You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जन्मावेळी अदलाबदली होता होता राहिले, पण 20 वर्षांनी प्रेमात पडले आणि मग...
- Author, ड्राफ्टिंग,
- Role, बीबीसी न्यूज वर्ल्ड.
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
आपला आयुष्याचा जोडीदार आपल्याला कुठे, कसा आणि केव्हा भेटेल, हे आपण कधीच सांगू शकत नाही.
आपला होणारा जोडीदार कित्येकवेळा आपल्या आजूबाजूलाच कुठेतरी असतो, काही वेळा तो समोरही येऊन गेलेला असतो, मात्र आपल्याला त्याची कल्पनाही नसते. पण अचानक एके दिवशी दोघांची भेट होते आणि ही प्रेमकहाणी लिहिली जाते.
या विषयावर कित्येक चित्रपट येऊन गेले असतील. काही आणखी येतील. परंतु, अनपेक्षितपणे जोडीदार भेटण्याच्या या कथा कधीच संपणार नाहीत.
अशीच एक अविश्वसनीय प्रेमकहाणी आज आपण पाहूया. या कहाणीतील मुख्य पात्र आहेत जिम आणि मार्गारेट.
आश्चर्याची बाब म्हणजे, या दोघांची जन्मावेळी अदलाबदली होणार होती. पण नशिबाने त्यांना एकमेकांचा जोडीदारच बनवून टाकलं.
नुकतेच जिम आणि मार्गारेट मिचेल हे आपल्या विवाहाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरा करत आहेत. त्यांची ही आगळीवेगळी कहाणी या निमित्ताने त्यांना जशीच्या तशी आठवत आहे.
15 ते 17 सप्टेंबर 1952. जिम यांची आई मार्गारेट ही गरोदर असल्याने युकेमध्ये लेनॉक्सटाऊन शहरातील लेनॉक्स केसल हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी दाखल झाली होती. दरम्यान, मार्गारेट नामक दुसरी महिलासुद्धा या रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली.
योगायोग म्हणजे मार्गारेट नामक दोन्ही महिलांची प्रसूतीही एकाच वेळी झाली. जिमच्या आईला सुरुवातीला मुलगा झाल्याचं डॉक्टरांनी कळवलं होतं. तर दुसऱ्या मार्गारेटला मुलगी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
त्यावेळी बाळाच्या जन्मानंतर त्याला नावाचं एक टॅग लावून आईच्या हातात सोपवलं जायचं. पण दोन्ही मार्गारेटच्या नावातील साधर्म्यामुळे या प्रक्रियेदरम्यान कर्मचाऱ्यांकडून अनावधानाने त्यांच्या बाळांची आदलाबदली झाली.
बाळांना घेतल्यानंतर यात काहीतरी चुकत असल्याचं दोन्ही मातांना जाणवलं. त्यांनी वेळीच ही गोष्ट हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. कर्मचाऱ्यांनी ही गोष्ट मान्य करून तत्काळ ही चूक सुधारण्यात आली.
छोट्या जिमला अखेर त्याच्या खऱ्या आईकडे सोपवण्यात आलं. तर दुसऱ्या मार्गारेटच्या हातातही नवजात स्त्री अर्भक सोपवण्यात आलं. या बाळाचं नामकरणही पुढे त्यांनी मार्गारेट मिचेल असं केलं.
पुढे, जिमचे आई-वडील साऊथ ग्लास्गोच्या आर्देन परिसरात राहण्यासाठी गेले. तर मार्गारेट मिचेलचे आईवडील त्याकाळी नाईट्सवूड परिसरात राहत असत. कालांतराने तेसुद्धा आर्देन परिसरात जिम यांच्या घरापासून पायी 30 मिनिटांच्या अंतरावर राहू लागले.
या कालावधीत जिम किंवा मिचेल किंवा त्यांचे कुटुंबीय यांचा काहीएक संपर्क नव्हता.
अखेर, तो दिवस उजाडला. जिम आणि मार्गारेट मिचेल 18 वर्षांचे होते. त्यावेळी जिमच्या एका मित्राचं - डेव्हिड याचं लग्न होणार होतं. त्याच्या विवाहसोहळा ग्लासगोच्या क्वीन्स पार्कमध्ये आयोजित करण्यात आला होता.
योगायोगाने मार्गारेट मिचेल हिची मैत्रीण पॅट ही डेव्हिडसोबत विवाहबद्ध होणार होती. कार्यक्रमात दोघांची भेट झाली.
या आठवणीबाबत बोलताना जिम सांगतात, "आम्ही दोघे त्यावेळी बोललो. मला ती खूप सुंदर वाटली. मी तिला कॉफीसाठी विचारलं. माझ्या सुदैवाने तिने त्यासाठी होकार दिला. मला त्यावेळी खूप आनंद झाला होता."
दोन महिन्यांच्या डेटिंगनंतर जिमने त्याच्या कुटुंबीयांशी मार्गारेटची ओळख करून दिली.
यादरम्यान बोलता बोलता आईने आपल्या मुलाबाबतचा रुग्णालयातील प्रसंग मार्गारेट मिचेलला सांगितला. हा प्रसंग तिलाही तिच्या आईने सांगितलेला होता.
त्यामुळे असं कसं शक्य आहे, याचा विचार करत जिमच्या आईने आणखी काही गोष्टी मिचेलला विचारल्या.
त्यानंतर मिचेलची आई जिमच्या आईला येऊन भेटली. तेव्हा दोघांना लक्षात आलं की रुग्णालयात आदलाबदली झालेली नवजात बालकं म्हणजे आपली ही मुलेच आहेत.
आपली हीच मुलं आता डेटिंग करत आहेत, हे पाहून त्यांना विश्वासच बसत नव्हता.
पुढे जिम आणि मार्गारेट मिचेल यांनी 1972 साली विवाह केला. आता ते ग्लासगो शहराबाहेर ईस्ट कर्लब्राईड परिसरात राहतात. नुकतेच त्यांच्या विवाहाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत.
दोघांना दोन मुले आणि दोन नातवंडेही आहेत. आपल्यासोबत घडलेल्या या योगायोगाबाबत जिम आणि मार्गारेट अतिशय उत्साहाने सांगत असतात. त्यांची ही कहाणी सर्वत्र लोकप्रिय आहे. नुकतेच बीबीसी रेडिओने घेतलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपली प्रेमकहाणी पुन्हा सर्वांना सांगितली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)