

    स्मृती इराणी यांचा अमेठी लोकसभा मतदारसंघात पराभव झाला आहे.काँग्रेसच्या किशोरीलाल शर्मा यांनी इराणी यांचा 1 लाख 67 हजार 196 मतांनी पराभव केला आहे.

    या निकालानंतर स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.

    त्या म्हणाल्या, "मी आज नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांचे आभार मानते. 30 वर्षांच्या कामाला मी 5 वर्षांत पूर्ण केलं. जे विजयी झाले आहेत त्यांचं अभिनंदन. आम्ही ज्या निष्ठेने गावागावत जाऊन सेवा केली त्याप्रमाणेच पुढेही होत राहील. संघटना अधिक सशक्त करू. क्‍या हार में क्‍या जीत में किंचित नहीं भयभीत मैं संघर्ष पथ पर जो मिले यह भी सही वह भी सही. असं अटलजी सांगायचे, त्याचप्रमाणे काम करत राहू."

  2. शोमॅन एन टी रामाराव यांची सत्ता जेव्हा सख्ख्या जावयानेच उलथवली

    आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाला विधानसभेत आणि लोकसभेत मोठं यश मिळालं आहे.

    23 ऑगस्ट, 1995 रोजी एनटीआर सत्तेच्या शिखरावर होते आणि पुढच्या आट दिवसात त्यांना पायउतार व्हावं लागलं. त्या आठ दिवसात चंद्राबाबू नावाच्या वादळाने एनटीआर यांचं पद गेलं आणि ते आठवड्याभरात माजी मुख्यमंत्री होऊन गेले. असं म्हणतात की, लक्ष्मी पार्वती एनटीआर यांच्या आयुष्यात आल्या नसत्या तरीही चंद्राबाबू नायडूंनी एनटीआरची सत्ता उलथवून टाकण्याचे प्रयत्न केलेच असते.

  3. सर्वात गरीब लोकांनी राज्यघटनेचं रक्षण केलं- राहुल गांधी

    काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या देशातल्या गरीब लोकांनी राज्यघटना वाचवली असं विधान केलं आहे.राहुल गांधी म्हणाले,

    • आमची लढाई राज्यघटना वाचवण्यासाठी होती.
    • नरेंद्र मोदी आणि अमित शाह आम्हाला नकोत असं जनतेनं सांगितलं आहे.
    • आम्ही इंडिया आघाडीतल्या सहकारी पक्षांचा सन्मान केला. आम्ही एकत्र काम केलं.
    • मजूर, शेतकरी, दलित आदिवासींनी राज्यघटनेचं रक्षण केलं आहे.
  4. जनतेचा कौल मान्य करतो- मल्लिकार्जुन खर्गे

    मतदारांचा कौल स्पष्ट झाल्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची बाजू स्पष्ट केली

    मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "देशात निवडणुकांचे निकाल आले आहेत. ही लढाई मोदी विरुद्ध जनता आहे, हे आम्ही आधीपासूनच सांगत होतो. 18 व्या लोकसभा निवडणुकांचा निकाल आम्ही स्वीकारतो, यावेळेस जनतेने कोणाही एका पक्षाला बहुमत दिलेलं नाही. हे निकाल मोदींच्या विरोधात गेले आहेत."

    खर्गे म्हणाले, "हा मोदींचा नैतिक आणि राजकीय पराभव आहे, सरकारी यंत्रणेत त्यांनी वेळोवेळी अडथळे आणले. अनेक नेत्यांविरोधात मोहीम राबवली. पंतप्रधानांनी ज्याप्रकारे प्रचार मोहीम केली ती दीर्घकाळ लक्षात राहील. मोदींनी असत्य पसरवलं ते लोकांच्या लक्षात आलं."

    ते म्हणाले, "मोदींना आणखी एक संधी मिळाली तर पुढचा हल्ला राज्यघटना आणि लोकशाहीवर होईल हे लोकांनी ओळखलं, या कटात भाजपा यशस्वी होऊ शकली नाही याचा आनंद आहे."

  5. प्रकाश आंबेडकर : वंचितचा सर्वच्या सर्व जागांवर पराभव, काय आहेत कारणं?

    अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या कामगिरीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. ‘वंचित बहुजन आघाडी भाजपविरोधी मतांमध्ये फूट पाडेल का?’ अशी भीती काँग्रेससह विरोधी पक्षांना होती. मात्र, लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यास ही भीती फोल ठरली आहे.

    अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात कुठेही उल्लेखनीय कामगिरी करता आली नाहीये. किंबहुना, लढवलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये वंचितचे उमेदवार तिसऱ्या, चौथ्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर स्थिरावलेले दिसून येतात.

    वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 35 जागांवर उमेदवार उभे केले होते, तर सात ठिकाणी इतरांना पाठिंबा दिला होता. पाठिंबा दिलेल्यांपैकी कोल्हापूर, नागपूर आणि बारामती अशा महाविकास आघाडीच्या उमेदवारांचाही समावेश होता.

    वंचितकडे मतदारांना पाठ फिरवण्यामागची कारणं पाहण्यापूर्वी, वंचितच्या उमेदवारांमधील मोठे चेहरे असलेल्या उमेदवारांची स्थिती पाहूया.पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

  6. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे यांच्या गटांमधील कोणते उमेदवार विजयी झाले?

    एकनाथ शिंदे गट -

    1) ठाणे - नरेश म्हस्के

    2) कल्याण - श्रीकांत शिंदे

    3) हातकणंगले - धैर्यशील माने

    4) मावळ - श्रीरंग बारणे

    5) संभाजी नगर - संदीपान भूमरे

    6) बुलढाणा - प्रतापराव जाधव

    उद्धव ठाकरे गट -

    1) उत्तर पश्चिम- अमोल किर्तीकर

    2) दक्षिण मध्य - अनिल देसाई

    3) दक्षिण मुंबई- अरविंद सावंत

    4) ईशान्य मुंबई - संजय दिना पाटील

    5) नाशिक - राजाभाऊ वाजे

    6) शिर्डी - भाऊसाहेब वाकचौरे

    7) हिंगोली - नागेश पाटील

    8) यवतमाळ - संजय देशमुख

  7. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 1,52,513 मताधिक्याने विजय

    वाराणसीतून नरेंद्र मोदी यांचा 1,52,513 मताधिक्याने विजय झाला आहे. ते या मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत.

  8. सेन्सेक्स 4390 अंकांनी घसरला

    सेन्सेक्समधल्या 30 पैकी 24 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर निफ्टीमधल्या 50 पैकी 41 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. बँक इंडेक्स, मिडकॅप, स्मॉलकॅप इंडेक्ससह सगळ्याच निर्देशांकांमध्ये घसरण नोंदवण्यात आली.

  9. नारायण राणे यांचा 47,858 मतांनी विजय; विनायक राऊत पराभूत

    रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांचा 47858 मतांनी विजय झाला आहे. त्यांनी विनायक राऊत यांचा पराभव केला आहे. राणे यांना या मतदारसंघात उमेदवारी मिळाल्यावर संपूर्ण राज्याचं या मतदारसंघाकडे लक्ष लागलं होतं.

  10. अमोल कीर्तिकर आणि वर्षा गायकवाड विजयी

    मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाचे अमोल कीर्तिकर यांचा 681 मतांनी तर मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात वर्षा गायकवाड यांचा 4 हजार 436 मतांनी विजय झाला आहे. कीर्तिकर यांनी रवींद्र वायकर यांचा तर वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केला.

  11. सरकारकडून जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणला जातोय- जयराम रमेश

    काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून दावा केलाय की उत्तर प्रदेशातील जिल्हाधिकाऱ्यांवर मतमोजणी दरम्यान दबाव आणला जातोय.

    त्यांनी ट्विट मध्ये म्हटलंय की, "उत्तर प्रदेशातील महाराजगंज, बांसगाव, मेरठ, मुझफ्फरनगर या जागा निवडून याव्याl यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना बोलावून दबाव टाकला जातोय."

    जयराम रमेश यांनी लिहिलंय की, "प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं की सरकार बदलत राहतं त्यामुळे लोकशाहीचा हा खेळ मान्य केला जाणार नाही." निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 4.12 पर्यंत उत्तर प्रदेशातील एकूण 80 जागांपैकी एनडीए 35, समाजवादी पार्टी 34 आणि काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर आहे.

  12. रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे सलग दुसऱ्यांदा विजयी

  13. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा निकाल: अनिल देसाईंनी केले राहुल शेवाळेंना पराभूत

    दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत उद्धव ठाकरेंनी बाजी मारली आहे.

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांनी शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांचा 53 हजार 384 मतांनी पराभव केला आहे.

    मुंबईच्या मध्य आणि पूर्व भागामध्ये कष्टकरी जनता स्थिरावलेली आहे. मुख्यत्वे चेंबूर आणि धारावी यांचा यात समावेश होतो. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामध्ये विधानसभेचे अणुशक्तीनगर आणि चेंबूर हे मुंबई उपनगर जिल्ह्यातले दोन मतदारसंघ येतात. तर मुंबई शहर जिल्ह्यातले धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा आणि माहीम हे विधानसभा मतदारसंघ येतात.

    या मतदारसंघात इतर विभागांप्रमाणे मिश्र वस्ती असली तरी बहुतांश मतदारसंघात कष्टकरी, अल्प ते अत्यल्प उत्पन्न गटातील लोकसंख्या राहाते. या मतदारसंघामध्ये लोकसंख्येची घनताही जास्त दिसून येते.

    आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावी झोपडपट्टी याच मतदारसंघात आहे.

  14. सांगलीत ठाकरे गट आणि भाजपाला मोठा धक्का, 'अपक्ष' विशाल पाटील विजयी

    सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयाने भाजपाचे संजयकाका पाटील यांची हॅट्रिक चुकली आहे.

    तब्बल एक लाखांच्या मतांच्या फरकांनी विशाल पाटलांनी आपला विजय नोंदवला आहे. विशाल पाटील यांना 5 लाख 69 हजार 687 मते मिळाली असून 1 लाख 1 हजार 94 मतांच्या मताधिक्याने त्यांचा विजय झाला आहे.

    सांगली लोकसभेसाठी तिरंगी अशी लढत झाली होती,महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील,भाजपाचे संजयकाका पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्या तिरंगी झाली होती.

    अत्यंत चुरशीने पार पडलेल्या लढतीमध्ये आज पार पडलेल्या मतमोजणीत विशाल पाटलांनी दणदणीत,असा विजय मिळवला आहे.

  15. ओडिशा, आंध्र प्रदेशात सरकार बदलण्याचे संकेत

    आज एकीकडे लोकसभेच्या 542 जागांसाठी मतमोजणी सुरू असताना दुसरीकडे आंध्रप्रदेशातील विधानसभेच्या 175 आणि ओडिशातील 147 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.

    निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, आंध्रप्रदेश मधील 175 जागांपैकी तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) 133 जागांवर आघाडीवर आहे. पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष 20 जागांवर आघाडीवर असून वायएसआरसीपी (युवजन श्रमिक रयतु काँग्रेस पार्टी) 15 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप सात जागांवर आघाडीवर आहे.

    सध्याचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांचा पक्ष म्हणजे वायएसआरसीपी. मतांचा कल बघता इथे तेलुगु देसम पार्टीचं सरकार येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ओडिशातील 147 जागांपैकी भाजप 74 जागांवर आघाडीवर आहे, तर सत्ताधारी बीजेडी 57 जागांवर आघाडीवर आहे आणि काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर आहे.

    इथल्या एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे. मतमोजणी संपायला आली असूनही बीजेडीची स्थिती पाहता नवीन पटनाईक यांना विरोधात बसावं लागू शकतं. राज्यात प्रथमच भाजपचं सरकार येण्याची शक्यता आहे.

  16. दिंडोरी लोकसभा निकाल : विद्यमान मंत्री भारती पवारांविरोधात भास्कर भगरे यांना मोठी आघाडी

  17. नाशिकमधील ओझरजवळ सुखोई विमान कोसळलं

    नाशिक जिल्ह्यात ओझरजवळ पिंपळगाव बसवंतजवळ शिरसगावमध्ये वायुदलाचं एक सुखोई विमान कोसळलं. त्यातील वायुदलाचे दोन्ही वैमानिक वेळेत पॅराशूटच्या सहाय्यानं खाली आले. विमानातील विंग कमांडर बोकिल आणि बिस्वास यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं असून दोघेही सुखरूप असल्याचं समजतंय. हवाई दलातील सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

    हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये तपासणीसाठी हे विमान आणलं होतं. टेस्ट फ्लाईटदरम्यान या विमानाचा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. हे विमान कोसळण्याआधी त्यात तांत्रिक बिघाड झाल्याचं वैमानिकांनी रिपोर्ट केलं होतं.

    अपघाताचं नेमकं कारण पूर्ण तपास केल्यावरच समोर येईल असं HAL नं सांगितलं आहे. दरम्यान, हे विमान शिरसगावात ज्या शेतात कोसळलं तिथे साधारण अर्धा किलोमीटर परिघात विमानाचे अवशेष कोसळले आहेत. शेतातल्या कांदा आणि द्राक्षाच्या शेताचं नुकसान झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

  18. सेन्सेक्स कोसळला, गेल्या 4 वर्षांमधली एका दिवसातली सर्वात मोठी घसरण

    शेअरबाजारात ट्रेडिंगच्या सुरुवातीपासूनची घसरण ट्रेडिंग बंद होईपर्यंत कायम राहिली.

    आजची शेअर बाजारातली घसरण ही गेल्या 4 वर्षांमधली सर्वात मोठी एका दिवसातली घसरण होती. सेन्सेक्स 4390 पॉईंट्सनी घसरून 72,079 वर बंद झाला. तर निफ्टी 1379 पॉईंट्सनी घसरून 21,884 वर बंद झाला. आज सकाळी ट्रेडिंगला सुरुवात झाली तेव्हा 1000 अंकांनी घसरलेला सेन्सेक्स निवडणुकीचे कल येते गेले, तसा आणखी घसरत गेला.

    बहुतेक एक्झिट पोल्सनी भाजप आणि एनडीए मोठ्या फरकाने सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवला होता. यानंतर सोमवार 3 जूनच्या ट्रेडिंगमध्ये शेअर बाजाराने उसळी घेतली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी रेकॉर्ड उंची गाठली होती. या दोन प्रमुख निर्देशांकांमध्ये 3% वाढ सोमवारच्या दिवशी नोंदवण्यात आली होती.

    सेन्सेक्स काल 76,400 च्या पातळीच्याही वर गेला होता. तर निफ्टी 50 निर्देशांकही 23,250च्या पातळीवर होता. पण मंगळवार 4 जूनच्या ट्रेडिंगमध्ये शेअर बाजाराने ही वाढ गमावली. NDA चा तितक्या मोठ्या फरकाने विजय होणार नाही असा अंदाज निकालांच्या कलांवरून आल्यामुळे शेअर बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आणि बाजारातली घसरण वाढत गेली.

    दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास सेन्सेक्सने दिवसातली 70,234ची निचांकी पातळी गाठली. यावेळी सेन्सेक्समध्ये जवळपास 6234 पॉइंट्सनी घसरलेला होता. त्यानंतर मात्र सेन्सेक्स थोडा सावरला. सेन्सेक्समधल्या 30 पैकी 24 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर निफ्टीमधल्या 50 पैकी 41 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. बँक इंडेक्स, मिडकॅप, स्मॉलकॅप इंडेक्ससह सगळ्याच निर्देशांकांमध्ये घसरण नोंदवण्यात आली.