You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'विकासाचा विजय झाला' - पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्वीट
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. राज्यात महायुतीकडे सत्ता येईल असे दिसत आहे.
थोडक्यात
- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात
- राज्यातील 288 मतदारसंघांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं, आता आज 23 नोव्हेंबरला सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू
- महायुती 224, महाविकास आघाडी 56 तर इतर 08 जागांवर आघाडीवर
- राज्यभरात महायुतीला मिळालेल्या कौलासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मानले मतदारांचे आभार.
- बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, हितेंद्र ठाकूर, पृथ्वीराज चव्हाण, नवाब मलिक पराभूत.
- अमित देशमुख, धीरज देशमुख, ऋतूराज पाटील पिछाडीवर
- मनसे उमेदवार अमित ठाकरे माहिममधून पराभूत झाले आहेत.
- नितेश राणे, सुधीर गाडगीळ, आदिती तटकरे, रोहित पाटील विजयी झाले आहेत.
लाईव्ह कव्हरेज
ओंकार करंबेळकर
माहीममध्ये अमित ठाकरेंचा पराभव
ब्रेकिंग, तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील- देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
"मुख्यमंत्रीपद कोणत्याही निकषावर अवलंबून नाही. तिन्ही पक्षांचे राष्ट्रीय नेते एकत्र येतील आणि निर्णय घेतील त्याबद्दल कोणताही वाद नाही. निवडणुकानंतर तिन्ही पक्ष एकत्र निर्णय घेतील असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं होतं. जो निर्णय घेतला जाईल तो सर्वांना मान्य असेल."
“आज महाराष्ट्राने आम्हाला जो विजय दिला आहे. त्यावरून महाराष्ट्राची जनता मोदीजींच्या पाठीशी आहे हे स्पष्ट दिसतं. त्यांनी एक है तो सेफ है असा नारा दिला होता. आम्ही लाडक्या बहिणींचे खूप खूप आभारी आहोत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जो फेक नॅरेटिव्ह तयार केला होता तो संपवला गेला आहे. महाराष्ट्रात संतांची परंपरा आहे. महाराष्ट्रातील साधू संताचेंही आभार मानतो.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रामदास आठवले आणि इतर छोट्या पक्षांचे नेते आम्ही एकत्र राहिलो.
आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो, मात्र आमच्यात ऊर्जा चेतवण्यासाठी अमित शाह यांचेही आभार मानतो.. त्याचबरोबर राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव, या सर्वांचे मी आभार मानतो. या विजयात माझा अतिशय कमी सहभाग आहे. ”
लातूरमध्ये देशमुखांच्या गढीला सुरुंग
लातूर येथे धक्कादायक निकाल लागल्याचं पाहायला मिळत आहे. देशमुखांच्या बुरुजाला सुरुंग लागल्याचं दिसत आहे.
लातूर ग्रामीणमधून काँग्रेसचे धीरज देशमुख यांचा पराभव झाल्याची माहिती समोर येत आहे. भाजपचे रमेश कराड यांचा येथून विजय झाला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आणखी बाकी आहे.
तर मोठे बंधू अमित देशमुख विरुद्ध भाजपच्या अर्चना पाटील चाकूरकर यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. सध्या अमित देशमुख 800 मतांनी आघाडीवर असून आणखी 8 फेऱ्या शिल्लक आहेत.
झारखंड विधानसभा निवडणुकीचे ताजे कल
ब्रेकिंग, माहीमचा किल्ला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे, अमित ठाकरे पराभूत
लाडक्या बहिणीचं, लाडक्या शेतकऱ्यांचे आभार मानतो- एकनाथ शिंदे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती 220 जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंतचे कल पाहता, महायुतीचं सरकार येईल अशी शक्यता दिसत आहे. त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी लोकांचे आभार मानले.
ते म्हणाले, “मी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार मानतो कारण हा विजय ऐतिहासिक आहे. महायुतीला बहुमत मिळेल असं मी म्हटलं होतं. मी माझ्या लाडक्या बहिणींना, लाडक्या शेतकऱ्यांना आणि सर्व वर्गातील लोकांचे आभार मानतो.”
“महायुतीने जे काम केलं आहे, त्यावर लोकांनी मत दिलं आहे. म्हणून महायुतीला इतका मोठा विजय मिळाला आहे.” मुख्यमंत्री कोण होईल या प्रश्नावर ते म्हणाले, “आधी अंतिम आकडेवारी येऊ द्या, त्यानंतर तिन्ही पक्षाचे लोक एकत्र बसतील. ज्या पद्धतीने आम्ही एकत्र निवडणुका लढवल्या, त्याचप्रमाणे एकत्र बसून निर्णय घेऊ.”
दुपारी 2.30 वाजता दिसणारे कल
जालन्यात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन खोतकर विजयी
जालन्यात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन खोतकर विजयी झालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीवर लोकांनी शिक्कामोर्तब केलंय अशी प्रतिक्रिया निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अर्जुन खोतकर यांनी दिलीय.
एकनाथ शिंदे यांचं नाणं खणखणीत चाललेलं आहे, असं सांगत खोतकर यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची इच्छा आहे असल्याचं मतं खोतकर यांनी व्यक्त केलंय. सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी, मला मतदार बंधूंनी दिली असून सर्व घटकासाठी मी काम करणार असल्याचं खोतकर म्हणालेत.
दुपारी 2.30 वाजता स्पष्ट झालेले कल
नितेश राणे कणकवलीत विजयी
महाराष्ट्र आणि झारखंड बरोबर देशभरात काही ठिकाणी पोटनिवडणुकांचेही आज निकाल
झारखंड आणि महाराष्ट्र या राज्यांबरोबर देशभरात 14 राज्यातील 48 विधानसभा आणि दोन राज्यांच्या लोकसभा जागेवरही झालेल्या पोटनिवडणुकांचे निकालही आज येत आहे.
- विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वायनाडच्या जागेचा राजीनामा दिल्यावर प्रियंका गांधी तिथून निवडणूक लढत आहेत. यावर्षी जून महिन्यात झालेल्या निवडणुकीत राहुल गांधी 3 लाख 64 मतांनी जिंकले. त्यांना 6 लाख 47 हजारपेक्षा जास्त मतं मिळाली.
- महाराष्ट्रातही नांदेड लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक झाली. तिथे भाजप उमेदवार संतूकराव हंबर्डे 2600 मतांच्या फरकाने पहिल्या स्थानावर आहेत. दुसऱ्या स्थानावर काँग्रेसचे रवींद्र चव्हाण आहे.
- उत्तर प्रदेशातही विधानसभेच्या 9 जागांवर मतदान झालं. त्याचेही निकाल येत आहेत. त्यात भाजप युती 6 ठिकाणी तर समाजवादी पक्ष 3 ठिकाणी आघाडीवर आहे. मैनपुरीतील करहल, आंबेडकर नगरमधील कटेहरी, मुजफ्फरनगरची मीरापूर, अलीगढची खैर, अलाहाबादमधील फुलपूर, कानपूरमधील सीसामऊ, मिर्झापूरमधील मंझवां. मुरादाबादची कुंदरकी. आणि गाझियाबाद या जागांवर पोटनिवडणुका झाल्या.
ब्रेकिंग, तासगावात रोहित पाटील विजयी
तासगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित आर आर पाटील विजयी झाले आहेत.
स्वर्गीय आर.आर. आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटलांनी विजय मिळवला आहे. त्यांनी 28 हजारांच्या मताधिक्याने विजय नोंदवला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार व माजी खासदार संजय काका पाटील यांचा रोहित पाटलांनी पराभव केला आहे.
'विदर्भातून नानागिरी, कटोलमधून काकागिरी आणि सावनेरमधून गुंडगिरी आम्ही संपवली'
'विदर्भातून नानागिरी, कटोलमधून काकागिरी आणि सावनेरमधून गुंडगिरी आम्ही संपवली आहे. आता देवाभाऊ मुख्यमंत्री व्हावे ही इच्छा', असं मत आशिष देशमुख देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.
सावनेर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार असून सध्या त्यांची विजयाकडे घोडदौड सुरू आहे. सावनेर मधून सुनील केदार 1995 पासून आमदार आहेत पण यावेळी त्यांच्या पत्नी रिंगणात होत्या.त्यांचा पराभव आशिष देशमुख यांनी केलाय.
ब्रेकिंग, सिंदखेडराजा मतदारसंघात देवानंद कायंदे विजयी
सिंदखेडराजा मतदारसंघात अजित पवार गटाचे देवानंद कायंदे 4292 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांना पराभूत केले आहे.
दिंडोरी विधानसभा मतदारसंघात नरहरी झिरवाळ आघाडीवर
- दिंडोरी विधानसभा मतदारसंघात नरहरी झिरवाळ यांच्याकडून राज्याच्या विधानसभा उपाध्यक्ष हरण्याची परंपरा खंडित होण्याची शक्यता आहे.
- झिरवाळ तिसऱ्यांदा पुन्हा विजयी होण्याच्या जवळ आहेत.
- 28 वी फेरीअखेर नरहरी झिरवाळ 123849 अजित पवार राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ 39196 मतांनी आघाडीवर आहेत.
सना मलिक, फहाद अहमद यांच्यात अटीतटीची लढत, तर महेश सावंत अमित ठाकरेंविरोधात आघाडीवर
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज (23 नोव्हेंबर) जाहीर होत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 20 नोव्हेंबर मतदान पार पडलं होतं. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे.
एका बाजूला भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची महाविकास आघाडी असा हा सामना आहे.सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मुंबईत भाजपा कार्यालयासमोर जल्लोश
मुंबईत भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोश सुरू केला आहे.
तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर पिछाडीवर
5973मतांनी भाजपचे राजेश वानखडे आघाडीवर यशोमती ठाकूर पिछाडीवर आहेत.
आठव्या फेरीतील मते
- राजेश वानखडे 3221 एकूण मते 35491
- यशोमती ठाकूर 3496 एकूण मते 29518
- मिलिंद तायडे (वंचित)606 एकूण मते 2358
ब्रेकिंग, शिराळा मतदारसंघात सत्यजित देशमुख विजयी, मानसिंगराव नाईक पराभूत
शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार सत्यजित देशमुख विजयी झाले आहेत. 22,624 मताधिक्यांनी मिळवला पहिल्यांदा विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांचा पराभव केला आहे.