You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
CWC22 : मिताली राजचा विक्रम पण भारताचा पराभव
भारताची अनुभवी फलंदाज आणि कर्णधार मिताली राजने आयसीसी विश्वचषकात सर्वाधिक अर्धशतकं झळकावण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत मितालीने हा विक्रम नावावर केला. पण या लढतीत भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं.
आतापर्यंत न्यूझीलंडच्या डेबी हॉकलीच्या नावावर हा विक्रम होता. डेबी आणि मिताली यांनी विश्वचषकात प्रत्येकी 12 अर्धशतकं झळकावली आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचं अर्धशतक मितालीच्या कारकीर्दीतलं 63वं अर्धशतक होतं.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 277 धावांचा डोंगर उभारला. कर्णधार मितालीने 4 चौकार आणि एका षटकारासह 68 धावांची खेळी केली.
यात्सिका भाटियाने 59 तर हरमनप्रीत कौरने नाबाद 57 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियातर्फे डार्सी ब्राऊनने 3 तर अलाना किंगने 2 विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठलं. कर्णधार मेग लॅनिंगने 13 चौकारांसह 97 धावांची शानदार खेळी केली. अलीसा हिलीने 72 धावा करत तिला चांगली साथ दिली. राचेल हेन्सने 43 तर बेथ मूनीने 30 धावांच्या उपयुक्त खेळी करत संघाच्या विजयात योगदान दिलं. भारतातर्फे पूजा वस्राकरने 2 विकेट्स घेतल्या.
मेग लॅनिंगला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
सलामीच्या लढतीत भारताने पाकिस्तानवर 107 धावांनी दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाचा पराभव झाला. भारताने वेस्ट इंडिजला 155 धावांनी नमवत जोरदार मुसंडी मारली. इंग्लंडविरुद्ध मात्र भारतीय संघाच्या पदरी पराभव पडला. ऑस्ट्रेलियाविरुद्धही पराभव झाल्याने भारतीय संघाला उर्वरित दोन लढतीत जिंकणं क्रमप्राप्त आहे. भारताची आता बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढत होणार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)