घरात चोरी नाही, या माणसाचं अख्खं घरच 'चोरीला' गेलं

- Author, शारी वॉल
- Role, प्रतिनिधी, यू अँड यूअर्स
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
ब्रिटनमधला एका माणसाला काय करावं आणि काय नाही ते सुचेना जेव्हा त्याला कळलं की त्यांचं अख्खं घरच चोरीला गेलंय.
या व्यक्तींचं घर पूर्ण घर रिकामं करून विकलं गेलं होतं.
रेव्हरंड (धर्मगुरू) माईक हॉल यांच लुटन शहरात घर आहे. माईक सध्या त्या घरात आणि त्या शहरात राहात नाहीत. त्यांच्या शेजारच्यांनी त्यांना सांगितलं की त्यांच्या घरात कोणीतरी वेगळाच माणूस राहातोय आणि ते घर स्वतःचं असल्याचा दावा करतोय.
बीबीसीनी या प्रकरणी तपास केल्यानंतर कळलं की हा आयडेंटिटी थेफ्ट म्हणजे 'ओळख चोरी'चा प्रकार आहे. माईक हॉल यांचं नाव आणि ओळख चोरून त्यांचं घर विकलं गेलं आहे आणि त्यांच्या खात्यातून पैसैही काढून घेतले गेलेत.
पोलिसांनी आधी म्हटलं होतं की ही फसवणुकीची केस नाही पण आता ते याप्रकरणी पुढे तपास करत आहेत.
या घराचे मालक माईक हॉल इथे राहात नाहीत ते नॉर्थ वेल्स या भागात राहातात. त्यांनी सांगितलं की 20 ऑगस्टला त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना फोन करून सांगितलं की त्यांच्या घरात कोणीतरी आहे आणि घरातले दिवेही चालू आहेत.
दुसऱ्या दिवशी ते धावतपळत तिथे पोहचले.
त्यांनी बीबीसी रेडियो 4 या चॅनलच्या 'यू अँड युअर्स' या कार्यक्रमात म्हटलं की, "मी दार उघडण्याचा प्रयत्न केला पण ते उघडलं नाही. मग एका व्यक्तीने दरवाजा उघडला. मी त्याला धक्का मारून बाजूला केलं आणि आत गेलो. मला काहीच माहिती नव्हतं की तो आत काय करत होता. आतली परिस्थिती पाहून मला धक्काच बसला. तिथे ना फर्निचर होतं, ना कारपेट ना पडदे."
त्या व्यक्तीने माईक यांना सांगितलं की तो बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तिथे दुरुस्तीचं काम करतोय. यावर माईक म्हणाले, हे घर माझं आहे, मी कोणाला विकलेलं नाही.
मग त्यांनी पोलिसांना फोन केला पण तो कंत्राटदार तिथून निघून गेला होता. थोड्या वेळात तो कंत्राटदार नव्या मालकाच्या वडिलांना घेऊन आला. ते माईक यांना म्हणाले, "हे घर आम्ही जुलै महिन्यात खरेदी केलं होतं. आता ते आमचं आहे. तुम्ही इथे अनधिकृतरित्या घुसला आहात. इथून चालते व्हा."
पोलिसांची प्रतिक्रिया
माईक हॉल म्हणाले की यानंतर आम्ही घरनोंदणीची कागदपत्रं तपासली तर लक्षात आलं की खरंच 4 ऑगस्टला या घराची कोणा दुसऱ्या व्यक्तीच्या नावे नोंद झालेली आहे.
"पोलीस म्हणाले की आता आम्ही काही करू शकत नाही. ही कायदेशीर बाब आहे, तुम्हाला तुमच्या वकिलांशी बोलावं लागेलं."

फोटो स्रोत, Getty Images
माईक म्हणतात, "हा माझ्यासाठी खूप मोठा झटका होता. एकतर मला माझ्या घराची अवस्था बघून धक्का बसला होता. त्यावर पोलिसांचं म्हणणं होतं की इथे गुन्हा घडलेला नाही. ते खरंच असं म्हणू शकतात यावर माझा विश्वासच बसला नाही."
बीबीसीने यानंतर माईक हॉल यांचा संपर्क स्थानिक बेडफोर्डशायर पोलिसांशी करून दिला. त्यांनी आता या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
पोलिसांच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय की अजूनपर्यंत कोणालाही अटक झालेली नाही.
'यू अँड यूअर्स'ला ते ड्रायव्हिंग लायन्सस सापडलं आहे ज्यावरून माईक यांची ओळख चोरली गेली होती. त्यांच्या बँक अकाऊंटचेही डिटेल्स मिळाले आहेत ज्यात घर विकून आलेले पैसै जमा झाले होते. तसंच हे घर चोरी करण्याबद्दलचं एक फोन रेकॉर्डिंगही मिळालं आहे.
1 कोटी 13 लाखाला विकलं गेलं घर
हे घर 1,31,000 पाऊंड म्हणजेच जवळपास 1 कोटी 13 लाखाला विकलं गेलं. हे घर आता कायद्याने नव्या मालकाचं आहे.
या प्रकरणाशी संबंधित वकिलांचं म्हणणं आहे की सध्या पोलिसांचा तपास चालू आहे त्यामुळे ते याबद्दल फारसं काही बोलू शकत नाहीत.
एका लॉ फर्मने म्हटलं की, "आम्ही पोलिसांना सहकार्य करू आणि आमचं कर्तव्य निभवू."
बीबीसीने या लॉ फर्मचं नाव जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे,
ब्रिटनमधली घरांच्या खरेदी-विक्रीची नोंदणी करणारी संस्था लँड रजिस्ट्रीने गेल्यावर्षी फसवणुकींच्या केसेसमध्ये 35 लाख पाऊंडांची भरपाई दिली होती.
त्यांनी म्हटलं की, "आम्ही तज्ज्ञांसोबत, वकिलांसोबत काम करतो, त्यांच्या तपासकार्यावर विश्वास ठेवतो. या प्रयत्नांनी खोटे घरमालक पकडले जाऊ शकतात. पण कितीही प्रयत्न केले तरी दरवर्षी फसवणुकीची काही प्रकरणं समोर येतातच."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























