You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
त्याला वाटलं तो अदृश्य झाला म्हणून तो बँक लुटायला गेला, आणि...
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
1995 मधला एक दिवस होता. अमेरिकेतल्या पीट्सबर्ग शहरात एक मध्यमवयीन जाडाजूडा माणूस एका बँकेत शिरला.
त्याला ती बँक लुटायची होती. पण त्याने चेहरा झाकण्यासाठी कोणताही मास्क घातला नव्हता, चेहऱ्यावर कापड बांधलं नव्हतं. त्याने आपला वेशही बदलला नव्हता. बँकेतून बाहेर पडताना तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे बघून त्याने स्मितहास्यही केलं.
अशाच प्रकारे त्याने त्याच दिवशी दुसरी बँक लुटली. याचा किस्सा सांगताना काही म्हणतात, की जेव्हा त्या चोराने बँक कॅशियरकडे बंदूक दाखवून पैशांची मागणी केली तेव्हा तो म्हणाला, "घाबरू नको, मला चेहरा आहे."
त्याच दिवशी रात्री पोलिसांनी मॅकआर्थर व्हीलर या माणसाला त्याच्या राहात्या घरातून अटक केली. कॅमेऱ्यात त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता त्यामुळे त्याची ओळख पटवणं सोपं झालं. याच माणसाने सकाळी दोन बँका लुटल्या होत्या.
त्याला अटक झाली यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. शेवटी पोलिसांनी त्याला बँक लुटताना रेकॉर्ड झालेलं फुटेज दाखवलं ज्यात त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता.
मॅकआर्थर व्हीलर थक्क झाला. त्याला काय बोलावं सुचेना, थोड्यावेळाने तो अस्पष्ट शब्दात एकच वाक्य पुटपुटला, "… पण मी चेहऱ्याला ज्यूस लावलं होतं."
त्याचं झालं असं की मॅकआर्थर व्हीलर या माणसाने दोन्ही बँका लुटायच्या आधी चेहऱ्यावर लिंबाचा रस लावला होता. का?
त्याच्या डोक्यात अदृश्य शाईचं उदाहरण होतं. म्हणजे तुम्ही जर लिंबाच्या रसाचा शाई म्हणून वापर करून एखादी गोष्ट कागदावर लिहिली तर काहीच दिसत नाही, कागद कोरा दिसतो. पण हाच कागद उष्णतेच्या संपर्कात आला की लिंबाचा रस निळा होऊन त्यावर जे लिहिलं आहे ते स्पष्ट दिसतं.
व्हीलरला वाटलं चेहऱ्यावर लिंबाचा रस लावला की त्याचा चेहरा अदृश्य होईल आणि तो कॅमेऱ्यात दिसणार नाही. त्याला फक्त आपला चेहरा उष्णतेच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यायची होती. पोलिसांनी व्हीलरची तपासणी केली तेव्हा लक्षात आलं की ना त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता, ना वेडा होता, ना नशेत होता.
त्याने फक्त भलामोठा बावळटपणा केला होता.
या घटनेची नंतर इतकी चर्चा झाली की अनेक मानसशास्त्रज्ञांनी व्हीलरच्या मनात नक्की काय चालू असेल याचा अभ्यास केला.
अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठातले मानसशास्त्राचे प्राध्यापक डेव्हीड डनिंग आणि जस्टीन क्रुगर यांनी या घटनेवर सविस्तर संशोधन करून रिसर्च पब्लिश केला.
त्यांनी असा निष्कर्ष काढला की प्रत्येकालाच आपल्या क्षमतांविषयी गैरसमज असतात. म्हणजे प्रत्येकालाच वाटतं की आपण हुशार आहोत, अवघड गोष्टी करू शकतो, आपल्यात या खास गोष्टी आहेत. पण काही लोक मात्र आपल्या क्षमतांना फारच जास्त समजतात. खरंतर तेवढे कॅपेबल ते नसतातच.
याला त्यांनी 'आत्मविश्वासाचा भ्रम' असं नाव दिलं. आता यालाच डनिंग-क्रुगर इफेक्ट म्हणतात.
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, 'बिनडोक लोक स्वतःला कायमच अतिहुशार समजतात.'
डनिंग आणि क्रुगर यांनी काही प्रयोग केले. त्यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारले. हे प्रश्न व्याकरण, तर्क, विनोद अशा वेगवेगळ्या विषयांवर होते.
मग त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला तिचा किंवा त्याचा स्कोर किती आला असेल याचा अंदाज लावायला सांगितला आणि इतरांना किती मार्क मिळाले असतील, त्यांच्या तुलनेत तुम्ही पुढे आहात की मागे हेही विचारलं.
गंमतीशीर गोष्ट अशी की ज्यांचा स्कोर सगळ्यात कमी होता, त्यांनी स्वतःला सर्वाधिक मार्क दिले होते. बरं त्यांनी हेही सांगितलं की आमचा परफॉर्मन्स गटातल्या जवळपास 75 टक्के लोकांहून चांगला आहे.
'आत्मविश्वासाचा भ्रम' हे सूत्र फक्त शाळा कॉलेजातच नाही तर रोजच्या आयुष्यातही तितकंच लागू पडतं.
पुढच्या एका प्रयोगात डनिंग आणि क्रुगर एका गन रेंजमध्ये गेले. तिथे गोळ्या चालवणाऱ्या लोकांना त्यांनी त्यांच्या क्षमतेविषयी विचारलं. यातही तसेच निष्कर्ष समोर आले. ज्यांनी सर्वात कमी प्रश्नांची योग्य उत्तरं दिली त्यांना स्वतःच्या क्षमतेविषयी अतिआत्मविश्वास होता.
तुम्ही रिअॅलिटी शो पहा, तुम्हाला दिसले की जे लोक ऑडिशनमध्ये सिलेक्ट होत नाहीत किंवा ज्यांना जजेस नाकारतात त्या लोकांच्या चेहऱ्यावर धक्का आणि निराशेचं मिश्रण दिसतं.
या स्पर्धकांना मनापासून खात्री असते की ते उत्तमच आहेत आणि त्यांना मान्य होत नाही की त्यांचा परफॉरमन्स इतका चांगला नव्हता. आपल्या क्षमतांविषयी आपला गैरसमज झालाय आणि आपण समजतो तितके आपण भारी नाही हे ते मान्य करायला तयार नसतात.
आपण आहोत त्यापेक्षा स्वतःला भारी समजण्याची प्रवृत्ती प्रत्येक माणसात असते. एका अभ्यासात असं दिसून आलं का जवळपास 80 टक्के ड्रायव्हर्स स्वतःलाच्या क्षमतेला समाधानकारक, इतरांपेक्षा चांगली समजतात. हे शक्यच नाही. लोक अनेकादा स्वतःला आहे त्यापेक्षा लोकप्रिय समजतात, आहे त्या पेक्षा हुशार समजतात, पण इतकं असतंच.
पण जेव्हा लोक अकार्यक्षम असतात आणि तरी स्वतःला भारी समजून बावळट निर्णय घेतात तेव्हा खरी गुंतागुंत होते. त्यांना समजतच नाही की ते चुका करत आहेत.
डनिंग आणि क्रुगर जेव्हा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करत होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की खऱ्या अर्थाने जे हुशार मुलं आहे ते परीक्षेनंतर आपल्याला किती मार्क मिळतील याचा योग्य अंदाज लावतात. कारण त्यांचा अंदाज त्यांचे आधीचे मार्क आणि शिक्षकांनी त्यांना दिलेला फीडबॅक यावर अवलंबून असतो.
पण ढ विद्यार्थी मात्र त्यांना कोणीही, कितीही सांगितलं तुम्ही पास होणार नाही, तरी ते आपल्या क्षमतेवर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवतात. त्यांना असं अजिबात वाटत नाही की आपलं चुकलंय किंवा आपण नापास होणार.
नाकर्ते लोक हेच ठसवत बसतात की त्यांचंच कसं बरोबर आहे.
उत्क्रांतीच्या सिद्धांताचे जनक चार्ल्स डार्विन यांनी 1871 मध्ये लिहून ठेवलं होतं की, "अनेकदा आत्मविश्वास ज्ञानतून न येता अज्ञानातून आलेला असतो."
याहूनही रंजक गोष्ट अशी की हुशार माणसांना मात्र कायमच आपल्या क्षमतेविषयी शंका असते. म्हणजे नापास होणारे किंवा काठावर पास होणारे विद्यार्थी स्वतःला गरजेपेक्षा जास्त हुशार समजतात तर 80-90 टक्के मिळवणारे विद्यार्थी मात्र स्वतःला तेवढे हुशार समजत नाहीत.
हुशार विद्यार्थांना वाटतं की जर एखादी गोष्ट त्यांना जमत असेल तर ती इतरांनाही जमेल, त्यात काय एवढं? स्वतःच्या क्षमतेला कमी समजण्याला 'इंपोस्टर सिंड्रोम' असं म्हणतात. 'डनिंग-क्रुगर' इफेक्टच्या अगदी विपरीत असं हे तत्त्व आहे.
पण हुशार किंवा क्षमतावान लोकांना जेव्हा आत्मावलोकन करण्याची वेळ येते, किंवा जे इतरांकडून मिळणाऱ्या फीडबॅकचा अभ्यास करतात तेव्हा ते स्वतःत बदल करतात. बिनडोक माणसं मात्र स्वतःला शहाणी समजत बसतात.
त्यांना लिंबाचा रस लावला की आपण अदृश्य होतो ही कल्पना इतकी पटलेली असते की त्यांना लक्षातच येत नाही की आपली विचार करायची पद्धत अकार्यक्षम, अतार्किक किंवा कधी कधी तद्दन बावळटपणाची आहे.
यातून वाचायचं असेल तर एकच उपाय, आपल्या क्षमतांचा अंदाज घेत रहा, शिकत राहा. कारण कन्फ्युशिअसनीही एकदा म्हटलं, "आपण किती बावळट आहोत हे कळलं की आपण खऱ्या अर्थाने ज्ञानी ठरतो."
(बीबीसी फ्युचरच्या टॉम सेफर्ड यांच्या लेखातून काही संदर्भ घेतले आहेत.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)