You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'चंदीगड करे आशिकी'सारखीच कथा खऱ्या आयुष्यात, ट्रांसवूमनच्या प्रेमात पडला हा तरुण
(नुकताच आयुष्यमान खुराणा आणि वाणी कपूर यांचा चंदीगड करे आशिकी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याच कथेशी साधर्म्य असलेली एक गोष्ट या युगुलाच्या आयुष्यात घडली आहे.)
ट्रान्सवूमन डॅनिएला मॅकडोनल्ड म्हणतात की, जोशची भेट होईपर्यंत 'स्ट्रेट' असलेल्या पुरुषासोबत डेटिंग करणं हे एखाद्या 'हॉरर शो'पेक्षा कमी नव्हतं. डॅनिएलाचे गेल्या अडीच वर्षांपासून जोशसोबत नातेसंबंध आहेत.
डॅनिएलानं तिच्या आयुष्याची गोष्ट बीबीसीच्या जेंडर आणि आयडेंटिटी विषयक घडामोडींच्या वृत्तांकन करणाऱ्या मेघा मोहन यांना सांगितली.
या वृत्तातील काही मजकुराची भाषा तुम्हाला कदाचित आक्षेपार्ह वाटू शकते.
एका तळ्याच्या काठी आम्ही पहिल्यांदा एकमेकांना पाहिलं. पाहताच क्षणी एकमेकांच्या डोळ्यात काही क्षण पाहत राहिलो. माझ्या बाजूला माझे वडील होते. पण त्यांचा अडथळाही आमच्या एकमेकांकडे पाहण्यात जाणवला नाही. जोश तळ्यात गळ टाकून मासा गळाला लागण्याच्या आशेनं तिथं बसला होता.
कॅलिफोर्नियाच्या सिएरा नेवाडाच्या पर्वतरांगांमध्ये हे तळं आहे. मॅमोथ लेक असं त्याचं नाव. तिथं माझं कुटुंब कॅम्पिंगसाठी गेलं होतं. हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीनं कमालीचं आकर्षक आहे. मोठमोठ्या पर्वतरांगा, स्वच्छ तलाव, ट्रेकिंग आणि प्रदूषणविरहित आकाश.
जोशनं माझ्याकडं पाहिलं आणि हसला. माझ्या कुटुंबाला असं बाहेर फिरायला आवडतं. तुमचा बॉयफ्रेंड तुमच्या कुटुंबाच्या आवडी-निवडीत नेमका बसतो, ही फारच भारी गोष्ट असते.
माझ्या आयुष्यातले दोन पुरुष एकमेकांच्या बाजूला शांतपणे उभे असल्याचं पाहून, मला कमालीची शांतता वाटली. एक वेळ अशी होती, की असं काही आपल्या आयुष्यात असेल याची कल्पनाही केली नव्हती.
जोशआधीचं डेटिंग म्हणजे 'हॉरर शो'
माझ्या वयाच्या इतरांसारखंच मीही डेटिंग अॅप वापरत असे.
एखाद्या रोमँटिक नात्यातून मला काय हवंय, याच मी विचार करते, त्यावेळी मी बऱ्यापैकी पुराणमतवादी असते. म्हणजे, तो एकपत्नीत्व मानणारा असावा, तो सच्चा सोबती असावा, त्यानं माझ्यासोबत ब्रेकफास्ट करावं, किंवा मी सॅन डिएगोतल्या यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये मेडिकलची विद्यार्थीनी असल्यानं तिथं जाणाऱ्या तासन् तास वेळेची कदर करणारा असावा वगैरे.
डेटिंग अॅपवरील माझ्या प्रोफाईलमध्येही हेच मी लिहिते. मी अत्यंत प्रमाणबद्ध डेटिंग प्रोफाईल लिहिले होते. त्यातले सुरुवातीचे दोन शब्द मात्र इतरांपेक्षा वेगळे होते, ते म्हणजे - 'ट्रान्सजेन्डर वुमन'.
मी माझं लैंगिक ओळख (जेंडर आयडेंटिटी) कधीच लपवून ठेवली नाही. सुरुवातीपासूनच मी उघडपणे सांगत राहिली आणि मान्य करत आलेय. डॅनिएला म्हणून जन्मानापासून असली, तरी वयाच्या 26 व्या वर्षी माझ्यातले शारीरिक वेगळेपण जाणवू लागले.
एक स्त्री म्हणून जगत असताना, माध्यमांमध्ये सुरू असलेल्या ट्रान्स लोकांबद्दलच्या वादविवादांशी कधीच जोडून घेतले नाही.
कुणी कुठल्या बाथरूममध्ये जायचे किंवा त्याला काय म्हणायचे, याबद्दल मी आणि माझे ट्रान्स मित्र फारसे चर्चा करत नसू. त्यापेक्षा आम्ही सर्वसाधारण तरुण ज्यावर बोलत, त्यावर चर्चा करत असू, ते म्हणजे, नातेसंबंध.
पुरुषांकडे आकर्षित होणारी स्त्री म्हणून मला अशा पुरुषासोबत राहायचे होते, जो स्त्रीकडे आकर्षित होतो. मात्र,अॅपवरील काही पुरुषांची वागणूक मला अजिबात आवडली नाही.
माझ्या मेसेज बॉक्समध्ये थेट येणाऱ्या मेसेजपैकी अधिकाधिक मेसेज तर भयंकर असत. सकाळी मेसेज बॉक्स पाहिल्यावर त्यात मला 'ट्रॅनी' म्हटलेलं असायचं, माझं फोन मला 'तू पुरुष आहेस' असं सांगायचं. माझी हत्या कशी केली जावी, याचे लांबलचक मेसेज मला मिळत.
ट्रान्स महिलांमध्ये विकृत स्वारस्य असणारे पुरुष कमी टोकाचे, तरी त्रासदायक होते. ते माझ्याकडे तात्पुरत्या मजेशीर अनुभवापुरते पाहायचे आणि मानसन्मान ठेवणाऱ्या सीमांच्या मर्यादा पाळणं त्यांना कठीण होतं. आमचे सुरुवातीचे संवाद तर माझ्या जननेंद्रियाबद्दल होत असे आणि आपण कशाप्रकारचं सेक्स करणार आहोत, यावर विचारलं जाई.
त्यातही काही पुरुष होते, ज्यांना माझी सोबत हवीशी वाटत होती, मात्र तरीही त्यांच्यासोबत डेटिंग करणं मला आव्हानात्मक वाटत होतं.
खासगीत माझ्याबद्दल आदर बाळगणारे आणि माझ्यात स्वारस्य दाखवणारे सार्वजनिक ठिकाणी मात्र ट्रान्स वुमनबाबत आक्षेपार्ह भूमिकेत दिसले. म्हणजे, अशा पुरुषांनी माझी त्यांच्या मित्रपरिवार किंवा कुटुंबाशी ओळख करुन दिली नाही.
काहींना वाटलं की, ट्रान्स वुमनसोबत डेटिंग करत असल्याचं कळल्यावर नोकरी जाण्याची शक्यता आहे. मला हे होमोफोबियासारखे वाटले. ते मला एक स्त्री म्हणून पाहत नव्हते आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांना समलिंगी म्हणून ओळखावं अशी त्यांची इच्छा नव्हती.
हे सर्व अनुभव माझ्यासाठी फार त्रासदायक आणि कठीण होते. खरंच फार कठीण.
मला उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटलं...
मला आठवतंय, एकदा सिनेमा पाहण्याच्या डेटिंगवर गेली होते. मी फार उत्सुक होते. तो तिकिटं खरेदी करत असताना, मला वाटलं, "वाह, हा माणूस किती चांगला आहे. आम्ही अगदी नेहमीच्या, ज्याला 'टिपिकल' म्हणता येईल अशा डेटवर होतो."
आम्ही सिनेमागृहात बसलो, लाईट्स बंद झाल्या आणि सिनेमाच्या आधीचा ट्रेलर सुरू झाला. तेवढ्यात तो म्हणाला, मला माहित नाही की, मी हे करू शकतो. नंतर तो उठला आणि बाहेर गेला. मी त्याच्या पाठीमागे गेले, तो तिकिटाचे पैसे परत घेत होता. तो मला तिथेच सोडून निघून गेला.
मला अगदी उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटलं. हे अपमानाचं चक्र बरंच चालत राहिलं, ज्यामुळे मला वाटलं की, काहीतरी आपलंच चुकतंय. आपल्यातच काहीतरी मुलभूत गोष्ट आहे, ज्यामुळे आपण प्रेम करण्यायोग्य नाही, असं वाटू लागलं.
वृत्तीत बदल
फिलिपाईन्सस्थित माकी गिंगोयोन हे एक डेटिंग वेबसाईट चालवतात. 'माय ट्रान्सजेन्डर डेट' नावाची ही वेबसाईट आहे. त्याला सोबत त्याची पार्टनर सिरिल मझुर देते.
माकी सांगतात, 2013 साली जेव्हा वेबसाईट सुरू झाली, तेव्हा कमी अवधीत 1.5 मिलियन प्रोफाईल्स तयार झाल्या. मात्र, त्यातले काहीशे लोकच सक्रीय राहिले.
आठ वर्षांनंतर, वेबसाईटवर सक्रीय राहणाऱ्यांची संख्या 1 लाख 20 हजारांवर पोहोचलीय आणि ही संख्या वाढत जातेय. स्ट्रेट, सिसजेंडर (cisgender) पुरुषही त्यांच्या ट्रान्स पार्टनरसोबतचे फोटो पोस्ट करण्याबाबत ठाम असल्याचे दिसून येतात.
"2013 साली आम्ही वेबसाईट सुरू केली. कारण आम्हाला अत्यंत चांगलं आणि सुरक्षित ठिकाण हवं होतं, जिथं ट्रान्स वुमन आणि सिसजेंडर पुरुष आपल्या आवडीचा पार्टनर शोधू शकतात आणि एकमेकांसोबत डेटिंग करू शकतात," असं माकी म्हणतात.
"ट्रान्स लोकांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वत:ची जागा मिळू शकते. पण तिथेही अपमानकारक गोष्टी होऊ शकतात. गोष्टी आता बदलतायेत. मी खात्रीने सांगू शकतो की, चांगल्या नातेसंबंधांच्या लोकांची संख्या वाढतेय," असंही मार्क म्हणतात.
आणि मग मी जोशला भेटले...
त्यानं मला डेटिंग अॅपवरून मेसेज केलं आणि ते थोडं वेगळं वाटलं. जोश माझ्यापेक्षा पाच वर्षानी मोठा आहे आणि तो अमेरिकन लष्करात आहे.
तो फिलिपिनो-अमेरिकन कुटुंबातून येतो आणि त्यानं कुटुंबाला माझ्याबद्दल सर्व सांगितलंय. आणि आम्ही एकमेकांबाबत गंभीर असल्याचं कळल्यावर, त्यांनं माझी जेंडर आयडेंटिटीही घरी सांगितली.
त्याच्या कुटुंबामध्ये काहीजणांना थोडा धक्का बसला होता. कारण त्यांचा मुलगा एका ट्रान्स वुमनच्या प्रेमात आहे. मात्र, ते सगळेजण दयाळू होते. त्यांच्या कुटुंबातली मला भेटलेली पहिली व्यक्ती म्हणजे जोशची बहीण. मला तिची ओळख करून दिल्यानंतर, तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसला.
काही महिन्यांनंतर जोशनं त्याच्या पूर्ण कुटुंबाची भेट घडवून दिली. त्याच्या आजीनं मला पाहिल्यानंतर सर्वात पहिलं वाक्य म्हटलं, "जोश, ही खूप सुंदर दिसते."
मी एकदा जोशला विचारलं, तू इतका मुक्तविचारांचा कसा? तेव्हा इतर पुरुषांपेक्षा काहीसं वेगळं उत्तर त्यानं दिलं. तो म्हणाला की, माझ्या मित्रपरिवारात ट्रान्स वुमन आहेत आणि जेंडर आयडेंटिटीमुळे त्यांना मी कधी वेगळं समजलं नाही.
जोशच्या मते, एखाद्या सिसजेंडर वुमनला किंवा मला डेटिंग करण्यात फारसा फरक जाणवला नाही. त्याच्या मते, आपलं प्रेम हे इतरांप्रमाणेच 'सर्वसामान्य' आहे.
हे सगळं अडीच वर्षांपूर्वी घडलं. तेव्हापासून आम्ही सोबत आहोत. इतर जोडीदारांप्रमाणेच जोश आणि मी चर्चा करतो, आव्हानांना सामोरं जातो. माझ्या मित्रपरिवारात असे बरेच जण आहेत, ज्यांना अशा नात्यांबाबत अवघडल्यासारखं होतं. पण त्यांना मी सांगू शकते की, आमचं नातं अगदी परंपरागत असल्यासारखं आहे.
आता सर्वात मोठा अडथळा म्हणजे, आम्ही आमच्या करिअरमुळे बराच वेळ एकमेकांपासून दूर असतो. जोशला अमेरिकन लष्कराच्या प्रशिक्षणात बराच वेळ द्यावा लागतो आणि मी सध्या दिवसातले 12 तास माझ्या वैद्यकीय शिक्षणात द्यावे लागतात.
पण मला आणखी एक ध्येय गाठायचे आहे. अवी मनुलांग या माझ्या नर्स असलेल्या ट्रान्स मित्रिणीसोबत एक डेटिंग अॅप लाँच करायचे आहे. या अॅपवर ट्रान्स लोक किंवा ट्रान्स नसलेले सुद्धा एकमेकांना जोडले जातील आणि एकमेकांना स्वीकारतील. त्यांच्यात लैंगिक ओळखीचा कुठलाच अडथळा येणार नाही.
ट्रान्स वुमन लैंगिक विषमता आणि लैंगिक हिंसाचाराचा भयंकर अनुभव घेतात. त्यामुळे सुरक्षित अशी व्यवस्था तयार करण्याचाही आमचा प्रयत्न आहे. प्रत्येकाला सन्मानानं जगण्याचा आणि प्रेम करण्याचा हक्क असायला पाहिजे.
मी भविष्याबद्दल अत्यंत आशादायी आहे. मी मोठी होत असताना टीव्हीवरील जेरी स्प्रिंगरसारख्या कार्यक्रमांमध्ये ट्रान्स लोकांची थट्टा होताना पाहिलीय. मात्र, आता अनेक तरुण ट्रान्स असल्याचे जाहीरपणे मान्य करतात. हंटर स्काफरसारखे लोक त्यांच्या लैंगिक ओळखीबाबत अत्यंत खुलेपणाने बोलतात आणि मान्य करतात.
लोकांना वेगवेगळ्या लैंगिक ओळखीचे (जेंडर आयडेंटिटी) लोक आजूबाजूला दिसतील, तसतसे लोकांचं मतपरिवर्तन होत जाईल. जोश आणि माझ्यासारखी नाती सुद्धा आजूबाजूला दिसू लागतील. मी असं म्हणत नाहीय की, प्रत्येकानं ट्रान्स लोकांशीच डेटिंग केलं पाहिजे. मात्र, असे लोक अस्तित्वात आहेत हे मान्य केलं पाहिजे.
माझं नातं कदाचित एखादा अपवाद असेल, पण हळूहळू स्थिती बदलत जातेय. विशेषत: नव्या पिढीत तर हा बदल वेगानं होतोय. नवी पिढी त्यांच्या लैंगिक ओळखींबाबत जास्त सजग आणि उघडपणे बोलणारी, स्वीकारणारी आहे.
टिकटॉकवरील सिसट्रान्सकपल हॅशटॅगला जवळपास 3.7 मिलियन व्ह्यूज आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)