You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टांझानिया: प्रवासी विमान व्हिक्टोरिया लेकमध्ये कोसळलं, 19 जणांचा मृत्यू
प्रवाशांना घेऊन जाणारे टांझानियाचे विमान बुकोबा शहरातील व्हिक्टोरिया लेकमध्ये कोसळल्याची घटना रविवारी (6 नोव्हेंबर )घडली.
या विमानात एकूण 43 जण होते. त्यापैकी किमान 19 जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्यादरम्यान 24 जणांना वाचवण्यात यश आल्याचे प्रेसिजन एअरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
विमानाचा अपघात झाल्यानंतर दोन वैमानिकांनी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पण आता कदाचित त्यांचा मृत्यू झालेला असू शकतो असं टांझानियाच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे.
विमानतळापासून काही अंतरावरच या विमानाचा अपघात घडला.
बचावकार्यात काही जणांना वाचवण्यात यश आले आहे.
अब्दुल नुरी हे विमानाची वाट पाहत विमानतळावर उभे होते. त्यांनी हा अपघात होताना प्रत्यक्ष पाहिले.
हे पाहून आम्हा सर्वांनाच धक्का बसला. लोक घाबरले आणि ते रडू लागले होते, असं नुरी यांनी बीबीसीला सांगितलं.
स्थानिक वेळेनुसार साधारण 8:50 वाजता ही घटना घडली असून खराब हवामानामुळे घटना घडली असावी असा अंदाज आहे.
रोपचा वापर करून आपत्कालीन सुरक्षा रक्षकांनी ATR-42 विमानाला किनाऱ्याजवळ आणलं. आता विमानाचा काही भाग पाण्याच्यावर दिसत आहे.
दुर्घटनेनंतर विमान जवळपास पूर्णपणे पाण्यात होतं. केवळ विमानाच्या वरील काही भाग केवळ दिसत होता.
यातून वाचलेले रिचर्ड कोम्बा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "विमान उतरणार होते तेव्हा हवामान बिघडले होते. त्यामुळे वैमानिकाला मार्ग बदलावा लागला."
ते पुढे सांगतात, "आपण थोड्याचवेळात उतरणार आहोत असं आम्हाला सांगण्यात आलं. पण नंतर थोड्याचवेळात आम्ही थेट तलावात होतो. पाणी सुद्धा आत शिरलं. पुढे बसलेले प्रवासी पाण्यात होते. आम्ही जे मागे बसलो होतो ते कसेबसे बाहेर पडू शकले."
टांझानियाचे पंतप्रधान कासिम मजलिवा म्हणाले, "बाहेर आलेले प्रवासी रुग्णालयात आहेत आणि त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही. परंतु त्यांना धक्का बसला आहे. ते काळजी करत आहेत."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)