You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रवींद्र वायकर 48 मतांनी विजयी, नाट्यमय घडामोडींनंतर लागला निकाल
लोकसभा निवडणुकांच्या निकालांचे लाईव्ह अपडेट्स तुम्हाला इथे वाचता येतील. तसंच, निकालासंबंधी इतरही घडामोडींचे अपडेट तुम्हाला या लाईव्ह पेजवर मिळतील.
थोडक्यात
- लोकसभा निवडणुकीचे कल आता हाती येत आहेत.
- अभिनेत्री कंगना रणौत हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून जवळपास 54 हजार मतांनी आघाडीवर आहे.
- नैऋत्य मोसमी वारे आता महाराष्ट्राच्या अगदी वेशीवर पोहोचले आहेत आणि पुढच्या तीन चार दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल अशी अपेक्षा आहे.
- दक्षिण मध्य मुंबई लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांनी मोठी आघाडी घेतली आहे.
- दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यावर मोठी आघाडी मिळवली आहे.
- जालना मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजपचे रावसाहेब दानवे पिछाडीवर, काँग्रेसचे कल्याण काळे आघाडीवर
- सांगलीत १२ व्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील 52 हजार 573 मतांनी आघाडीवर, भाजपाचे संजय पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर
- अकोला मतदारसंघात काँग्रेसचे अभय पाटील आघाडीवर, भाजपचे अनुप धोत्रे आणि वंचितचे प्रकार आंबेडकर पिछाडीवर
- नाशिकमध्ये महायुतीला दणका, मविआचे राजाभाऊ वाजेंना मोठी आघाडी
लाईव्ह कव्हरेज
ओंकार करंबेळकर
नितीश कुमार आणि चंद्राबाबू पुन्हा चर्चेत, का आहेत त्यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा?
बीडमध्ये बजरंग सोनवणे विजयी, पंकजा मुंडे पराभूत
बीडमध्ये 31 फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाल्यानंतर बजरंग सोनवणे यांचा विजय झाला आहे. सोनवणे यांना जवळपास 7 हजार मतांची आघाडी मिळाली आहे. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी आपण यशस्वी होऊ अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र त्यांचा पराभव झाला आहे.
"माझ्या हातात असतं तर दोन्ही मतदारसंघांचा खासदार राहायला मला आवडलं असतं"- राहुल गांधी
राहुल गांधी यांचा वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघात विजय झाला आहे. त्यामुळे त्यांना दोन्हीपैकी एकच जागा कायम ठेवावी लागणार आहे. याबद्दल विचारताच राहुल गांधी म्हणाले, “वायनाडची जागा सोडणार की रायबरेलीची असा प्रश्न विचारला जात आहे. माझ्या हातात असतं तर मी दोन्ही जागांवर खासदार राहायला पसंत केलं असतं”
राहुल गांधी यांचा रायबरेलीतून 3 लाख 90 हजार तर वायनाडमधून 3 लाख 64 हजार मतांनी विजय झाला आहे.
रवींद्र वायकर 48 मतांनी विजयी, नाट्यमय घडामोडींनंतर लागला निकाल
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांचा विजय झाला आहे. वायकर हे केवळ 48 मतांनी विजयी झाले आहेत. सुरुवातीला उबाठा गटाच्या अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र वायकर यांनी त्यावर आक्षेप घेत पुन्हा मोजणी आणि पोस्टल मतांच्या मोजणीची विनंती केली. यामध्ये वायकर यांचा 48 मतांनी विजय झाल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकांच्या इतिहासातले आजवरचे सर्वात अटीतटीचे निकाल
- 1998 - भाजपचे सोम मरांडी बिहारच्या राजमहलमधून 9 मतांनी विजयी
- 1989: काँग्रेसचे कोंथाळा रामकृष्ण आंध्र प्रदेशच्या अनाकपल्लीमधून 9 मतांनी विजयी.
- 1996: काँग्रेसचे सत्यजीतसिंह गायकवाड गुजरातच्या वडोदरामध्ये 17 मतांनी विजयी
- 1971: डीएमकेचे एमएस शिवास्वामी तामिळनाडूच्या त्रिचेंदूरमधून 26 मतांनी विजयी
- 2014: भाजपचे थुपस्तान छेवांग लडाखमधून 36 मतांनी विजयी
- 1962: मणिपूर सोशलिस्ट पार्टीचे रिशांग आऊटर मणिपूरमधून 42 मतांनी विजयी
नोवाक जोकोविचची फ्रेंच ओपनमधून माघार
वर्ल्ड नंबर वन टेनिसस्टार नोवाक जोकोविचनं फ्रेंच ओपनमधून माघार घेतली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे हा निर्णय घेत असल्याचं जोकोविचनं मंगळवारी (4 जून रोजी) जाहीर केलं आहे.
गतवेळच्या विजेत्या जोकोविचनं आदल्याच दिवशी एक संघर्षमय विजय नोंदवला होता. चौथ्या फेरीच्या सामन्यात त्यानं फ्रान्सिस्को सेरुन्डोलोवर 6-1, 5-7, 3-6, 7-5, 6-3 अशी मात केली.
ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये जोकोविचचा तो 370 वा विजय ठरला आणि त्यानं विजयासह रॉजर फेडररचा विक्रमही मोडला. पण गुडघ्याची दुखापत बळावल्यानं त्यानं या स्पर्धेच्या पुढच्या सामन्यांत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. जोकोविचच्या खात्यात पुरुष एकेरीत 24 ग्रँड स्लॅम विजेतेपदं आहे. आपलं पंचविसावं विजेतेपद साजरं करण्यासाठी त्याला आता आणखी वाट पाहावी लागेल.
'हा सब का साथ, सब का विकास मंत्राचा विजय'- नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकालानंतर देशाच्या नागरिकांचे आभार मानले आहेत. भाजपाच्या दिल्लीतील मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते म्हणाले, "आम्ही सर्व जनतेचे आभारी आहोत. देशाच्या नागरिकांनी भाजपावर, रालोआवर पूर्ण विश्वास दाखवला आहे. आजचा विजय जगभरातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय आहे. हा भारताच्या राज्यघटनेवर दाखवलेल्या अतूट निष्ठेचा विजय आहे. विकसित भारताच्या निश्चयाचा विजय आहे. सबका साथ, सबका विकास मंत्राचा हा विजय आहे. 140 कोटी लोकांचा हा विजय आहे.
मी आज देशाच्या निवडणूक आयोगाचंही अभिनंदन करतो. आयोगानं जगातली सर्वात मोठी निवडणूक संपन्न करून दाखवली."
ते पुढं म्हणाले, "1962 नंतर प्रथमच दोन कार्यकाळ पूर्ण झाल्यावर देशात पुन्हा त्याच पक्षाचं सरकार आलं आहे. ओडिशा, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेशात काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. भाजपा ओडिशात सरकार स्थापन करत आहे. लोकसभा निवडणुकीतही भाजपाला चांगलं यश मिळालं. पहिल्यांदाच तिथं भाजपाचा मुख्यमंत्री होत आहे. भाजपानं केरळमध्येही एक जागा जिंकली. आमच्या केरळमधील कार्यकर्त्यांनी बलिदान दिलं आहे. अनेक पिढ्या तिथं आमच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला आहे. अनेक पिढ्या संघर्ष केल्यावर आज यश मिळालं आहे. तेलंगणमध्ये आमची संख्या दुप्पट झाली आहे. मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचलसारख्या अनेक राज्यांत आमच्या पक्षानं जवळपास सर्व जागा जिंकल्या आहेत. या सर्व राज्यांचं अरुणाचल, ओडिशा आणि सिक्किमचे विशेष आभार मानतो. त्यांच्या विकासासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर ठेवणार नाही. आंध्रप्रदेशात चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये रालोआने शानदार कामगिरी केली आहे."
लोकसभा निकाल :सार्वत्रिक निवडणूक भारत 2024 पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
हा निकाल म्हणजे गद्दारी करणाऱ्यांना चपराक आहे - ओमराजे निंबाळकर
"मी सर्वसामान्य लोकांच्या अडचणी मी लोकसभेत मांडल्या सरकारकडून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला त्याचीही पावती आहे. गद्दारी करणाऱ्यांना हा निकाल एक चपराक आहे धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, शिवसेनेला मानणारा आहे, ज्या लोकांनी मला हिणवलं जॅक आणि टॉमी म्हटले होते. त्याच ड्रायव्हर आणि क्लिनरने मला मतदान केला आहे आणि हा विजय त्यांच्यामुळेच मला मिळालेला आहे". महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर हे दुसऱ्यांदा विजयी झाल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेः सत्तास्थापनेचा आम्ही दावा केलाच पाहिजे, उद्या पंतप्रधानपदाचा उमेदवार इंडिया आघाडी ठरवणार
सत्तास्थापनेचा आम्ही दावा केलाच पाहिजे, उद्या पंतप्रधानपदाचा उमेदवारी इंडिया आघाडी ठरवणार असं शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना भवनात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी उद्या पंतप्रधानपदाचा उमेदवार आमची आघाडी ठरवणार असं म्हटलं आहे.
लोकसभा निकाल :सार्वत्रिक निवडणूक भारत 2024 पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे : एकमेकांसमोर 13 जागा लढले, कोण किती जिंकले?
बीडमध्ये अनुचित प्रकार घडणार नाही याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे- शरद पवार
"बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलीस महासंचालकांनी प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे सत्वर लक्ष पुरवावे." असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे.
'कुठलंही अपयश अंतिम नसतं'- अजित पवार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते लिहितात,
"लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीला मतदान केलेल्या समस्त मतदार बंधु-भगिनींचे सर्वप्रथम मनापासून आभार मानतो. प्रधानमंत्री मा.श्री. @narendramodi साहेबांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’नं बहुमताचा टप्पा गाठला, त्याबद्दल प्रधानमंत्री महोदयांचं आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो.
‘एनडीए’च्या विजयासाठी गेले काही महिने सातत्यानं परिश्रम घेतलेले सर्व नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, मतदार बंधू-भगिनी सर्वांना धन्यवाद देतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलंही अपयश अंतिम नसतं. अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं, उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचं विश्लेषण केलं जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. @SunilTatkare हे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आहेत. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अरुणाचल विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार निवडून आले आहेत. पक्षासाठी हे अभिमानास्पद यश आहे. पक्षाच्या या विजयी उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन करतो. देशात लवकरंच सलग तिसऱ्यांदा स्थापन होणारं ‘एनडीए’चं सरकार जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्यात, देशाला महाशक्ती बनवण्यात यशस्वी होईल, याची खात्री आहे.
प्रधानमंत्री मा.श्री. नरेंद्र मोदी साहेब आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचं पुन:श्च अभिनंदन!
पुनश्च धन्यवाद!"
लोकसभा निकाल :सार्वत्रिक निवडणूक भारत 2024 पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
पालघर लोकसभा निकाल : भाजपचे हेमंत सावरा विजयी, भारती कामडींचा केला पराभव
निकालांनंतर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया
लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.
ते लिहितात, “देशाच्या जनता जनार्दनाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर सलग तिसऱ्यांदा विश्वास ठेवला आहे. भारताच्या इतिहासातील हा एक अभूतपूर्व क्षण आहे. मी लोकांनी दिलेल्या स्नेह आणि आशीर्वादाबद्दल नमन करतो.”
ते म्हणाले, “मी देशवासीयांना विश्वास देतो की त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नव्या ऊर्जेने आणि नवी इच्छा आणि नव्या संकल्पासह पुढे जाऊ. सर्व कार्यकर्त्यांनी ज्या समर्पणभावाने अथक कष्ट केले आहेत त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो.”
सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊ, या लोकसभेची कसर भरून काढू- फडणवीस
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या निकालांवर भाष्य केलं आहे.
ते लिहितात, "पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केले आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग तिसर्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो!
इंडि आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, तर ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळाले, या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या."
पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते, तर भाजपा स्वबळावर 310 च्या पुढे गेली असती. देशातील जनतेने भक्कमपणे मा. मोदीजींना साथ दिली आहे. संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे. पण, तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो.
या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची कसर भरून काढू. महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले आणि ते पुढेही करणार आहेत, मी त्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो !"
लोकसभा निकाल :सार्वत्रिक निवडणूक भारत 2024 पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
जालन्यात कल्याण काळे 1 लाख 27 हजार मतांनी विजयी, रावसाहेब दानवे पराभूत
जालना लोकसभा मतदारसंघात कल्याण काळे 1 लाख 27 हजार मतांनी विजयी झाले आहेत. सलग 25 वर्षे खासदार असलेल्या आणि केंद्रीय मंत्रिपदी असलेल्या रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे.
लोकसभा निकाल :सार्वत्रिक निवडणूक भारत 2024 पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके 29,317 मतांनी विजयी
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात ऱाष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके 29,317 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाच्या सुजय विखे पाटील यांचा पराभव केला.
युसुफ पठाणने केला अधिर रंजन चौधरी यांचा पराभव
तृणमूल काँग्रेसचे उमेदवार युसुफ पठाण यांनी पश्चिम बंगालमधील बेहरामपूर मतदारसंघात अधिर रंजन चौधरी यांचा पराभव केला आहे.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार युसुफ पठाण यांना 4,23,451 इतकी मतं मिळाली तर अधिर रंजन यांना 3,59,367 मतं मिळाली. भाजपा उमेदवार डॉ. निर्मलकुमार साहा यांना 3,23,685 मतं मिळाली.
लोकसभा निकाल :सार्वत्रिक निवडणूक भारत 2024 पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
उत्तर महाराष्ट्रात महायुतीला 2 जागा तर महाविकास आघाडी 6 जागा, उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला 2, ठाकरेंच्या शिवसेनेला 2, पवारांच्या राष्ट्रवादीला 2 आणि भाजपला 2 जागा
- नाशिक - (विजयी) राजाभाऊ वाजे - शिवसेना उबाठा गट (पराभूत) हेमंत गोडसे - शिवसेना शिंदे गट
- दिंडोरी - (विजयी) भास्कर भगरे - राष्ट्रवादी पवार गट (पराभूत ) डॉ भारती पवार - भाजप
- अहमदनगर - (पराभूत) सुजय विखे - भाजप; (विजयी) निलेश लंके - पवारांची राष्ट्रवादी
- धुळे - (पराभूत) डॉ सुभाष भामरे - भाजप; (विजयी) शोभा बच्छाव - काँग्रेस जळगाव - (विजयी) स्मिता वाघ - भाजप; (पराभूत) करण पवार - शिवसेना उबाठा गट
- रावेर - (विजयी) रक्षा खडसे - भाजप; (पराभूत) श्रीराम पाटील - राष्ट्रवादी पवार गट
- नंदुरबार - (विजयी) गोवाल पाडवी - काँग्रेस; (पराभूत) डॉ. हिना गावीत - भाजप
- शिर्डी - (विजयी) भाऊसाहेब वाघचौरे - शिवसेना उबाठा गट; (पराभूत) सदाशिव लोखंडे - शिवसेना शिंदे गट
लोकसभा निकाल :सार्वत्रिक निवडणूक भारत 2024 पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा- ममता बॅनर्जी
लोकसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीनं चांगली कामगिरी केल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “एका बाजूला सीबीआय, एका बाजूला ईडी असूनही मोदींना पूर्ण बहुमत मिळालेले नाही. त्यांनी विश्वासार्हता गमावली आहे. त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. कारण त्यांनी 400 पारची घोषणा केली होती. आता त्यांना टीडीपी आणि नितीश कुमार यांचे पाय धरायचे आहेत. मी मोदींना चांगली ओळखते. ते इंडिया आघाडीला तोडू शकणार नाहीत.”
त्या म्हणाल्या, “मी अखिलेश यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे. येत्या निवडणुकांत उत्तर प्रदेशात अखिलेश यांचा विजय होईल. बिहारमधील निकाल अजून समोर आलेले नाहीत, ते खरे नाहीत. माझं तेजस्वी यादव यांच्याशी बोलणं झालं. ते म्हणाले, दीदी अजून भरपूर मतमोजणी बाकी आहे. हे खोटं बोलत आहेत.”
लोकसभा निकाल :सार्वत्रिक निवडणूक भारत 2024 पाहाण्यासाठी येथे क्लिक करा