घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं

घारापुरी

'गेट वे ऑफ इंडिया'हून निघून घारापुरीच्या जेट्टीवर पोहोचल्यावर अरुंद रस्ता जुन्या दगडी पायऱ्यांपाशी जाऊन पोहोचतो. या पायऱ्या इथल्या जगप्रसिद्ध लेण्यांकडे तुम्हाला नेतात. पण आम्ही त्या पायऱ्यांची दिशा बदलत नाही.

इथं जवळपास गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ वास्तव्यालाच असलेला पुरातत्त्व अभ्यासक चैतन्य डुबे, जो आम्हाला घ्यायला आला आहे, तो सांगतो माझ्यामागे डाव्या दिशेला या.

2025 च्या नोव्हेंबर महिन्यापासून इथे असलेल्या चैतन्य आणि त्याच्या टीममधल्या उरलेल्या सगळ्यांचा आता 2026 जून महिन्यात वास्तव्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच दिवशी आम्ही तिथं गेलो आहोत.

हे सगळे लोक एवढा काळ या मुंबईला लागून असलेल्या बेटावर करत काय होते? ते पाहण्यासाठी चैतन्यच्या मागं जावं लागेल.

घारापुरी बंदर आणि त्याची जेट्टी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, घारापुरी बंदर आणि त्याची जेट्टी

एका बाजूला डोंगरझाडी आणि एका हाताला समुद्र असं ठेवून पायवाटेनं आम्ही पुढे जातो. या बेटाचे तीन भाग मानले जातात. मोराबंदर, सेतबंदर आणि राजबंदर. ज्या भागाकडे आम्ही चाललो आहे तो मोराबंदर.

दहाएक मिनिटं चालल्यावर पायवाट सोडून आम्ही डोंगराकडच्या झाडीत शिरतो. थोडी पावलं पुढे गेल्यावर जमिनीचा एखादा मोजून मापून स्लाईस काढावा असा खड्डा दिसतो. हेच पाहायला आम्ही आलो आहे.

मुंबईपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात वसलेलं घारापुरीचं बेट. ब्रिटिशकाळात इथे झालेल्या उत्खननानंतर, लेण्यांचं अस्तित्व प्रकाशात आल्यानंतर, याला 'एलिफंटा' या नावानंही बहुतांशी ओळखलं जातं.

'युनेस्को'नं जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या या बेटाची ओळख आजवर प्रामुख्याने त्याच्या अद्भुत लेण्यांमुळे होती.

पण गेल्या आठ महिन्यांत या बेटावर झालेल्या उत्खननातून एक नवं सत्य समोर आलं आहे. घारापुरी हा केवळ कलात्मक आणि सांस्कृतिक वारसाच नव्हे, तर दीड हजार वर्षांपूर्वीचं एक भरभराटीचं आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर होतं.

घारापुरीचं नव्यानं उत्खनन

2025 च्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून 'आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया' (ASI) आणि पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासासाठी प्रसिद्ध असलेलं पुण्याचं डेक्कन कॉलेज यांनी संयुक्तपणे घारापुरीच्या बेटावर उत्खनन सुरू केलं.

यंदाच्या जून महिन्यापर्यंत ते चाललं. ASI तर्फे मुंबई विभागाचे अभिजीत आंबेकर यांची टीम, डेक्कन कॉलेजतर्फे इथले सहयोगी प्राध्यापक अभिजित दांडेकर यांची टीम आणि सोबत पुरातत्त्वशास्त्राचे अनेक अभ्यासक आणि विद्यार्थी या उत्खनन मोहिमेत सहभागी झाले होते.

ASIआणि पुण्याचं डेक्कन कॉलेज यांनी संयुक्तपणे घारापुरीच्या बेटावर उत्खनन केलं.

फोटो स्रोत, Rajesh Chandanashive/ASI

फोटो कॅप्शन, ASIआणि पुण्याचं डेक्कन कॉलेज यांनी संयुक्तपणे घारापुरीच्या बेटावर उत्खनन केलं.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

घारापुरी बेटावरील मोराबंदर या भागात या मोहिमेत उत्खनन झालं. आणि हे उत्खनन अनेक नव्या शोधांचं निमित्त ठरलं. या उत्खननातून हाती आलेले पुरावे इतके महत्त्वपूर्ण आहेत की घारापुरीच्या बेटाचा इतिहास थेट तिसऱ्या शतकापर्यंत मागे गेला आहे.

साधारण 6 व्या ते 8 व्या शतकात घारापुरीच्या लेण्या कोरल्या गेल्या असाव्यात असा संशोधकांचा अंदाज आहे. या लेण्यांच्या अभ्यासातून संशोधकांना आधीपासूनच वाटत होतं की या बेटावर आणखी ऐतिहासिक वारसा दडलेला आहे. मात्र त्यापूर्वीचा नक्की इतिहास काय होता, हा प्रश्न अनुत्तरित होता.

"काही वर्षांपूर्वी असा समज होता की बदामीचे चालुक्य राजे किंवा मध्य प्रदेशातील कलचुरी राजे यांच्याशी या लेण्यांचा संबंध आहे. कृष्णराज कलचुरी नावाच्या राजाची नाणी या बेटावर सापडली होती त्यामुळे हे कलचुरी काळातलं असावं असा कयास होता. पण लेण्या नक्की कोणत्या काळात खोदल्या गेल्या, आणि एका बेटावर अचानक लेण्या का आल्या, हा मूळ प्रश्न होताच. त्यामुळे यापूर्वी इथे काहीतरी वस्ती असणं आवश्यक होतं," असं डेक्कन कॉलेजचे सहयोगी प्राध्यापक अभिजीत दांडेकर सांगतात.

6 व्या ते 8 व्या शतकात घारापुरीच्या लेण्या कोरल्या गेल्या असाव्यात असा संशोधकांचा अंदाज आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 6 व्या ते 8 व्या शतकात घारापुरीच्या लेण्या कोरल्या गेल्या असाव्यात असा संशोधकांचा अंदाज आहे.

अभ्यासकांचा एक कयास हाही होता की जिथे एवढ्या कलाकुसरीच्या, भव्यतेच्या लेण्या आणि खोदकाम आहे, या कामासाठी मोठी रसदही आवश्यक असते. अनेक वर्षं, कधीकधी अनेक शतकं असं काम सुरू असतं. त्यामुळे तिथे किंवा जवळ भरभराटीला आलेलं शहर, व्यापारकेंद्र, अथवा वस्ती असणारच.

त्यामुळे घारापुरीजवळ उत्खनन केलं तर काही नवीन हाती गवसेल असं पुरातत्त्व अभ्यासकांना वाटत होतं. आणि तसंच झालं.

दांडेकर पुढे सांगतात, "साधारण 4 थ्या शतकाच्या सुरुवातीपासून ते 12 व्या शतकापर्यंतच्या वस्तू इथे सापडल्या आहेत. म्हणजे 700 ते 800 वर्षं हे बंदर अस्तित्वात होतं असं आत्मविश्वासाने सांगता येतं. जितक्या प्रमाणात आपल्याला टॉरपीडो जार्स (मातीची उंच मोठी भांडी) आणि इतर गोष्टी मिळाल्या आहेत, त्यावरून हे भारतातील सर्वाधिक उत्खनित स्थळांपैकी एक असावं असा अंदाज आहे."

जेवढं उत्खनन इथं झालं आहे, अचंबित करणारं आहे. त्यातली सगळ्यात आकर्षक जागा, म्हणजे पाणवठा.

पाणवठा: खाऱ्या समुद्रातला पिण्याच्या पाण्याचा स्रोत

चैतन्य आणि त्याच्या काही सहकाऱ्यांसोबत आम्ही मोराबंदर परिसरात फिरतो. एकूण 19 ठिकाणी उत्खनन झालं आहे. म्हणजे तेवढ्या ट्रेन्चेस, खड्डे इथं आहेत. वर जमिनीवर जे पुरावे आढळले, त्यांचा अंदाज घेऊन नेमक्या ठिकाणी खोदकाम करावं असं ठरतं.

ते मोठं जिकिरीचं काम असतं कारण आत खाली दबलेल्या वस्तू हा मोठा पुरातत्त्वशास्त्रीय पुरावा असू शकतो. त्याचा अंदाज घेत हे ट्रेन्चेस केले गेलेत.

पण पहिली छोटी टेकडी चढून थोडं वर गेलं आहे की या मोहिमेत मिळालेला सगळ्यात मोठा पुरावा. एक आखीव-रेखीव, घडवलेला, अनेक पायऱ्यांचा खोल पाणवठा.

जरा अतिशयोक्ती वाटू शकेल पण केवळ फोटोंमध्ये पाहिलेल्या मोहेंजोदाडोच्या 'ग्रेट बाथ'ची किंवा आपल्याकडे ज्यांना बारव म्हणतात अशा खोल असलेल्या पण कलाकुसरीनं घडवलेल्या मोठ्या पायऱ्यांच्या इतिहासकालीन बारवांची आठवण या पाणवठ्याकडे पहिल्यांदा पाहिल्यावर येते.

एक आखीव-रेखीव, घडवलेला, अनेक पाय-यांचा खोल पाणवठा.

फोटो स्रोत, Rajesh Chandanashive/ASI

फोटो कॅप्शन, एक आखीव-रेखीव, घडवलेला, अनेक पायऱ्यांचा खोल पाणवठा.

टेकडीच्या उतारावर घडवला गेलेला हा पाणवठा. आयताकृती दगडांच्या घडवलेल्या पायऱ्या आणि विटांच्या भिंती. उतारावर पाणी अडवून इथं साठवलं जात असणार. समुद्राच्या खाऱ्या पाण्यानं वेढलेल्या बेटावर गोड्या पाण्याचा हा अत्यावश्यक साठा होता.

संशोधक चैतन्य डुबे याबद्दल सांगतो, "नीट पाहिलं तर समजतं की ज्या दगडांनी आणि विटांनी ही स्टेपवेल अथवा पाणवठा बनलेला आहे, ते दगड या बेटावरचे नाहीत. हा दगड इथे मिळत नाहीत. विटाही इथे भाजण्याचं काही कारण नाही कारण इथे तेवढी माती नाही. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की हे सर्व बाहेरून मागवलेलं आहे. याचाच अर्थ व्यापार इतका मोठा होता की या बेटावर येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी आणि प्रवाशांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करून हा जलाशय उभारला गेला. आम्ही नाणी आणि पुरातन वस्तूंच्या आधारे याचं वय सुमारे 1500 वर्षं असल्याचा सध्याचा अंदाज आहे."

टेकडीच्या उतारावर घडवला गेलेला हा पाणवठा.

फोटो स्रोत, Shahid Sheikh/BBC

फोटो कॅप्शन, टेकडीच्या उतारावर घडवला गेलेला हा पाणवठा.

चैतन्य हेही सांगतो की आता जेवढा या पाणवठ्याचा जेवढा भाग प्रकाशात आला आहे अथवा जेवढ्याचं उत्खनन झालं आहे, तेवढाच याचा पसारा नसावा. अजूनही याचा बराच भाग अजूनही जमिनीखाली आहे.

भविष्यातल्या उत्खननात तो शोधला जाऊ शकतो. पण ज्याअर्थी इथं एवढा मोठा पाणवठा बांधला गेला, त्याअर्थी मोठी वर्दळ आणि वस्ती होती.

मातीची भांडी: आंतरराष्ट्रीय संबंधांचं प्रमाण

जवळपास आठ महिने चाललेलं हे उत्खनन आता थांबलं आहे. म्हणजे या मोहिमेचा एक टप्पा आता पूर्ण झाला आहे. आता यात जे पुरावे सापडले त्याचा अभ्यास होईल आणि त्यातून आलेल्या निष्कर्षांतून जसं आवश्यक असेल तसं पुढचं उत्खनन होईल.

हे पुरावे म्हणजे केवळ वर उल्लेख केलेल्या पाणवठ्यासारख्या बांधकामाचेच नाहीत. तर इतरही अनेक प्रकारचे आहे.

त्यातला एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे इथे उत्खननात मिळालेली विविध प्रकारची आणि विविध देशींची भांडी. विविध देशांतून आलेली मातीची भांडी. उत्खननात रोजच्या वापराची लाल आणि राखाडी भांडी तर सापडलीच, इराणसारख्या प्रदेशांमधून आलेली भांडीही मिळाली आहेत.

"इथे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची पॉटरी आम्हाला मिळाली," दांडेकर आम्हाला एकेक भांड दाखवत सांगतात.

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

फोटो कॅप्शन, "इथे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची पॉटरी आम्हाला मिळाली," दांडेकर आम्हाला एकेक भांडे दाखवत सांगतात.

"इथे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची पॉटरी आम्हाला मिळाली," दांडेकर आम्हाला एकेक भांडे दाखवत सांगतात.

"त्यात रोजच्या वापरातली जी भांडी असतात ती तर मिळालीच. पण आता आम्ही जेव्हा म्हणतो की एलिफंटा हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं एक केंद्र होतं तर त्याचा पुरावा काय? तर ते परत आपल्याला मातीच्या भांड्यातून सांगता येतं. उदाहरणार्थ, जी पश्चिम आशियामधून भांडी यायची किंवा आखाती प्रदेशातून भांडी आली किंवा इराणमधून भांडी आलेली आहे ती भांडी याच्यातून आपल्याला दिसतं की आपले इराणशी म्हणा किंवा आखाती देशांशी चांगले व्यापारी संबंध होते," दांडेकर सांगतात.

आता या भांड्याच्या निरीक्षणातून ते कोणत्या देशातून आलं आहे हे कसं सांगता येतं हे दाखवण्यासाठी एका तुटून अर्ध्या राहिलेल्या मातीच्या भांड्याचा उरलेला भाग ते हातात घेतात. हे भांडे निमुळतं असून त्याला खाली एक खूर असल्यासारखा भाग आहे.

"हा एक भांड्याचा तुकडा आपला जो दिसतो तो एका भांड्याचा बूड आहे. हा जो खूर आहे, याच्यावरून आपल्याला सांगता येऊ शकतं की हे भांडं आखाती प्रदेशातलं तर आहेच. कारण अशी भांडी त्या भागात मिळाली आहेत. हे दुसरं भांडं जर आपण बघितलं तर त्याचा खूर जरा उंच दिसतो. त्यामुळे आपल्याला असं सांगता येऊ शकतं की जरी आखाती प्रदेशातून आले असतील तरी आखाती प्रदेशातल्या वेगवेगळ्या भागातून ही भांडी आलेली आहेत ती कदाचित ओमानमधून आली असतील किंवा उत्तर आफ्रिकेतूनही आलेलं असू शकतं," अभिजीत पुढे सांगतात.

हे भांड निमुळतं असून त्याला खाली एक खूर असल्यासारखा भाग आहे.

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

फोटो कॅप्शन, हे भांड निमुळतं असून त्याला खाली एक खूर असल्यासारखा भाग आहे.

पण इथं छोटी भांडी मिळाली आहेत अशी नाही. ज्याला 'प्रचंड' असंही विशेषण लावू शकू अशी मोठाली जुनी भांडीही मिळाली आहेत. ती आम्हाला घारापुरीच्या उत्खनन स्थळावरच दोन दिसतात. एखादा माणूस बसू शकेल एवढी मोठी साठवणुकीची भांडी इथं मिळाली आहेत.

एका मोठ्या वडाच्या झाडाखाली एक सापडलं. त्या झाडाची मुळंही भांड्यात घुसली होती. त्या मुळांतून ते भांड सोडवलं गेलं आणि त्याचे झालेले तुकडे एकेक करुन गोळा केले गेले.

हे मोठं किचकट काम एएसआयचे सिनियर मॉडेलर सुधीर वाघ करतात. या दुसऱ्या भांड्याचे तुकडे जोडून आता अर्ध्यापेक्षा जास्त भांडं त्यांनी पुन्हा जसंच्या तसं जोडलं आहे. काम अजूनही चालूच आहे.

एखादा माणूस बसू शकेल एवढी मोठी साठवणुकीची भांडी इथं मिळाली आहेत.

फोटो स्रोत, Shahid Sheikh/BBC

फोटो कॅप्शन, एखादा माणूस बसू शकेल एवढी मोठी साठवणुकीची भांडी इथं मिळाली आहेत.

"ज्या स्थितीमध्ये हे मिळालं त्याच स्थितीमध्ये म्हणजे आपण याला गोलाकार करून ठेवण्याचा प्रयत्न करतोय," सुधीर वाघ सांगतात. "म्हणजे एक चांगल्या प्रकारे याला आपल्याला उचलून संग्रहालयात ठेवता येईल."

"अशी दोन मोठी भांडी सापडली. त्याचे परत तुकडे होऊ नयेत म्हणून फायबर ग्लासचं कोटिंगही आम्ही आतून करतो आहे," वाघ पुढे सांगतात.

नाण्यांमधून आणि मण्यांमधून उलगडणारा इतिहास

जर घारापुरी हे व्यापाराचं केंद्र होतं तर महत्त्वाचा पुरावा ठरतो चलनाचा. म्हणजे नाण्यांचा. भारतातली आणि भारताबाहेरची साम्राज्य त्यांची नाणी पाडायचे. त्यांची देवाणघेवाण व्हायची. अशी जवळपास 70 नाणी घारापुरीच्या उत्खननात सापडली आहेत.

अभिजीत दांडेकर ही नाणी आम्हाला पुण्यात दाखवतात. ती आता प्रदेशांनुसार, कालखंडानुसार वेगळी करुन ठेवण्यात आलेली आहे.

अनेक वर्षं मातीत दबून राहिल्यानं, क्षारयुक्त हवा असल्यानं ती नाणी गंजली आहेत. त्यावर अनेकविध थर आहेत. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीनं ती स्वच्छ करुन मग वाचावी लागतात. काहींवर चिन्हं आहेत, काहींवर लिपीमध्ये काही लिहिलेलं.

जवळपास 70 नाणी घारापुरीच्या उत्खननात सापडली आहेत.

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

फोटो कॅप्शन, जवळपास 70 नाणी घारापुरीच्या उत्खननात सापडली आहेत.

यातलं एक चांदीचं नाणं उचलून अभिजीत दांडेकर आम्हाला दाखवतात. हे कार्दमक क्षत्रप घराण्याचं नाणं असून या नाण्यांवर राजाचा चेहरा, त्याचं नाव, त्याच्या वडिलांचं नाव आणि त्यांचे हुद्दे कोरलेले असतात असं ते सांगतात.

"हे साधारण तिसऱ्या किंवा चौथ्या शतकातील रुद्रसेन दुसरा या राजाचं नाणं असावं. त्यावरून त्यांची संपूर्ण राजकीय वंशावळ बांधणं शक्य होतं," दांडेकर पुढे सांगतात.

जशी भांडी सापडतात तशी भारताबाहेरच्या साम्राज्यांतली अनेक नाणीही इथे सापडली आहेत. इराणमधल्या इराणच्या ससेनिअन राजांचं एक नाणं ते आम्हाला दाखवतात. ते जरा काळं पडलं आहे आणि अजून स्वच्छ व्हायचं आहे. पण त्यावरची चिन्हं बऱ्यापैकी दिसतात.

"तिसऱ्या ते सातव्या शतकापर्यंत इराणमध्ये राज्य करणाऱ्या या राजांच्या नाण्यावर राजाचं चित्र आणि झरतुष्ट्री (झोरोस्ट्रियन) धर्माचा पवित्र अग्नी कोरलेला आहे. यजदेगर्द तिसरा हा शेवटचा ससेनिअन राजा. त्यानंतरच पारसी लोक भारतात आले. या राजांचं नाणं घारापुरीत सापडणं म्हणजे इराणशी थेट व्यापारी संबंध असल्याचा पुरावा आहे," असं निरीक्षण दांडेकर नोंदवतात.

भारताबाहेरच्या साम्राज्यांतली अनेक नाणीही इथे सापडली आहेत.

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

फोटो कॅप्शन, भारताबाहेरच्या साम्राज्यांतली अनेक नाणीही इथे सापडली आहेत.

"इथं सापडलेल्या नाण्यांवरून सांगता येतं की किमान दोन राजघराणी होती त्यांचा ह्या बेटाशी गहिरा संबंध असावा. त्यातले एक म्हणजे त्रिकुटक राजे. यांची नाणी आपल्याला इथे सापडली आहेत. आणि दुसरे कलचुरी राजे. कलचुरी राजे हे हे मूळचे मध्य प्रदेश मधले राजे. मध्य प्रदेश मधल्या महिष्मतीचे ते राजे. त्यात एक कृष्णराज नावाचा एक मोठा राजा होऊन गेला. त्या कृष्णराजाची बरीचशी तांब्याची नाणी आपल्याला इथे सापडलेली आहेत," दांडेकर सांगतात.

नाण्यांसोबत अजून एक महत्वाचा पुरावा म्हणजे मणी. ते एकतर मातीचे भाजून बनवलेले (टेराकोटा) असतात अथवा रंगीबेरंगी दगडांचे असतात. उत्खननात तेही बरेच सापडले. खोदलेली माती गाळून मोठ्या कष्टानं हे मणी हुडकावे लागतात. मग स्वच्छ करुन त्यांचा अभ्यास करावा लागतो.

डेक्कन कॉलेजच्या संशोधक केतकी महाजन सांगतात की सापडलेल्या काही मण्यांचं उत्पत्तिस्थान सीरिया असावं असं दिसतं. "हे काचेचे मणी लेट रोमन काळातले आहेत, साधारण सातव्या शतकानंतर हे सापडतात."

मणी एकतर मातीचे भाजून बनवलेले (टेराकोटा) असतात अथवा रंगीबेरंगी दगडांचे असतात.

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

फोटो कॅप्शन, मणी एकतर मातीचे भाजून बनवलेले (टेराकोटा) असतात अथवा रंगीबेरंगी दगडांचे असतात.

रुपाली सिंग यांनी नेफ्राईट दगडाच्या मणी दाखवतात आणि सांगतात हा भारतात मिळत नाही. "हा दगड स्थानिक पातळीवर मिळत नाही. याचा आपल्यापासून सर्वात जवळचा स्रोत म्हणजे ब्रह्मदेश अथवा ओमान. हे मणी कदाचित विदेशी व्यापाऱ्यांनी आणले असावेत आणि येथून पुढे व्यापारातून इतर ठिकाणी गेले असावेत," त्या सांगतात.

घारापुरी ते मुंबई: व्यापारी बंदराचा ऐतिहासिक वारसा

मुंबईची बंदर म्हणून ओळख बनू लागली ती ब्रिटिशांच्या काळात. सोळाव्या शतकापासून या शहरानं आकार घ्यायला सुरुवात केली. बघता बघता हे एक महत्त्वाचं बंदर बनलं आणि आजही ते भारताच्या आंतराष्ट्रीय व्यापाराचं मुख्य स्थान आहे.

पण मुंबईच्या किनाऱ्यापासून 10 किलोमीटरवर असलेलं घारापुरी हे आता मिळालेल्या पुराव्यांवरुन मुंबईअगोदर किमान हजार वर्षं व्यापाराचं केंद्र होतं.

घारापुरीच्या एका बाजूला मुंबईचा किनारा आहे, दुसऱ्या बाजूला आजचं आंतरराष्ट्रीय बंदर आहे, जेएनपीटी.

फोटो स्रोत, Google Earth

फोटो कॅप्शन, घारापुरीच्या एका बाजूला मुंबईचा किनारा आहे, दुसऱ्या बाजूला आजचं आंतरराष्ट्रीय बंदर आहे, जेएनपीटी.

इतिहास अभ्यासकांच्या मते ही एक सातत्यता आहे. एक वारसा आहे. तो तुम्हाला इतिहासात ब-याचदा दिसतो. घारापुरीच्या एका बाजूला मुंबईचा किनारा आहे, दुसऱ्या बाजूला आजचं आंतरराष्ट्रीय बंदर आहे, जेएनपीटी.

"हे सांगता येऊ शकतं की जी व्यापारी जहाजं येत होती ती इथं ऑफलोड करत असतील माल आणि इथून छोट्या बोटींमध्ये तो अपलोड होऊन पुढे जात असेल. ट्रान्झिट बंदर असं याचं स्वरुप तुम्हाला सांगता येईल. याचा उत्तम पुरावा म्हणजे काय? तर समोरच्याच तीरावर तुम्हाला आजचं आंतरराष्ट्रीय बंदर सापडतं. त्यामुळे पंधराशे वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय बंदर आणि समोरच तुम्हाला आधुनिक आंतरराष्ट्रीय बंदर हे तुम्हाला अतिशय दिसलं. त्यामुळे तो वारसा असतो. ही तुमची कंटिन्यूटी कालपट्टिकेवर आपोआप चालू असते," अभिजीत दांडेकर सांगतात.

घारापुरीतून ठाणे, कल्याण, चौल अशा व्यापारी केंद्रांमध्ये इथे आलेला माल जात असावा.

फोटो स्रोत, Google Earth

फोटो कॅप्शन, घारापुरीतून ठाणे, कल्याण, चौल अशा व्यापारी केंद्रांमध्ये इथे आलेला माल जात असावा.

आपल्याला हे माहिती आहे की सातवाहनांच्या काळात सोपारा (आजचं नालासोपारा) हे एक महत्वाचं आंतरराष्ट्रीय बंदर होतं. त्याचं महत्व संपल्यानंतर आज हाती असलेल्या पुराव्यांच्या आधारे तिस-या शतकानंतर घारापुरीचं महत्व वाढू लागलं.

घारापुरीतून ठाणे, कल्याण, चौल अशा इतिहासकालात कार्यरत असलेल्या व्यापारी केंद्रांमध्ये इथे आलेला माल जात असावा.

दांडेकर गुगल मॅपवर बोट दाखवत सांगतात, "मोराबंदरचा परिसर अतिशय सुरक्षित आहे, जिथे मोठ्या बोटी नांगरता येतात. तिथून छोट्या बोटींनी माल ठाण्याच्या खाडीत, कल्याणपर्यंत आणि उरण-अलीबागच्या दिशेने पाठवता येतो. रेवदंड्याजवळचं चौल हे ठिकाण डेक्कन कॉलेजने उत्खनित केलं असून तिथे पहिल्या-दुसऱ्या शतकापासून ते सोळाव्या शतकापर्यंतचे पुरावे मिळाले आहेत. या संपूर्ण किनारपट्टीवर एक जिवंत व्यापारी नेटवर्क होतं."

घारापुरीतून चालणारा व्यापार

फोटो स्रोत, Google Earth

फोटो कॅप्शन, घारापुरीतून चालणारा व्यापार

अर्थात हे उत्खनन आणि अभ्यास अजून पूर्ण झालेलं नाही. तो आता कुठे सुरु झाला आहे. त्यामुळे अजून अनेक नवनव्या गोष्टी, रहस्यं समोर यायची आहे. पण एक नक्की की मुंबईच्या भवतालाचा इतिहास या उत्खननामुळे अनेक शतकं मागे गेला आहे.

घारापुरी अथवा एलिफंटा म्हणजे केवळ लेण्यांचं बेट नाही, ते एकेकाळी पश्चिम किनारपट्टीवरचं सर्वात महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र होतं, हे उत्खननातून बाहेर आलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)