अशोक कुमारः हरिद्वारच्या शास्त्रज्ञानं कशी गाजवली होती ब्रिटिश संसद?

- Author, मायकेल वाइल्ड
- Role, राजकीय संपादक
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
अशोक कुमार ईशान्य इंग्लंडचं संसदेत प्रतिनिधित्व करणारे पहिले कृष्णवर्णीय खासदार होते. वर्णभेद आणि वैयक्तिक आव्हानं यांचा सामना करणारे भारतीय वंशाचे केमिकल इंजिनियर अशोक ब्रिटनच्या संसदेतल्या प्रतिष्ठित सदस्यांपैकी एक होते.
30 वर्षांपूर्वी पोटनिवडणुकीत विजयासह अशोक यांनी सगळ्यांना चकित केलं होतं.
मार्च 2010 मध्ये नॉर्थ यॉर्क मूस मधल्या रस्त्यावर एक अंत्ययात्रा निघाली होती. लोक गटागटाने उभे होते. काहींच्या हातात शॉपिंगची बॅग होती, काहींच्या हातात रुमाल होते.
शववाहिनीच्या पुढे एक ज्येष्ठ नागरिक चालत होते. त्यांची कंबर आणि डोकं झुकलेल्या स्थितीत होतं. त्यांच्या मागे घरातली बाकी मंडळी चालत होती. त्या सगळ्यांच्या पाठी अशोक कुमार यांचं ताबूत होतं.
गाइसबरोच्या लाल विटांपासून उभारण्यात आलेल्या मेथॉडिस्ट चर्चमध्ये आयोजित प्रार्थना सभेत लेबर पक्षाचे मंत्री हॅरियट हरमन यांनी अशोक कुमार यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
कमी वयात ते आपल्याला सोडून गेले असं ते म्हणाले. लोकांचं दु:ख समजून घेऊन त्यावर उपाय कसा करता येईल याचा विचार अशोक करत असत असं त्यांचे भाऊ रवी कुमार यांनी सांगितलं.

अशोक लहान असताना त्यांचे कुटुंबीय भारतातल्या हरिद्वार इथून इंग्लंडमध्ये स्थायिक झाले. त्यांचे वडील पोस्टमास्टर होते. काम मिळवण्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला होता.
अशोक यांचं सुरुवातीचं शिक्षण स्थानिक सेकंडरी स्कूलमध्ये झालं. त्यानंतर एस्टन विद्यापीठातून केमिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली. अशोक यांनी पीएचडी केली.
1980च्या दशकात अशोक यांनी लंडनमधल्या इंपिरिअल कॉलेजात तीन वर्ष काम केल्यानंतर टीसाईडमध्ये ब्रिटिश स्टीलच्या रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम करू लागले.
त्यांचे राजकीय विचार ठोस होते. कामानंतर स्थानिक मुद्यांवर सामाजिक कामांमध्येही सहभागी होत असत. 1987 मध्ये मिडिल्सबोरो मध्ये ते आशियाई वंशाचे एकमेव काऊंसिलर होते.
कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार रिचर्ड होल्ट यांच्या आकस्मिक निधनानंतर 1991 मध्ये लैंगबार्फची जागा रिक्त झाली. अशोक यांच्या समर्थकांना त्यांनी ही पोटनिवडणूक लढवावी असं वाटत होतं.
ट्रेड युनियनचा अशोक यांना पाठिंबा होता. स्टील उद्योगाशी संबंधित समस्यांची त्यांना माहितीही होती. आशियाई उमेदवाराला लोक मतदान करतील का अशी लेबर पक्षाच्या लोकांना शंका होती.
लैंगबार्फ हे लेबर पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या हार्टलपूल, मिडिल्सबोरो, स्कॉक्टन नॉर्थ, रेडकार यापासून जवळच होतं मात्र इथलं जग वेगळं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
या मतदारसंघात स्किनग्रोव्ह आणि लोफ्ट्स सारखे औद्योगिक भाग होते. क्लीव्हलँड वे, साल्टबर्नसारखे कृषीकेंद्रित भागही होता.
इंग्लंडमधल्या सर्वाधिक गोऱ्या माणसांचा मतदारसंघ होता. अशोक यांच्या व्यक्तिमत्वासंदर्भातही काही प्रश्न होते. थोड्या कालावधीत इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने या पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष होतं.
अशोक कुमार नम्र असं व्यक्तिमत्व होतं. ते कमी बोलत असत. संध्याकाळी आपल्या घरी राजकीय सिद्धांतांचं वाचन करण्यात तसंच जॅझ संगीत ऐकण्यात ते दंग असत. तापलेलं राजकीय वातावरण अशोक यांच्यासाठी सर्वस्वी नवीन होतं.
पण स्टील आणि कोळसा उद्योगातील खाचाखोचा माहिती असल्याने लेबर पक्षाच्या नेतृत्वाने अशोक यांच्या नावाला पसंती दिली आणि त्यांना उमेदवारी मिळाली.
मात्र जेवढं वाटलेलं त्यापेक्षा ही पोटनिवडणूक चुरशीची ठरली.

प्रचाराची सकाळ उजाडत असे. तात्पुरत्या उभारलेल्या शामियानांवर उमेदवार विराजमान होत असत. आजूबाजूला मंत्रीगण असत. सगळ्यांनी कोटावर लाल गुलाब लावलेला असे.
मार्गारेट ब्रॅकेट, जॉन प्रेसकोट, जॉन स्मिथ, गॉर्डन ब्राऊन यासारखे मोठे विरोधी नेते या भागाचा दौरा करत होते. स्थानिक महाविद्यालयं आणि नर्सिंग केंद्रात फोटो काढले जात.
शांत व्यक्तिमत्वाचे अशोक कुमार प्रसारमाध्यमांसमोर पक्षाच्या अन्य नेत्यांना पेश करण्यात आघाडीवर असत. 19 ऑक्टोबरला प्रचाराच्या तिसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत अशोक यांची खुर्ची रिकामी होती.
हॅरियट हरमन यांनी सांगितलं की अशोक यांच्या आईचं निधन झालं आहे. ते घरी परतले आहेत. पण प्रचार प्रक्रियेत कोणताही बदल होणार नाही. हरमन ठरलेल्या कार्यक्रमानुसार मतदारांना भेटण्यासाठी गाइसबोरो इथल्या रुग्णालयात रवाना झाल्या.
अशोक कुमार दुसऱ्याच दिवशी प्रचारात परतले. कंझर्व्हेटिव्ह पक्ष सांगत होता की प्रतिस्पर्धी उमेदवार कमकुवत आहे.
लेबर पक्षाच्या प्रचारात अशोक यांची जितकी छायाचित्रं प्रसिद्ध होत होती तेवढीच कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या प्रचारातही होती. अशोक यांचं भारतीय वंशांचं असण्यावर भर दिला गेला.
कंझर्व्हेटिव्ह पक्षाने नारा दिला की योर लोकल टोरी- योर स्ट्रेट चॉईस. हे अशोक यांच्या व्यक्तिगत आयुष्याला लक्ष्य केल्यासारखं आहे असं लेबर पक्षाने म्हटलं. अशोक कुमार यांचं लग्न झालं नव्हतं, मुलंबाळं नव्हती. कंझर्व्हेटिव्ह पक्षाने हे आरोप फेटाळले. अनधिकृत पद्धतीने वाटण्यात आलेल्या परिपत्रकांमध्ये आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला. वंशभेदी शेरेबाजीही करण्यात आली.

फोटो स्रोत, MATERIALS PROCESSING INSTITUTE
दमवून टाकणाऱ्या आणि वादग्रस्त प्रचार मोहिमेनंतर निकाल हाती आला. अशोक कुमार विजयी झाले पण अंतर 1975 मतांचंच होतं. वैयक्तिक टीकाटिप्पण्यांनी व्यथित झालो असं अशोक कुमार यांनी सांगितलं. माझ्यासाठी क्लेशदायक असा हा अनुभव होता असं ते म्हणाले.
खरं सांगायचं तर अशोक यांचं दु:ख याहून जास्त होतं. आईच्या जाण्यामुळे ते शोकमग्न होते. आई जाण्याचं दु:ख ताजं असतानाच नवीन खासदार म्हणून त्यांना संसदेत जावं लागलं.
संसदेत त्यांचा कार्यकाळ मर्यादित राहिला. मार्च 1992 मध्ये जॉन मेयर यांनी संसद बरखास्त करत सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. यावेळी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या मायकेल बेट्स यांनी विजय मिळवला. अशोक कुमार ब्रिटिश स्टीलच्या नोकरीत रुजू झाले.

फोटो स्रोत, VT FREEZE FRAME
चार वर्षांनी संडरलँडचे खासदार क्रिस मलिन यांची आणि अशोक यांची भेट झाली तेव्हा ते मिडिल्सबोरोचे उमेदवार म्हणून नाव पक्कं झालं होतं. मलिन यांनी डायरीत लिहिलं होतं की अशोक यांच्या विजयाबद्दल ते साशंक होते. मात्र एवढी काळजी करण्याचं कारणच नव्हतं. टोनी ब्लेयर यांच्या नेतृत्वात लेबर पक्षाने 1997 मध्ये 10000 अधिक मतांनी विजय मिळवला.
अशोक कुमार धर्मनिरपेक्ष होते आणि ब्रिटिश ह्यूमॅनिस्ट असोसिएशनशी संलग्न होते. काही प्रसंगी ते हिंदूंच्या हिताचं बोलत असत. 2005 मध्ये हल्ल्यानंतर हिंदूंवर टिप्पणी करण्यात आली तेव्हा त्यांनी यावर खुलेपणाने टीका केली.
अशोक कुमार यांच्यावर वर्णभेदी टीका होतच राहिली. 2004 मध्ये ... गटाने त्यांना जीवे मारण्याची धमकीच दिली.
व्यक्तिगत पातळीवर इराक युद्धासंदर्भातील भूमिकेने संघर्ष निर्माण झाला. त्यांनी इराक युद्धाचं समर्थन केलं पण लेबर पक्षाने याचा विरोध केला होता.
अशोक संसदेच्या वाचनालयात बहुतांश वेळ व्यतीत करत. पब तसंच अन्य ठिकाणी कमीच दिसत. भेटीसाठी सहजी उपलब्ध होत नसल्याचा फटकाही त्यांना बसला. बॅकबेंचर्सवरून मुख्य प्रवाहात ते आलेच नाहीत.
2010 मध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. प्रचारादरम्यान एका शुक्रवारी ते घरी जायला निघाले. ते एकटेच राहत. सोमवारी कार्यालयातल्या लोकांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांच्या मृत्यूबाबत कळलं.

फोटो स्रोत, Getty Images
टोनी ब्लेयर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना म्हटलं की, खासदार म्हणून ते आपल्या कर्तव्याप्रति कटिबद्ध होते. तत्कालीन पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी म्हटलं की टीसाईडच्या जनतेचे प्रश्न ते हिरिरीने मांडत असत. त्यांच्या मृत्यूनंतर हजारो लोकांनी त्यांच्या कार्यालयात फोन केले. अनेकांनी वर्तमानपत्रात त्यांच्याबद्दल लिहिलं.
अशोक आपल्या मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न नेटाने लावून धरत असत. त्यासाठी त्यांच्याकडे अनुभवी लोकांची टीमही होती.
पोटनिवडणुकीतील विजयानंतर त्यांच्या लक्षात आलं होतं की प्रतिस्पर्धींना कमी लेखू शकत नाही. यासाठीच त्यांनी मतदारांशी थेट वैयक्तिक संबंध प्रस्थापित केले.
अशोक यांच्या मृत्यूनंतर स्थानिक पत्रकाराने लिहिलं की अशोक कोणत्याही माणसासाठी धावून जात. त्यांच्याकडे आलेल्या माणसाची जात, वंश, धर्म काय याचा ते कधीच विचार करत नसत.
स्टील उद्योगाशी संबंधित लोकांच्या समस्येच्या निराकरणासाठी त्यांनी निकडीचे प्रयत्न केले.
त्यांचे एजंट आणि मित्र डेव्हिड वॉल्श म्हणाले होते की कुमार वेस्टमिन्स्टरच्या प्रभावशाली गटाचा भाग झाले नाहीत. शास्त्रज्ञांच्या जगातही ते अंतर ठेऊनच असत.
ते म्हणाले, त्या काळी शास्त्रज्ञांमध्येही महत्त्वाच्या पदांवरही गोरे लोक असत. बौद्धिक पातळीवर त्यांचं कर्तृत्व मोठं होतं. पण त्यांना अशोक म्हणजे एक भारतीय केमिकल इंजिनियर समजत असत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























